तीस हजार ओलांडताना!

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-marathi-web-portal-30-hajar-vachak-olandatana

‘सारद मजकूर’ आणि ‘गोष्ट क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘चित्राक्षरे’ या वेबपोर्टलनं गाठला तीस हजार वाचकांचा टप्पा!

एखाद्या छोट्याशा साध्या गोष्टीवरदेखील काहीवेळा बरेच विचार आपल्या मनात येतात. काही गोष्टींवर आपली मतं तयार होतात. ती मतं किंवा एखाद्या गोष्टीची सारासार बाजू उत्तमपणे लिहून मांडण्याची हातोटी काहींजवळ असते. या अशा सर्व लेखकांना त्यांची मतं, विचार, कल्पना, वास्तव मांडता यावं आणि ते इतरांपर्यंत पोचावं या विचारानं ‘चित्राक्षरे’ पोर्टलची निर्मिती झाली. साधारणपणे एखादी गोष्ट पाहून, वाचून, ऐकून आणि प्रत्यक्ष सहभागातून आपली मतं तयार होत असतात. या चारही गोष्टी या पोर्टलवर असाव्यात जेणेकरून जगण्यासाठीचा दृष्टीकोन तयार होण्यासाठी मदत होईल, हा ‘चित्राक्षरे’चा उद्देश. यावर लिखित स्वरूपातील लिखाण मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं. ‘लेखकाला वाचक मिळणं’ ही त्या लिखाणाची सर्वात मोठी दाद असते.

पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘तुम्ही लिहिता म्हणजे काय करता, तर जो तुमच्याशी मनःसंवाद साधू शकेल, तुमच्यासोबत हसू शकेल, रडू शकेल अशा वाचकांच्या शोधात तुम्ही असता.’

‘चित्राक्षरे’ला चांगले लेखक लाभले त्याप्रमाणं चोखंदळ आणि सुज्ञ वाचकवर्गही लाभला. हे दुर्मिळ असते. त्यामुळं सर्व लेखकांना मनःसंवाद साधू शकतील असे दोस्त मिळाले. आपल्या वाचक दोस्तांना सतत नवं काहीतरी देण्याच्या प्रयत्नातून दीपक पारखी यांची ‘महाडचे दिवस’ ही कादंबरी या पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. रोज एकेका भागात कादंबरी प्रकाशित होणं हे यानिमित्तानं पहिल्यांदाच घडलं. त्याला आपल्यासारख्या जाणकार वाचकांनी उत्तम प्रतिसाद आणि दाद दिली यात नवल नाही. ‘महाडचे दिवस’ आता पुस्तकरूपानं येतं आहे. यात ‘चित्राक्षरे’च्या वाचकांचा मोठा वाटा आहे. यानंतर डॉ. क्षमा शेलार यांची ‘बायजा’ ही कादंबरीदेखील प्रसिद्ध करण्यात आली. त्यालाही सर्व वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मराठीच्या लेवागणबोली, कोरकू या बोलींमधल्या कवितादेखील पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या. त्याचाही वाचकांकडून आलेला प्रतिसाद उत्तम होता. ‘उत्तम प्रतिसाद’ हा शब्द इथं व्यापक अर्थानं घेतला आहे. ‘चित्राक्षरे’च्या वाचकांनी नुसता तोंडी लावण्यापुरता प्रतिसाद नाही दिला; तर लेखांमधला मजकूर, त्यामागची गोष्ट अगदी योग्यप्रकारे जाणली. उमजून घेतली. त्या अर्थानं उत्तम प्रतिसाद! समीक्षक मिळतीलही पण मनापासून वाचन करणारा वाचक मिळणं कठीण. ‘चित्राक्षरे’ला ही कठीण गोष्ट साध्य झाली ती फक्त तुम्हा सगळ्या वाचकांमुळे!

महाराष्ट्रातला वाचकवर्ग तर आहेच, त्याचबरोबर जगभरातून ‘चित्राक्षरे’ला वाचक जोडला गेला, हे नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या, त्याप्रमाणं लिखाणाच्या पारंपरिक पद्धतींना छेद गेले. वाचन फक्त पुस्तकातूनच करता येतं किंवा पुस्तक हातात घेऊनच वाचता येतं, ही सारी समीकरणं बदलली. वेबपोर्टलसारखं नवं माध्यम मराठी लेखकांनी आणि वाचकांनी तितक्याच ताकदीनं स्वीकारलं. जगाच्या पाठीवर मराठी टिकून राहण्यासाठी हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ‘चित्राक्षरे’द्वारे उचलल्या गेलेल्या या पावलाचा ठसा उमटवण्यात लेखकांइतकाच वाचकांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपला तीस हजारांचा वाचकवर्ग सोबत घेऊन आणखी नव्या लोकांसमोर आपल्याला यायचं आहे. त्यांच्यासोबत जोडलं जायचं आहे. आपण एकमेकांसोबत असेच जोडलेले राहू या, त्यातून आपला वाचक-लेखकवर्ग, आपला हा साहित्यिक परिवार वाढवू या. सर्व वाचकांचं आणि त्यांची साहित्यिक आवड जपणाऱ्या लेखकांचं मनापासून अभिनंदन!

*

वाचा
कविता

‘महाडचे दिवस’ – कादंबरी
‘बायजा’ – कादंबरी
चित्रपटविषयक लेख
समाजकारण
कथा
आज दिनांक
पुस्तक परिचय
चित्रकथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

1 Comment

  1. Avatar

    अनेक शुभकामना सर्वांना 💐🎊

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :