एकदा स्वतःशी बोलत असताना अचानक एक प्रश्न विचारला, ‘तुला रिकामपणा आलाय का?’ मग मनाशी विचार केला, पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला. तर आतून चक्क ‘हो’ असं उत्तर आलं. मग जरा स्वतःशी नाराज झाले. आणि कुठलंतरी पुस्तक वाचावं म्हणून घरातल्या एका पुस्तकाला घेऊन बसले. पुस्तकावर, त्याच्या भरलेल्या पानांवर नजर हळूहळू फिरत होती, पण मन काही त्याच्यात लागत नव्हतं. रिकामपणा तोही माझ्या आतला मला छळत आहे असं वाटून मी पुस्तकात असूनही नसल्यासारखी बसून राहिले.
बऱ्याचदा ही पोकळ असलेली भावना मनाला थांगपत्ता लागू देत नाही. कदाचित या भावनेला अनेक अनुभवांचे, प्रसंगांचे लहानसहान कंगोरे जोडलेले असावे असं वाटत राहतं. पण या गोष्टीकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. कामाच्या धबडग्यात आपण स्वतःला इतकं गाडून घेत असतो की आलेला रिकामपणा तसाच मनात साचत ठेऊन आपलं रोजचं जगणं चालू ठेवतो.
मग पुढे असेच काही दिवस गेले. कामात असूनही येणारा रिकामपणा हा मला भयानक वाटतो. हा रिकामपणा मनात काय काय घेऊन येतो. एक प्रकारची उदासी मनात पाझरत राहते. ती कशी आहे हे कळत नाही. पण जडजड वाटत राहतं. पुस्तकं वाचली, कागद-पेन हातात घेऊन लिहायचं जरी म्हंटलं तरीही हात जड होतो. संगणकावर उगाच आधी जे लिहिलं आहे आणि जे जतन करून ठेवलं आहे ते पाहत राहते. मीच लिहिलेले शब्द माझ्यासाठी पोरके होऊन जात आहेत का? असं वाटू लागतं. पण तरीही घर करून बसलेलं हे रिकामपण मनाच्या तळाशी खोलवर स्वतःला कोरत राहतं आहे असं जाणवतं.
अर्थात असा विचार करत राहणंच मुळात अव्यवहारी आहे असं वाटतं. बाहेर किती भरीव जग आहे. या जगात तुडुंब माणसं आहेत, ओळखीची, अनोळखी, किती मोठा पसारा आहे या जगाचा. मग या जगात रिकामपणा असूच शकत नाही. मानसिक रिकामपणा ही गोष्ट काही फक्त मानसिक आरोग्याशी निगडीत आहे का? माणसाला भरलेल्या घरात, खूप साऱ्या माणसांत रिकामं वाटणं पाप आहे का? किंवा असा विचार मनात येणं हे अनैतिक आहे का? असेही उलटसुलट प्रश्न मला पडतात. आणि भरलेल्या प्रश्नांच्या गाठोड्यात मी स्वतःला एक प्रश्न म्हणून त्यांच्यातच बांधून घेते.
पण कितीही बांधून घेतलं तरीही जीव घुसमटतो. तो काही एका ठिकाणी राहत नाही. मग अश्यावेळी मला कुठेतरी बाहेर जायला, नवीन माणसांशी बोलायला त्यांना जाणून घ्यायला आवडतं. मग नजर शोध घेत असते, कुणीतरी अनोळखी माणूस एका क्षणात ओळखीचा होऊ शकतो असं वाटू लागतं. आणि त्या एका आशेवर कुठल्याही रस्त्यावरून फिरत राहायचं असं वाटतं. म्हणून अशीच एकदा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरून चालत जात असताना एक म्हातारे रिक्षावाले चाचा भेटले. एका कोपऱ्यावर ते भाडं मिळावं म्हणून रिक्षात बसून ग्राहकाची वाट पाहत होते. मला ते जरा वेगळे वाटले. त्यांचा सावळा वर्ण आणि त्यावर पांढरीशुभ्र दाढी, हसरे डोळे पाहून उगाच त्यांच्या रिक्षात बसण्याचा मोह झाला. त्यांच्याशी बोलावं वाटलं. म्हणून त्यांना रिक्षा रिकामी आहे का विचारलं. ते ‘हो’ म्हणाले. मग मी बसले आणि त्यांना कोथरूडला सोडा म्हणून सांगितलं. मला काही कोथरूडला जायचं नव्हतं. फक्त त्यांच्याशी बोलायचं होतं.
‘चाचा, किती वर्ष झाली गाडी चालवत आहात?’ मी बसल्यावर बोलायला सुरुवात करावी म्हणून विचारलं.
‘साठ वर्ष झाली बेटा.’
‘बापरे’ नकळत मनात कौतुक दाटून आलं.
आणि हेही जाणवलं की, पहिल्या वाक्यात आणि भेटीत ते मला बेटा म्हणाले. ते ऐकून मला भारी वाटलं. मलाही आजोबा असते तर साधारण त्यांच्याच वयाचे असते असा एक विचार मनात येऊनही गेला. पण आता त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला हरकत नाही असं वाटलं. आणि मग सुरु झाले.
‘तुमची स्वतःची रिक्षा आहे?’
‘हो, मागच्या दोन महिन्यांपूर्वीच मी सगळं कर्ज फेडलं.’ चालवता चालवता ते माझ्याशी बोलायला लागले.
‘तुमचं वय किती चाचा?’
‘सत्त्याहत्तर’
‘बापरे, तरीही तुम्ही काम करता?’
‘मग काय करू? दिवसभर रिकामा राहू?’
त्यांचा ‘रिकामा’ शब्द मनात रुतून बसला. ते चाचा मग माझ्याशी गप्पा मारू लागले. त्यांना काम का करावं लागतं, त्याचं कारण त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘माझी मुलगी आणि तिची तीन मुलं माझ्याचकडे आहेत. माझा जावई वारला तेव्हापासून. त्या चौघांसाठी काम करतो. आणि घरात बसूनही मी काय करणार? आयतं खाण्यापेक्षा स्वाभिमानाने जगावं. जेवढं होतं तेवढं करत राहावं. काम करायला लाग कशाला बाळगायची.’ हे बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला दिसत जरी नसले तरीही जाणवत होते. त्यांचे डोळे पाणावत होते.
कोथरूड आलं. त्यांना मीटरप्रमाणे पैसे दिले. आणि जाता जाता त्यांना म्हणाले, ‘आणखीन एक विचारू?’
‘हो विचार बेटा.’
‘तुम्ही किती दिवस काम करणार?’
‘म्हणजे, मी आहे तोपर्यंत. तू मला विचारतेस म्हणून सांगतो, मी निरक्षर माणूस आहे. मला फक्त आकडे कळतात आणि माझी सही येते. माझे दिवस आता फार राहिले आहेत असं वाटत नाही. माझ्या मुलीच्या भविष्याची तरतूद मला करावी लागेल. माझ्यानंतर तिला कुणी नाही. झोपडपट्टीत राहणारा मी एक अनपढ आदमी आहे. बँकेचं खाता पण मी खोललेलं नाही. पण रोज पैसे जमवतो आणि माझ्या भावाकडे देतो.’ असं म्हणून त्यांनी रिक्षात ठेवलेली एक पिशवी मला दाखवली. त्यातून एक छोटी वही काढली. तळहाता एवढी असलेली ती वही त्यांनी अगदी जपून ठेवली होती. ती त्यांनी काढून मला काही आकडे दाखवले.
मी उत्सुकतेने त्यांना विचारले, ‘हे काय आहे?’
‘हा हिशेब आहे. मी जर गेलो तर जे काही माझ्याकडे पैसे आहेत त्यातून माझे क्रियाकर्म करायचे आणि उरलेले पैसे माझ्या मुलीला द्यायचे. एवढीच इच्छा आहे. कुणाला माझा त्रास नको.’
ते आकडे अजिबात मोठे नव्हते. पण त्यांना त्याचं खूप महत्व होतं. त्यांनी त्यांच्या कुठल्यातरी भावावर अगदी पूर्ण विश्वास टाकून ते पैसे त्याला ठेवायला म्हणून दिले होते. या एकाच आशेवर तो माणूस जगत होता. मला ते पाहिल्यावर काय बोलावं हे कळत नव्हतं.
‘चाचा, काळजी घ्या.’ असं फक्त मी बोलले.
‘बेटा, देव आहे या जगात. एवढीच माझी म्हाताऱ्याची श्रद्धा बघ. दिवस कामात घालवून श्वास घेत जगत राहायचं. बाकी सगळं त्याच्यावर सोपवायचं.’
‘हो चाचा. अच्छ. निघते मी.’ असं म्हणून त्यांचा हसून मी निरोप घेतला. आणि त्यांच्या जाणाऱ्या रिक्षाकडे पाहत राहिले. मला कोथरूडला जायचं नव्हतं. पण तरीही त्या माणसाशी बोलावं वाटलं म्हणून निघाले. त्यानी जे काही दाखवलं, आणि जे काही ते बोलले ते माझ्या डोक्यात घुमत राहीलं. त्या चाचांकडून किती शिकण्यासारखं होतं. याही वयात जगण्याविषयी केवढी आशा आहे त्यांच्यात. कुठल्यातरी देव नावाच्या शक्तीवर त्यांनी सगळा त्यांचा भार सोपवला जरी असला तरी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत ते रिक्षा चालवतात. त्याचं एक वडील म्हणून जे कर्तव्य आहे ते बजावतात. कुठून बळ येतं त्यांना? केवळ काम करायचं म्हणून ते करत नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातली जी रिकामपणाची पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी स्वतःला सतत कार्यरत ठेवतात. ही गोष्ट एका निरक्षर माणसाला जमतेय, तर मला का नाही? म्हणजे त्यांना ती जमली तर मलाही का नाही जमणार? त्यांची जशी समजूत आहे तशी समजूत करून घ्यायला कदाचित मलाही माझ्या वयाची सत्तरी ओलांडावी लागेल. पण तिशीतच ती गोष्ट मला जर समजली तर पुढची चाळीस वर्षे मला दुसऱ्या गोष्टींसाठी वेळ देता येईल असं वाटत राहिलं. मी असा विचार करत राहिले, आणि स्वतःला पुन्हा एकदा नव्याने बघायला लागणार असं मला त्या क्षणी जाणवलं. कसला तरी शोध लागला आहे मला याची जाणीव झाली.
‘युरेका युरेका’ म्हणूयात का? एक क्षणभर असंही वाटलं. पाकिटात हात घातला. तर पैसे संपले होते. आता पुन्हा रिक्षानं जाता येणार नाही. ए.टी.एम. शोधलं पाहिजे असं स्वतःशी म्हणाले. रिकामं झालेलं पाकीट आणि रिकामं झालेलं मन या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असाही एक विचार मनात येऊन गेला. पण मग रिकाम्या पाकिटात आणि पर्समध्ये वाटेल तश्या ठेवलेल्या चिल्लरकडे माझं लक्ष गेलं. सगळी पर्स हुडकली, पाकीट तपासलं.
शोधल्यावर जे हाती आले ते चिल्लर मोजले तर ते पन्नास रुपये निघाले. मला खूपच आनंद झाला. समोर एका कोपऱ्यात लाल बस थांबा दिसला. रस्ता क्रॉस करून बसची वाट पाहत बसले. माझ्यातल्या रिकामपणावर मी पूर्ण मात करू शकत नाही. तरीही जी काही पोकळ अशी भावना आहे तिला किमान समजून घेऊन जगू तरी शकते या एका विचाराने स्वतःला पछाडून घेतले. आणि येईल त्या बसने कुठेही परत विनाहेतू भटकायचे ठरवून माझ्यातल्या रिकामपणाला सोबत घेऊन मी तिथून निघाले…
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता
चित्रकथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.