उदास कातर संध्याकाळी
गाव उगा का आठवतो
डोळ्यावर थरथरतो पडदा
नकळत अश्रू ओघळतो
गजबजलेला काठ जरी
तरी नदी संथ वाहणारी
खडक पठारावरचे झिळमिळ
निळे तळे बिलवरी
वाट रोजची गुरे वासरे
निमुटपणे तुडविती
वाजती किणकिण घुंगुर माळा
खूर धूळ उडविती
घरट्याच्या ओढीने पिलांच्या
सुराळती पाखरे
क्षितिजावरचे रंग केशरी
होती गूढ गहिरे
उभार बांधा माथ्यावरती
अवजड सरपण मोळी
थकली कुणी सावरते तन मन
पाठी बाळ झोळी
गुरे वासरे थकल्या बाया
मजूर मूक चालती
अंधुक नजरा आतूर पोरे
दूर वरी न्याहळती
घराघरातून भूक पेटते
धूर नभी कोंडतो
बाप्या कुणी बेवडा बाईशी
निष्कारण तंडतो
आचळास झोंबती वासरे
पदरी लेकरू झोंबे
पणती पेटते कुठे आढ्याला
धुरकट कंदिल लोंबे
नित्याचा हा मचूळ दिनक्रम
पुढेच सरकत जाणे
काय कुणाच्या ललाटावरील
पुसू शकू भोगणे
त्या गावातील कोठे असतील
तेव्हाची माणसे
कालवते उरी भरती डोळे
मनही वेडे पिसे
त्यांचे माझे कुठले नाते
कोण कुणाचे असते
धागा स्मृतीचा करी काळाचे
मणी ओढीत बसते
(या करोनाच्या रुक्ष काळात गाव आठवलं, मग ही कविता लिहिली.)
– लीला शाह
*
वाचा
लीला शहा यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
चित्रकथा
लीला शहा या बालसाहित्य, कविता व कथा अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका आहेत.
लीलाताई, खूप सुंदर कविता आहे