पुण्यात तळजाई टेकडीच्या पायथ्याशी खूप जण गाड्या लावून सकाळी आणि संध्याकाळी टेकडीवर जातात. काहीजण चारचाकीतून तर काहीजण दुचाकीवरून येतात. पण बहुतेक माणसं तोंडाला मास्क लावत नाही. काहीजणांचा मास्क हा नाकावर नसतो, तर काहींचा गळ्याशी असतो. तर काहीजण चक्क हाताच्या मनगटाला मास्क लावून गप्पा मारत चालतात.
जणूकाही कोरोना नाहीचे आजूबाजूला असं वाटतं. इतकं बिनधास्त कसं काय असू शकतात माणसं? त्यात म्हातारी, मध्यमवयीन माणसं जास्त आहेत. लहान मुले पण असतात. ते पण त्यांच्या खिशाला, हाताला मास्क लावतात. उघड्या तोंडाने माणसं मॉर्निंग आणि ईव्हीनिंग वॉकला येतात. तळजाईवर माणसांची जत्राच भरतेय. कोरोना नाहीच आहे आजूबाजूला या थाटात आपण जगतोय की काय असं वाटायला लागलं आहे. साधा मास्क वापरायचा नियम आपण पाळत नाही तर मग काय होईल? रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे ढीग, कचऱ्याचे ढीग, आणि मेलेल्या जनावरांचे अवयव दिसतात. लोक तंबाखू खाऊन सर्रास थुंकत राहतात. टेकडीवर, ओढ्याच्या कडेला चकणा घेऊन दिवसा, रात्री दारू पीत बसतात. स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळत नाहीत. कोरोना तर त्यांच्यापासून कोसो दूर आहे असंच वाटतं.
हे चित्र असंच राहिलं तर काय होईल? जे लोक घाबरून अजूनही घराबाहेर पडले नाही, आणि जे अगदी बिनधास्तपणे घरातून बाहेर पडतात, आणि ज्यांना घरातून बाहेर पडणे आवश्यक आहे या सगळ्यांच्या जीवाची किंमत किती आणि कशी मोजायची?
एका गाडीवर चार- चार जण मास्क न लावता चिटकून बसून जोरात जातात ते पाहून मन अस्थिर होतं. कौशल्य नसलेली, अर्धवट शिक्षण झालेली , हातात काम नसलेली आणि बहुतांश काम करण्याची इच्छा नसलेली तरुण मुले ओढ्याकडे बसून प्लॅस्टिकच्या ग्लासातून पीत बसलेली दिसतात, काहीजण जाळे लावून मासे पकडत बसतात. घरांवर घरे बांधून वाढलेलं शहर या सगळ्यात खूप केविलवाणे दिसत राहतं. शहरांचा बकालपणा वाढतोय आणि सोबत रिकामपणा वाढतोय. भविष्य उज्ज्वल असणारच या एका आशेवर नुसतं जगून कसं चालेल? नाही का…
*
वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता
चित्रकथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.