|| १ ||
लहान असताना ओळखीच्या देवांमध्ये सगळ्यात ओळखीचा वाटलेला देव कोणता असेल तर तो राम! त्याचं एकमेव कारण म्हणजे, घरात रामाचा जन्म साजरा व्हायचा. मी लहान. देवही नुकताच जन्माला आलेला. त्यामुळं तो आपल्या वयाच्या आसपासचा वाटायचा. शिवाय या देवाचा उल्लेख घरात एकेरी व्हायचा. रामाचा फोटो, रामाची मूर्ती… अशा पद्धतीनं. त्यामुळं ‘अरे.. तुरे..’च्या गणितामुळं कदाचित हा देव मनाच्या जवळ राहिला असावा. तो पुढं खूप वर्षं जवळ राहिला. मनाच्या सोबत राहिला.
|| २ ||
तिसरी किंवा चौथीत असेन. शाळेतल्या पोतनीस बाईंनी एकदा वर्गात जाहीर केलं. तुम्हाला तुमच्या मनातलं घडवायचंय? जे तुमच्या मनात, ते प्रत्यक्षात आणायचंय? मी मनातल्या मनात ‘हो’ म्हटलं. त्यांनी रोज संध्याकाळी देवापुढं बसून देवाचं नाव घ्यायला सांगितलं. आणि ते कसं घ्यायचं याची पद्धत सांगितली. त्यावेळी मनात साठून राहिलेला देव एकच. तो म्हणजे राम. मलाही मनासारखं घडवायचं होतं. मनात येईल ते ते प्रत्यक्षात आलं, तर ते त्या लहान्या वयात हवंच होतं. मी माझ्या जवळचा असलेला देव म्हणून अर्थातच ‘राम’ हे नाव घ्यायचं ठरवलं. जसं जसं घेत गेलो, तसं तसं ‘राम’ हे नाव मनाच्या अधिक जवळ येऊ लागलं. हे नाव अधिक मित्र बनलं. या नावाची प्रतिमाच मनातल्या मनात साठत गेली. हे नाव तेव्हा माझा आधार बनलं होतं. माझी ताकद बनलं होतं. (ते कसं ते पुन्हा केव्हातरी.)
|| ३ ||
मला आठवतं, खेळताना माझ्या खिशात कायम ‘राम-सीता-लक्ष्मण आणि पायाशी हनुमान’ असा एक छोटा फोटो असायचा. हा फोटो खिशात असला की खेळ चांगला व्हायचा. अशी मनाची समजूत झालेली. लंगडी खेळताना हा फोटो असेल, तर कितीही लोक येऊ दे मैदानात, सगळ्यांना आऊट करेपर्यंत माझा ‘लंगड पाय’ काय खाली टेकायचा नाही. मला वाटायचं, ही जादू माझ्या मित्राची. म्हणजे रामाची. खेळताना, अभ्यास करताना, कुणी रागवलं तर, काही दुःख झालं तर, हा फोटो मला साथ-सोबत करायचा. हे काही महिने सुरू होतं.
|| ४ ||
एक नियम होता. खिशातला फोटो कपडे बदलताना या कपड्याच्या खिशातून त्या कपड्याच्या खिशात ठेवायचा. एकदा हा नियम मोडला गेला. फोटो चुकून खिशात तसाच राहिला. सकाळी उठून अंघोळ केली. कपडे धुवायला टाकले. शाळेचे कपडे अंगावर चढवले. माझा फोटो मित्र माझ्या सोबत नाही, हे लक्षातच आलं नाही. नंतर केव्हातरी ते लक्षात आलं. आलं तेव्हा खिशात फोटो नव्हता. खूप अस्वस्थ झालो. शोधाशोध केल्यावर धुतलेल्या आणि वाळून गेलेल्या शर्टाच्या खिशात फोटोची चुरगळ हातात आली. फोटोवरचे रंग उडाले होते. नुसता कागद शिल्लक होता. या कागदाचं आता मी काय करू? त्या कागदाचं काय केलं मला आता आठवत नाही. पण त्यादिवशी मला खूप एकटं वाटलं. आता माझा मित्र माझ्या सोबत नसणार, असं काहीसं वाटलं. मनात तयार झालेला, पक्का होत गेलेला आधार निखळला. मी आणखीनच एकटा पडलो.
|| ५ ||
शाळा काळात समोर देव कोणताही असो. मी नमस्कार करायचो रामालाच. कुठल्याही मंदिरात गेलो, की माझं मागणं मी रामालाच मागायचो. इतकं माझं आणि या देवाचं मनाशी नातं घट्ट होतं. तेव्हा देव कळत नव्हता. मीही मला कळत नव्हतो. आणि देवालाही मी कळत नव्हतो. अर्थात हे खूप नंतर कळलं. (टीप – हे वाक्य वादाचं नाही तर संवादाचं आहे.)
|| ६ ||
खूप दिवस मनात होतं. डायरी लिहावी म्हणून. मनात भीतीही होती, ती नंतर कुणी वाचेल म्हणून. लपून छपून प्रयत्न केला. जमला. पण मनातलं सांगायचं कुणाला? तर आपल्या हरवलेल्या फोटोतल्या मित्राला. म्हणजे रामाला. त्यामुळं डायरी लिहिताना, आधी ‘श्रीराम…’ असं लिहायचं आणि मनातलं म्हणणं कागदांच्या माध्यमातून मनातल्या मित्राला सांगायचं, असं ठरवलं. पुढं कागदांना मनातलं सांगायचो, कागदांशी मनातलं बोलायचो तेव्हा राम हे कॅरॅक्टर मला खूप उपयोगी पडलं. राम या प्रतिमेमुळं माझ्या आयुष्यातले अनेक क्षण व्यापले आहेत. ते असे. या डायरीचं एक पान सोबत पुरावा म्हणून दिलंय.
|| ७ ||
मी काहीच वाचलं नव्हतं. रामाबद्दल. रामाच्या आयुष्याबद्दल. जे काही गोष्टींतून, टीव्ही मालिकांतून कानांवर पडत होतं तितकाच राम माझ्या मनात होता. रामाचं सीतेशी असलेलं वागणं चूक की बरोबर? तो खरंच मर्यादा पुरुषोत्तम होता का? अयोध्येचं मंदिर व्हायला हवंय की नको वगैरे गोष्टीत कधीच भाग घेतला नाही. जाणीवपूर्वक. घ्यावाही वाटला नाही. तसंच माझ्या मनातल्या या रामाचा कधीही प्रचार-प्रसार करावा वाटला नाही. तो कधी केलाही नाही. एक देव मनात खूप काळ वावरतो. तो आपल्याला आधार देतो. दिलासा देतो. सोबत करतो. हे मला खूप जास्त महत्त्वाचं वाटत होतं. ज्याला स्वतःचा आधार कमी पडतो, त्याला देवाचा आधार खूप महत्त्वाचा असतो. त्यानं तो घेतलाच पाहिजे. या मतावर मी आलोय. एका टप्प्यावर मला माझा आधार मिळू लागला, तेव्हा मनाशी असलेला देवाचा आधार मनातून दूर होत गेला. (हेही वादाचं नाही तर संवादाचं वाक्य आहे.)
|| ८ ||
घरात एक फोटो होता. रामाचा. हसरा. गोंडस. पाहिल्यावर प्रसन्न वाटावा असा. राम या नावाचा उच्चार कुठंही कानावर पडला, तर हा फोटो मनात येतो. तोच फोटो कधी चुकून आला समोर, तर त्याकडे पाहून मीही रामाच्या हसण्यात माझं हसू मिसळतो.
|| ९ ||
पुढं बदललो. आयुष्यातून देव हळूहळू दूर होत गेला. आता देव माझ्या आयुष्यात नाही आणि मी देवाच्या आयुष्यात नाही. मी बदलण्यात, मला बदलवण्यात माझ्या मनातल्या ‘राम’ मित्राचा खूप मोठा वाटा आहे. इतकंच!
– अभिजित सोनावणे
*
वाचा
अभिजित सोनावणे यांचे साहित्य
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कविता
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!