झॅक स्नायडर व्हर्सेस स्नायडर कट

chitrakshare-chitrapatvishayak-lekh-vivek-kulkarni-snyder-cut-justice-league-marathi-goshta-creations-saarad-majkur

‘स्नायडर कट’ ही गेल्या काही वर्षातली सर्वात चर्चिली गेलेली गोष्ट. २०१७ चा ‘जस्टीस लीग’ प्रेक्षकांना न आवडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सेन्सेशन निर्माण करू शकला नाही. त्यामुळे ‘स्नायडर कट’ यावा यासाठी ट्विटरवरून चाहते झॅक स्नायडरला मनधरणी करत होते. २०१७ च्या जस्टीस लीगच्या चित्रिकरणा दरम्यान त्याच्या वीस वर्षाच्या मुलीनं, ऑटमनं आत्महत्या केली. त्या आघातामुळे आपण सिनेमा पूर्ण करू शकणार नाही असं सांगून त्यानं सिनेमा सोडला. तोपर्यंत त्यानं ७०-७५% काम केलं होतं. सिनेमा रिलीज करणं गरजेचं होतं. म्हणून मग ते काम मार्व्हलमध्ये यशस्वी ठरलेल्या जॉस व्हीडनला निर्माते वॉर्नर ब्रदर्सनी दिलं.

लेखाचं शीर्षक स्नायडरशीच निगडीत आहे, कारण २०१७ च्या जस्टीस लीगचं डिरेक्टरचं क्रेडिट स्नायडरला देण्यात आलंय. फिल्म बघताना ते दिसून येतं. सिनेमा थिएटरला रिलीज झाला तो व्हीडननं दिग्दर्शित केलेला होता. पण स्नायडरच्या करारात डिरेक्टरचं क्रेडिट देणं बंधनकारक होतं, म्हणून ते तसंच ठेवण्यात आलं. व्हीडननं काय बदल केले व स्नायडरनं त्याच्या कटमध्ये नेमकं काय केलंय हे जाणून घेण्याअगोदर ‘डिरेक्टर्स कट’ काय असतं ते जाणून घेऊया.

‘डिरेक्टर्स कट’ म्हणजे सिनेमा एडीट करताना दिग्दर्शकाच्या दृष्टीनं कथा पडद्यावर कशी दिसायला हवी, यासाठी केलं गेलेलं संकलन. यात बऱ्याचदा निर्माते सिनेमा यशस्वी व्हावा म्हणून दिग्दर्शकाला न जुमानता त्यांना हवा असलेला सिनेमा एडीट करून घेतात. तसेच सिनेमाची लांबी बघण्यालायक असावी, असाही उद्देश असतो. त्यामुळे काही महत्त्वाचे प्रसंग, प्लॉट पॉईंट्स असणाऱ्या सीन्सना कात्री लावली जाते. पुढं जेव्हा सिनेमा डीव्हीडी किंवा ब्ल्यू-रेवर रिलीज करायचा असतो, तेव्हा ‘एक्स्टेंडेड’ किंवा डिलीटेड सीन्ससहित ‘स्पेशल एडिशन’ म्हणून रिलीज केला जातो. त्यात दिग्दर्शकानं नेमकं काय काम केलंय हे बघायला मिळतं. यात अजून एक प्रकार हॉलीवूडमध्ये दिसून येतो. तो म्हणजे सिनेमाचं चित्रीकरण चालू असताना निर्माते व दिग्दर्शकात सिनेमा कसा असावा यावर खटके उडायला लागले की निर्माते दिग्दर्शकाची उचलबांगडी करतात. त्याच्याऐवजी त्यांच्या मर्जीतला, त्यांना हवा तसा सिनेमा दिग्दर्शित करून देणारा दिग्दर्शक नियुक्त करतात. ‘सुपरमॅन २’ (१९८०) च्यावेळी निर्मात्यांनी दिग्दर्शक रिचर्ड डॉनरला काढून टाकून रिचर्ड लेस्टरला ते काम दिलं. पुढं २००६ मध्ये ‘सुपरमॅन २ – द रिचर्ड डॉनर कट’ या नावानं तो सिनेमा डीव्हीडी व ब्ल्यू-रेवर रिलीज करण्यात आला. हॉलीवूडमध्ये ही परंपरा सत्तरच्या दशकापासून चालत आली आहे. त्यामुळे, बऱ्याच सिनेमांचे ‘ओरिजिनल थिएटर कट’ व ‘डिरेक्टर्स कट’ असे एकाच कथानकाचे दोन भाग बघायला मिळतात.

जॉस व्हीडननं दिग्दर्शित केलेला जस्टीस लीग व स्नायडर कटमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. मुख्य कथानक तेच असलं तरी दिग्दर्शकीय व्हीजन कथानक प्रभावित करायला किती महत्वाची असते, ते यातून दिसून येतं. व्हीडनचा टोन पूर्णतः मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये त्यानं केलेल्या कामासारखा आहे. त्यामुळे सिनेमा हलकाफुलका झालाय; जो स्नायडरनं मॅन ऑफ स्टीलपासून (२०१३) नोलनच्या बॅटमॅन मालिकेशी साधर्म्य वाटेल असा ठेवला होता, त्यापासून पूणर्तः फारकत घेणारा आहे. ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन: डॉन ऑफ जस्टीस’मध्ये (२०१६) शेवटाकडे सुपरमॅन मरतो, असं दाखवलंय. तर व्हीडननं सिनेमाची सुरूवात सुपरमॅनची हसरी छबी दाखवून केली. त्यानंतर लगेचच बॅटमॅन एका पॅराडिमन्सच्या मागावर असतो, असं दाखवलंय. वंडर वूमनची एन्ट्री झाल्यावर तो लगेचच अॅक्वामॅनला भेटायला जातो. त्याला एक टीम तयार करून संभाव्य युद्धाला तयार राहायचं असतं. तसेच सुपरमॅनच्या मृत्यूला आपण कारणीभूत ठरलो याची टोचणी लागलेली असते, ती पण त्याला स्वस्थ बसू देत नसते.

स्नायडर कट ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ जिथं संपतो तिथनं चालू होतो. त्यामुळे प्रेक्षकाला नवीन घटना, प्रसंग मनात रजिस्टर करून त्यांचं पूर्वीच्या सिनेमाशी काय नातं आहे, हे पडताळून पहायची गरज भासत नाही. तो लगेच कथेत ओढला जातो. तसेच स्नायडरनं त्याच्या मूळ स्क्रिप्टमधील कथानकालाच प्राधान्य दिल्यामुळे यात व व्हीडनच्या कटमध्ये फरक स्पष्ट दिसून येतो. उदा. वंडर वूमनचा शाळेतील मुलांना वाचवण्याचा प्रसंग. यात व्हीडन झटपट कट्समध्ये तिची मुलांना वाचवण्याची धडपड दाखवतो. तर स्नायडर हाच प्रसंग बराच वेळ घेऊन तपशिलात तिची अतिरेक्यांना मारण्याची व एका ब्रीफकेसमधील बॉम्ब सर्वांपासून दूर नेऊन नष्ट करण्याची पद्धत दाखवतो. शेवटी ती त्या अतिरेक्याच्या म्होरक्याला मारते तेसुद्धा तो दाखवतो. व्हीडन इथं कट करून बॅटमॅन अॅक्वामॅनला भेटायला जातोय असं दाखवतो.

हा वानगीदाखल प्रसंग सांगितला. स्नायडरच्या मुलीनं आत्महत्या केली नसती तर त्यानं सिनेमा पूर्ण करताना वेळ घेऊन तपशिलात त्याला या कटमध्ये जे आहे तेच दाखवलं असतं. यानं सिनेमाची लांबी वाढली असती, पण मार्व्हलचे तीन तासांचे सिनेमे बघणाऱ्या प्रेक्षकांनी डीसीचा हा सिनेमा आनंदानं स्वीकारला असता. दुसरा मुद्दा मार्व्हलमध्ये अॅव्हेन्जर्सची टीम आहे, तशीच टीम इथं तयार करण्याची गरज स्नायडर वाटली असणार. कारण यात बॅटमॅन, सुपरमॅन, वंडर वुमन, फ्लॅश, अॅक्वामॅन व सायबॉर्ग यांच्यासोबतच मार्शियन मॅनहंटर हे एक नवीन पात्र इंट्रोड्यूस केलं जातं, जे व्हीडनच्या सिनेमात दाखवलेलं नव्हतं. या नंतरच्या भागात ही सर्व मंडळी मिळून ‘डार्कसाईड’शी दोन हात करतील, असं दिसतं. हे मार्व्हलच्या अॅव्हेन्जर्सनी एकत्र येऊन थॅनॉसशी युद्ध करण्यासारखंच आहे. तसेच, डार्कसाईड हा डीसीचा थॅनॉस असावा असं एकूण त्याचं व्यक्तिमत्व आहे.

मला व्यक्तीशः न आवडलेल्या दोन गोष्टी आहेत. पहिली विक्टर जो सायबॉर्ग झालाय त्याच्या बॅक स्टोरीला दिलेलं महत्त्व. व्हीडन काही संवादांमध्ये त्याच्यासोबत काय झालं व तो कसा सायबॉर्ग झाला हे सांगतो. स्नायडर त्याचा भूतकाळ दाखवतो. त्याचं अमेरिकन फुटबॉलमध्ये भाग घेणं, त्याचा अपघात, त्याच्यावर त्याच्या वैज्ञानिक वडिलांनी केलेला प्रयोग व त्याचं सायबॉर्ग होणे अशी तपशीलवार उपकथा येते. इथं पटकथेच्या पातळीवर यावर कात्री चालवायला हवी होती. कारण ही अनावश्यक माहिती प्रेक्षकांना दिली जाते. त्याच्या लेखी याला महत्वच राहत नाही. मदर बॉक्सेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना वेगळं करण्याचं काम सायबॉर्ग करतो, ते प्रेक्षकांच्या लेखी महत्वाचं आहे. सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला असता तर स्नायडरला मन मारून संकलनात या भागाला काढून टाकावं लागलं असतं.

दुसरा मुद्दा एपिलॉगची लांबी. सिनेमा संपतो तेव्हा साडे तीन तास झालेले असतात. आपले पेशन्स संपलेले असतात. तरीही अजून अर्धा तासाचा सिनेमा उरलेला असतो. त्यातही हा एपिलॉग वीस मिनिटांचा आहे, एंड क्रेडिट्सची दहा मिनिटं सोडली तर. एपिलॉगमध्ये मार्शियन मॅनहंटर या पात्राला दाखवलं जातं. तसेच भविष्यात नेमकं काय घडणारे याची चुणूक दाखवली जाते. ज्याचा संबंध बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅनमधील भविष्यातील फ्लॅश बॅटमॅनला लोईस लेनबद्दल माहिती देतो त्याच्याशी आहे. इथं जोकर तिचा उल्लेख करून भविष्यात काय झालं असेल याचा अंदाज करायला प्रेक्षकांना भाग पाडतो. ही मालिका जर पुढं येणार असेल तर ती कुठल्या दिशेनं मार्गक्रमणा करेल यासाठी आहे हे उघडच आहे. पण तोपर्यंत सिनेमाची लांबी इतकी वाढलेली असते की तो का उगाच दाखवलाय असं वाटतं. असंही सिनेमाऐवजी सहा भागांची सिरीज करायची असं स्नायडरनं सांगितलंच होतं. मग सलग चार तासापेक्षा दोन तासांचे दोन व्हॉल्युम्स केले असते तर एपिलॉग बघायला काहीही वाटलं नसतं. या उपरही प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला हे जास्त महत्वाचं.

यावरून प्रेरित होऊन भारतीय सिनेमांचेदेखील डिरेक्टर्स कट यावेत, असं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. त्यात शोले, चक दे इंडिया, मनकर्णिका, अंदाज अपना अपना, दिल्ली ६ या व इतर सिनेमांचा उल्लेख आहे. ते येतील तेव्हा येतील, पण स्नायडर कटनं प्रेक्षकांचा दिग्दर्शकाप्रती असणारा अढळ विश्वास अधोरेखित केला हे नक्की.

*

वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा


Content Writer at Freelance | Website | + posts

विवेक कुलकर्णी यांचं शिक्षण एमए इंग्लिश झालेले असून ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत - लातूर पॅटर्न (२०११), अनरउबिक (२०२०) व माधवराव एकंबीकर (२०१९). विवेक चित्रपट समीक्षक म्हणून दै. मराठवाडा नेता, दै. मी मराठी लाईव्ह, अक्षरनामा, वास्तव रूपवाणी, बहुविध व चित्राक्षरे या माध्यमांसाठी नियमितपणे लेखन करतात.

1 Comment

  1. Avatar

    Mr Vivek Kulkarni is a fabulous writer of the new generation. His writing touches heart and soul. Somewhere he makes us to compare ourselves with the characters of his novels and short stories. I am really impressed with his writing.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :