महाडचे दिवस १४: अनपेक्षित अपेक्षित

Mahadche-divas-14-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-deepak-parakhi-marathi-kadambari-online-free-pdf

सकाळ झाली. मला जाणवत होतं की कुरेशी वाट पाहतोय, कोल्हे आणि एनएम इकडं तिकडं जायची. पण ते होत नव्हतं. शेवटी मी कारण नसताना रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. काही मिनिटातच कुरेशी तिथं आला आणि म्हणाला,
‘‘तू सांगितलं नाहीस; पण काल तुला इतकी पत्र कुणाची आली?”
त्याचा अंदाज घेण्यासाठी म्हटलं की, “एक वडलांचे होतं आणि दुसरं एका मासिकाच्या संपादकांचं. त्यांनी माझी कथा नाकारलीय. त्यामुळं तुला काही बोललो नाही.’’
मी वाट पहात होतो, तिसऱ्या पत्रांविषयी तो विचारेल. लक्षात आलं की अगदी जाताजाता त्यानी पत्रांबद्दल विचारलं होतं. आता मी स्वतःहून सुनंदा वर्तकच्या संदर्भातील अनिलच्या पत्राचं सांगू की नीला खानोलकरच्या? मी काहीच पुढं बोलत नाही म्हटल्यावर तो परत खोलीत आला. मीही त्याच्या मागोमाग. नंतर कोल्हे आणि एनएम माझ्या मागोमाग.

माझी जवळपास खात्री पटली की सुनंदा वर्तक त्याच्या डोक्यातून गेलीय. मी स्वतःहून नीलाचं पत्र त्याला वाचायला दिलं. त्याचा चेहरा उमलल्यासारखा वाटला. म्हणाला,
“जोशी, तू माझ्या मैत्रिणीबद्दल विचारत होतास; पण तूच छुपा रुस्तुम निघालास. तुलाही मैत्रीण आहे की.”
नीलाच्या या ‘असल्या’ पत्राला तो महत्त्व देत होता आणि मी अनिल करंदीकरच्या ‘तसल्या’ पत्राला. ज्याला मी तसलं पत्र म्हणतोय त्याबद्दल कुरेशीला काहीच उत्सुकता नव्हती. सुनंदा आणि नीला हे दोन्ही विषय मी माझ्यापुरते बंद केलेत, असं स्वतःशी ठरवून टाकलं.

दुपारी साळीसाहेबांनी दोन बातम्या दिल्या. एक होती स्वामींची बदली सोलापूरला झालीय. स्वामींचा चेहरा खुलला होता. आणि दुसरी सबडिव्हिजनचा आकार वाढतोय, त्यामुळं स्टाफची बसायची पंचाईत होतीय. जागा लहान पडतीय. लवकरच ऑफिसचं स्थलांतर होतंय. सुंदर टॉकीजजवळ एक बारा बाय वीसचा हॉल आणि त्यावर त्याच आकाराचा पोटमाळा अशी जागा मिळतीय. साहेबांसह सगळ्यांनी स्वामींचं अभिनंदन केलं. मी मात्र नाही केलं कारण तो कितीही सामान्य वकुबाचा असला तरी सव्वा महिन्यात आधी सहकारी, नंतर मित्र या दोन्ही भूमिका उत्तम पार पाडत होता.

ऑफिस सुटल्यावर मी, कुरेशी, कोल्हे आणि एनएम असे चौघे बाजारात फिरत होतो. अंबादास बेकरीकडून गोकूळच्या दिशेनी येत होतो. समोरून दोन मैत्रिणी एकमेकींशी हातवारे करत बोलत येत होत्या. त्यांच्या आणि आमच्यामध्ये दहाएक फुटांचं अंतर होतं. कुरेशी माझ्या कानात म्हणाला, ‘‘या दोघी आपल्याला क्रॉस होतील.. त्यानंतर मी सरळ चालत जाईन.. तू मागं वळून बघ. त्यातली साडीवाली मागं वळून बघेल, असं मला वाटतंय.”

कुरेशींनी सांगितलं म्हणून पुढं गेल्यावर मी मागं वळून बघितलं. खरंचच ती मागं वळून बघत होती. थोडं पुढं जाऊन एका दुकानात कुरेशी थांबला. दुकानदारही अगदी टाळ्या देत बोलत होता. साधं होजियरीचं दुकान होतं ते. कुरेशींची या दुकानदाराशी इतकी दोस्ती कधी झाली? मी नवल करत असताना त्या दोघी उलटं फिरून गालातल्या गालात हसत दुकानाशी येऊन थांबल्या. त्या दोघींना टॉवेल खरेदीची निकड भासत होती तर कुरेशीला बनियनची. मी एकटाच पुढं चालत राहिलो.

दुसऱ्या दिवशी मी साहेबांकडं गेलो आणि म्हणालो,
“मला जे काम तुम्ही सोपवताय ते मी करतोच आहे. पण मोकळ्या वेळेत मी अभ्यास करत बसलो तर चालेल का?”
मी सोपवलेलं काम तत्परतेनं करतोय आणि गावगप्पात वेळ घालवायला मला आवडत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग करू इच्छितो, हे मी खुबीनं त्यांच्या कानावर घातलं. अपेक्षेप्रमाणे ते ‘हो’ तर म्हणालेच; पण पुढं म्हणाले, ‘अभ्यासात काही अडलं तर विचारायला या, मी सगळी मदत करीन. एकदाचं पास होऊन टाका.. नंतर आपल्याला खूप कामं करायचीत.’

साहेबांच्या गुडबुक्समध्ये तर जाऊन बसलो. प्रश्न मला काही अडलं तर विचारण्याचा. काय अडतंय हे समजायला पुस्तक उघडायला तर हवं ना. तीच बोंब होती. पुस्तक हातात धरवतंच नव्हतं. आता साहेबाना इतकं विचारलंच आहे तर करावा अभ्यास. साडेचार वाजले होते. मी पुस्तक हातात घेतलं. वाचत राहिलो. आणि ते चक्क थोडं थोडं मला समजायला लागलं होतं. त्यातला गणिती भाग जास्त इंटरेस्टिंग वाटत होता. मी मान वर केली तर कुणीच नाही. शिपाई म्हणाला,
‘‘साहेबांनी सांगितलंय की ऑफिस सुटलं आणि जोशी अभ्यास करत बसले असले तर ऑफिस बंद करायची घाई करू नको. काय करू जोशीसाहेब?”
हे विचारताना त्याच्या हातात कुलूप किल्ली होती.  

मी खोलीवर यायला निघालो. वाटेत कोल्हे आणि एनएम दिसले. मी तसाच पुढं गेलो तर गुजर. विचार केला परवा इतकं बोलत होते. निदान दिसतायत तर त्यांची दखल घ्यावी. ते नेहमीचे गुजर होते. तोंडातून शब्द न काढणारे. समोर काय घडतंय ते फक्त टुकुटुकु बघणारे.
मी विचारलं, “काय म्हणताय गुजर?”
ते गप्पच. मग मी जायला निघालो तेव्हा मला म्हणाले,
“एक सांगायचंय. मी कुणालाच बोललो नाही.. तुम्हीही बोलू नका. जयश्रीचं लग्न पार पडेल असं वाटत नाही. मला तिची लक्षणं ठीक दिसत नाहीत. एका चांगल्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करायचं पाप मी आयुष्यभर कशाला वागवत राहू? आता एकदम तिला तिच्या ताईच्या म्हणजे आमच्या बायकोच्या बोलण्यात तथ्य वाटायला लागलंय. शिक्षण अर्धवट सोडायची तिची तयारी नाही.”
इतकं ते बोलले आणि चालायला लागले. मला ती सूचना होती की निघा.

मी खोलीवर आलो. दार किंचित लोटलेलं. उघडून आत आलो तर कॉटवर कुरेशी बसलेला. जुनाच पेपर चाळत होता. मी तोंडावर पाणी मारावं म्हणून आतल्या खोलीत जायला निघालो तेव्हा कुरेशी म्हणाला,
“थांब जरा. नंतर जा.”
मला काही समजेना. मी खोलीच्या बाहेर अंगणात आलो. पाट्यावर मुन्ना नव्हती. घरात तिचा अम्मीशी बोलण्याचा आवाज येत होता. तीन-चार मिनिटांनी मी पुन्हा खोलीत आलो. तेव्हा दोन खोल्यांमधलं दार उघडं होतं. दाराच्या चौकटीत ती उभी होती. काल बाजारात पलटणारी. टॉवेल खरेदी करणारी. साडी कालचीच होती. केस मुद्दाम विंचरून चापून बसविलेले, चेहऱ्यावर एक बेमुर्वतखोरपणा. नजरेत पटकन बाहेर पडायची घाई.

मी बाजूला सरकून जागा करून देताच ती बाहेर पडली. कुरेशीही तिच्या मागोमाग बाहेर पडला. मी खोलीत नजर फिरवली. सेंटचा वास दरवळत होता आणि कॉटवर मी पुण्याहून आणलेली गादी, बेडशीट, उशी होती पण ती विस्कटलेली.

सुनंदा वर्तक हे प्रकरण का विस्मृतीत गेलं होतं या कोड्याचं उत्तर मला शब्दाविना मिळालं होतं. शहापूरकरच्या अर्धवट बोलण्याचा अर्थ मला आत्ता समजला होता. नीलाचं साधंसुधं पत्र किती मोलाचं आहे, हे आकळत चाललं होतं. मी समजतोय तसा कुरेशी नाही आणि मी समजतोय तसा विनय जोशीदेखील नाही. 

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा

डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :