.
चिंचोळ्या गल्ल्यांमधली रहदारी मागं टाकून पुढं मोठा रस्ता लागला. अमितचं लक्ष रस्त्याकडं आणि माझं घड्याळाकडं. आता फक्त चार चौक, दोन गल्ल्या आणि त्या पुढचा पूल ओलांडला की पोहोचलो…
अमितनं खचकन ब्रेक दाबला, तशी मी डोक्यातल्या गोंधळातून बाहेर आले. उत्सुकतेनं समोर पाहिलं, तर सतत वाहणारा संपूर्ण चौकच निश्चल झालेला दिसला. चारही बाजूंचे रस्ते गच्च भरलेले; रस्ते जिथं मिळतात ती जागा मात्र रिकामी. मध्येच एक-दोन हॉर्न वाजले. काय झालंय, का थांबलोय ते कोणाच्या नीट लक्षात येईना. आणि मग गजरच सुरु झाला हॉर्नचा. घाईत कोण नसतं आजकाल? सगळ्यांना कुठं-ना-कुठं पोहोचायचं असतं. मध्ये आलेले असले अडथळे परवडणारे नसतातच. त्यामुळे सगळे डोळे चौकाच्या मध्यभागी केंद्रित झालेले. मी पण काही दिसतं का ते बघण्याचा प्रयत्न केला आणि काही क्षणात जे दृश्य समोर दिसलं ते पाहून चकित झाले. कळकट धोतर-सदरा घातलेला एक अशक्त आणि हडकुळा म्हातारा हमाल खचाखच सामान भरलेली हातगाडी ओढत होता. गाड्यावर बांधलेलं सामान त्याच्या उंचीच्या दुप्पट आणि वजनाच्या चौपट असावं! आहे नाही ती सगळी शक्ती एकवटून तो गाडा ओढत होता, हळू हळू पुढं सरकत होता.
व्यवसायानं फिल्ममेकर असल्यानं आसपासचं जगणं त्याच नजरेनं बघायची सवय लागली आहे. डोळ्यांची फ्रेम लगेचच गर्दीतून वर गेली. उंच. आणि या चौकाचा टॉप अँगल शॉट दिसला. चारही बाजूंना झालेली वाहतुकीची कोंडी आणि मध्यभागी अडकलेला म्हातारा हमाल. कट टू – क्लोज शॉट्स. हमालाच्या अशक्त आणि मंद हालचाली.. नैसर्गिकच, पण स्लो मोशन इफेक्ट दिल्यासारख्या भासणाऱ्या. हाता-पायाचे ताठरलेले स्नायू. घामाच्या धारा. दमादमानं पडणारी पावलं. हळू हळू फिरणारी लाकडी हातगाडीची थकलेली चाकं. आसपास खोळंबलेली गर्दी. आणि या कोलाहलातसुद्धा स्पष्ट ऐकू येणारी हातगाडीची केविलवाणी करकर…
देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतक पार झालंय; पण या म्हाताऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळालेलं नाही. गुलामगिरीतून देश मुक्त झालाय; पण हा हमाल आजसुद्धा गुलाम आहे आर्थिक विषमता पोसणाऱ्या समाजाचा. आधुनिक यंत्र, इंटरनेट या सगळ्यांच्या मदतीनं एका क्लिकवर जिथं दळणवळण होत आहे, तिथं हा म्हातारा आपल्या कष्टांचा गाडा अथकपणे ओढतच आहे. मनाशी रंगवलेल्या दृष्यांचा एक कोलाज आणि कल्पिलेल्या आवाजांचा ऍबियन्स उभा राहिला. मनोमन फिल्म तयार व्हायला सुरुवात झाली.
अमितनं दुजोरा दिला. ही बाजारपेठ समजून घ्यावी, हमालांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांवर बोट ठेवावं असं ठरलं. कामाला लागलो. हातगाड्यांवर मालाचं दळणवळण करणारा परिसर शोधून तिथं चकरा मारू लागलो. कुणी हमाल दिसला की त्यांच्या मागं मागं फिरू लागलो. त्यांचा दिनक्रम, कामाची पद्धत, रस्त्याची रहदारी समजून घेऊ लागलो. वयाची पन्नाशी पार केलेल्या हमालांचा डेटा ठेवू लागलो. निरीक्षणं नोंदवू लागलो. अशातच एक अजब माहिती आमच्या कानावर आली. ती अशी की या प्रचंड कष्टांच्या व्यवसायात एक स्त्री गेल्या अनेक वर्षांपासून राबत आहे. सुरुवातीला तर आमचा विश्वासच बसला नाही. पण चौकशी सुरु केल्यानंतर बऱ्याच जणांनी अशी एक म्हातारी रस्त्यानं फिरताना पाहिली असल्याचं सांगितलं. आणि आमचं ठरलं! आता काही झालं तरी या बाईंना शोधून काढायचं. आणि फिल्म त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच बनवायची. शोध आणखीन वाढवला. परिसरात काम करणारे मजूर-हमाल, दुकानदार-व्यावसायिक यांच्याशी बोललो. अमितच्या मामी द्वारकाबाई पवार यांची या कामात मदत झाली. मग मामी आणि त्यांचा मुलगा दिनेश असे दोघं जण आमच्या या शोधात सहभागी झाले. अवघ्या चार दिवसांत त्यांनी आम्हाला त्या बाईंच्या समोर नेऊन उभं केलं.
बाईंचं नाव – बबूताई दामोदर लबडे, ऊर्फ ‘बबई’. वय ८१ वर्षं. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, अंगात चढवलेला सनकोट, त्याच्या खिशात लोकरी कव्हरमध्ये ठेवलेला साधा मोबाईल… या बाईंविषयी विलक्षण कुतूहल वाटायला लागलं. हे कुतुहलच आमचं बोट धरून चालायला लागलं. आणि बघता बघता एक नवीनच फिल्म मनात आकार घ्यायला लागली. पोटात गरिबी आणि श्वासात कष्ट असणाऱ्या बबुताईंची जगण्याच्या संघर्षाची कहाणी – ‘बबई’. ब्लॅक स्क्रीनवर शीर्षक येतं. बंद दारामागचा अंधार . दार उघडलं जाऊन बाहेरचा प्रकाश आत येतो. बबई चप्पल घालते आणि घराबाहेर पडते. टपरीवर चहा पिते. मंदिरात आरती करते. बबईचे रुटीन दाखवणारे विविध शॉट्स आणि त्यानंतर तो मनातला शॉट. टॉप अँगल. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेली बबई. पुढचे मनात रंगवलेले क्लोज शॉट्स. बबईचा आर्थिक-सामाजिक दर्जा, स्त्रीवादाच्या अंगानं केलेला तिच्या व्यवसायाचा उहापोह, तिचं वय अशा विविध अंगांना स्पर्श करणारी मुलाखत हा होणार फिल्मचा मध्य. आणि बबईच्या दुर्दैवी जगण्यातला कारुण्याकडे झुकणारा एखादा प्रसंग, एखादे दृश्य किंवा संदर्भ. अशी कच्चीपक्की संहिता मनोमन तयार झाली.
कॅमेरामन मित्र रोशन मरोडकरशी बोललो. त्यालासुद्धा विषय आवडला. त्यानं त्याची मतं मांडली. कॅमेरा, शॉट्स अशा गोष्टींविषयी चर्चा केली. रफ स्क्रिप्ट, मुलाखतीत विचारण्याचे प्रश्न असं उरलेलं कागदकाम पूर्ण केलं. ‘साऊंड’ची जबाबदारी अमितनं घेतली. बबूताईंचं वय आणि कामाचं स्वरूप लक्षात घेता त्यांच्या दिनक्रमात फार अडथळा न आणता शूट करायचं असं ठरलं. त्यामुळे, शूटिंगचं स्वतंत्र शेड्युल आखण्याचा प्रश्न नव्हता. बबूताईंचं दिवसभराचं शेड्युल हेच आमचं शूटिंग शेड्युल होतं. त्यांच्याशी तसं बोलून तारखा ठरवल्या. आणि ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी हजर झालो त्यांच्या घरी. शेड्यूलमधला पहिलाच शॉट होता – ‘बबूताई दार उघडून घराबाहेर पडतात.’ दार वाजवलं. दाराजवळच झोपलेल्या त्यांच्या मुलानं दार उघडलं. मी विचारलं, “बबूताई आहेत?” सकाळी सकाळी झोप मोडल्यानं वैतागलेल्या त्यांच्या मुलानं उत्तर दिलं, “आई मघाच बाहेर गेली.” आम्ही गोंधळलो. ठरलं होतं, इतक्या वाजता इथं भेटायचं म्हणून. मग अशी चुकामुक कशी झाली? बबूताईंच्या नंबरवर फोन केला, तर त्या फोन उचलेना. पहिल्याच दिवसाचा पहिलाच शॉट फिसकटला. त्या काम करतात त्या दुकानाच्या दिशेनं चालत गेलो तर रस्त्यात भेट होऊ शकेल या विचारानं मी चालू लागले. अमित मात्र दाराशीच उभा होता. मी विचारल्यावर म्हणाला, “बबुताई घरात आहेत. ही चप्पल त्यांचीच आहे.” एवढ्या वेळा भेटलो होतो त्यांना पण त्यांच्या चपलेकडे माझं कधी लक्षच गेलं नव्हतं.
बबुताई इथंच आहेत याचं हायसं वाटलं; पण पहिल्या काही मिनिटातच असहकाराचा इशारा मिळाल्यानं अस्वस्थसुद्धा झालं. शूट फारच आव्हानात्मक होतं. त्यामुळे सगळं नीट होईल ना, मनासारखे शॉट्स मिळतील ना, बबुताई आपल्याला कंटाळणार तर नाहीत ना असे अनेक विचार मनात घोळायला लागले. पुन्हा दार वाजवण्यापेक्षा बबूताई बाहेर येण्याची वाट बघत बसावं असं ठरलं. मग नुसतंच बसण्यापेक्षा तिथल्या तिथं फिरून काही शॉट्स घेतले. साधारणपणे अर्ध्या तासानंतर बबुताई बाहेर आल्या. आम्ही तिघं सगळी उपकरणं घेऊन पहारेकऱ्यांसारखे दाराशी उभे असलेले पाहून बबूताईंना हसूच आवरेना. आम्ही तिघांनी झटपट हवे ते शॉट्स घेतले. त्या क्षणापासून पुढचे तीन दिवस आम्ही तिघं सावलीसारखे त्यांच्या आसपास वावरत राहिलो.
मुलाखतीसाठी डोकं खपवून प्रश्नांची मोठीच्या मोठी यादी तयार केली होती. पुरुषप्रधान समाज, पुरुषांचा वावर असलेली बाजारपेठ, बबुताईंचं अगदी कोवळ्या वयापासून राबणं, आर्थिक अडचणी, वैयक्तिक प्रश्न या सगळ्यांविषयी बोलायचं होतं. स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसुरक्षितता… अशा अनेक विषयांना स्पर्श करायचा होता. बबुताईंकडे पाहिलं की पुणे स्टेशनला असलेला कामगार पुतळा आठवायचा – हताश, थकलेला, मान खाली घालून बसलेला…! प्रचंड कारुण्य दाटून यायचं मनात. पण मी विचार केला होता एक आणि घडलं दुसरंच. बबुताईंची मुलाखत हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग ठरला.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी पहिला प्रश्न विचारला: “तुमचं वय ८१ वर्षं. या टप्प्यावर उभं राहून तुम्ही मागं वळून पाहता तेव्हा काय वाटतं?” बबुताई आपल्या दुर्दैवी जगण्याचं रडगाणं गातील अशी खात्री असताना त्यांच्याकडून आलेल्या उत्तरानं मला धक्काच दिला. उत्तर कसलं, प्रतिप्रश्नच विचारला त्यांनी, “मागं बघायचंच कशाला? पुढं बघायचं!” त्यांचं उत्तर ऐकून आश्चर्यमिश्रित हसू पसरलं माझ्या चेहऱ्यावर. तीन तास मुलाखत चालूनसुद्धा मला अपेक्षित असलेली कारुण्याची छटा किंवा रडगाणं बबुताईंच्या बोलण्यात कुठंच सापडलं नाही. ‘बबई’ नावाची लढवय्या स्त्री आपल्या आयुष्याची घनघोर लढाई अगदी सहजपणे, हसत हसत माझ्यासमोर मांडत राहिली. कॅमेरा-प्रसिद्धी यांच्याशी अजिबात देणं-घेणं नसणाऱ्या बबुताई ‘स्त्रीवाद’ वगैरे कसलाही आव न आणता सहजपणानं बोलत होत्या. बाईच्या जगण्याची विलक्षण कथा मांडत होत्या. डोळ्यांत न मावणाऱ्या एखाद्या विशाल, घनदाट वटवृक्षाकडे विस्मयानं बघावं तशी मी त्यांच्याकडे बघत राहिले. त्यांचं बोलणं ऐकत राहिले. आम्ही ठरवलेला हताश कामगार पुतळा या भन्नाट बाईशी विसंगतच वाटू लागला.
नुसत्याच गप्पा नाही तर बबुताईंचं काम आम्हाला आणखीन जवळून बघता आलं. त्या जातील तिथं शूट करत रोज जवळजवळ ८-१० किमी पायी फिरलो. बघता बघता तीन दिवस संपले. शूटिंग संपवून रोशन मुंबईसाठी रवाना झाला आणि अमितनं फुटेज एडिट टेबलवर घेतलं.
एडिट सुरु करून चांगला आठवडा लोटला होता. अमित पहिला ड्राफ्ट तयार करण्याच्या झटापटीत होता. आता एक नवंच आवाहन आमच्यासमोर होतं. आम्ही कागदांवर मांडलेली स्क्रिप्ट होत्याची नव्हती झाली होती. त्यामुळे फिल्म सुरु कुठून करावी आणि संपवावी कुठं हा प्रश्न आम्हाला सतावत होता. आणि अचानक एक दिवस अमितला सुरुवात सापडली. बबुताईंची वाट बघत असताना रिकामा वेळ होता म्हणून रोशननं सहज शूट केलेलं फुटेज अमितनं काढलं. ते फुटेज एडिट केलं. आणि खरंच फिल्मच्या गाभ्याची ओळख करून देणारी तेवढ्याच ताकदीची एक दमदार सुरवात तयार झाली. ‘धान्याचे दाणे एका पत्र्यावर फेकले जातात. अन्नाच्या आशेनं खूप कबूतरं गोळा होतात. भराभरा दाणे टिपू लागतात. काही आपापसांत भांडतात, काही इकडे-तिकडे न बघता खाण्यात मग्न होतात, काही या सगळ्या कसरतीत उताराकडे घसरत जातात… ट्रकच्या हॉर्नचा आवाज होतो तसे सगळे फडफड करत उडून जातात. आपण रिकामा पत्रा बघतो. उरले-सुरले धान्याचे दाणे उताराच्या दिशेनं सरकत राहतात, पत्र्यावरून खाली गळत राहतात…’ पोट भरण्याचा, जिवंत राहण्याचा संघर्षच आहे जगणं, दुसरं काय?
सुरवात तर जमली. आता राहिला प्रश्न शेवटाचा. पुन्हा पुढचा आठवडा गेला. कच्ची टाईमलाईन तयार झाली. काय ठेवायचं, काय काढायचं याचा बऱ्यापैकी अंदाज आला. आणि अचानक अमित ओरडला, “सापडला शेवट.” मुलाखतीचा एक छोटा तुकडा त्यानं दाखवला.
बबुताई म्हणतात, ‘नवऱ्याच्या दारूपायी एकदा मी विष पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकदा संगम पुलावरून पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाच मुलांना घेऊन रेल्वेच्या रुळावर झोपले. तरी मला मरण नाही आलं. नाही आलं ना मरण, मग आता जगायचं!’
त्यांनी हसत हसत उच्चारलेल्या या वाक्यावरच स्क्रीन ब्लॅक होते…! प्रचंड ऊर्जा देणाऱ्या एका भन्नाट वाक्यावर फिल्मचा शेवट झाला. तीन दिवस शूटिंग आणि ३० दिवस एडीटिंग अशा किचकट प्रवासानंतर फिल्म तयार झाली. पोट भरण्याच्या संघर्षापासून सुरु झालेली फिल्म जगण्याच्या आंतरिक उर्मीवर संपली… आयुष्यभर पुरेल अशी प्रेरणादायी शिदोरी देणाऱ्या ‘बबई’ला मी मनोमन सलाम केला!
******
पूर्वप्रसिद्धी: सकाळ (सप्तरंग) | ३ ऑगस्ट २०१४
BABAI | Documentary | 14 MIN | INDIA, MARATHI
DIRECTOR | Kavita Datir, Amit Sonawane
CINEMATOGRAPHER | Roshan Marodkar
EDITOR | Amit Sonawane
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.