१९५८ साल. डिसेंबर महिना. नवीन मराठी शाळा . इयत्ता दुसरी तुकडी अ. वर्गशिक्षिका जोगबाई हातात एक कागद घेऊन उभ्या. नाव वाचतात आणि त्याला किंवा तिला बाजूला काढतात. बाजूला उभी असलेली मुलं दिसायला देखणी आणि अभ्यासात चांगली. पंचेचाळीस मुलातील पंधरा मुलं हसत खिदळत बाजूला उभी. थोड्या वेळात पांढऱ्या शुभ्र साडीतील सोवनीबाई येतात. उभ्या असलेल्या मुलांवरून नजर फिरवतात आणि म्हणतात,
“जोगबाई, मला अजुनी दोन मुलग्यांची गरज आहे. ”
जोगबाई म्हणतात,
“सोवनी.. हा सुरेंद्र देवळे आणि दीपक पारखी. “
खूप वेळानी लक्षात येतं की संमेलनातील एका कार्यक्रमात आपल्याला घेतलंय. या निवडीचा आनंद मला दोन कारणांनी झाला. एक म्हणजे गालांना आणि कपाळाला लाली लागणार तर ओठांना लिपस्टिक. या गुलाबी रंगानी आपण गोरे दिसणार. दुसरी गोष्ट गेल्या वर्षी समजली होती, की संमेलनाच्या हॉलमध्ये प्रवेश करताना सर्वांना पांढऱ्या प्रवेशिका दिल्या जातात तर कार्यक्रमात सहभागी मुलांना पिवळ्याधमक रंगाच्या प्रवेशिका. याचा अर्थ आपल्या तोंडाला लाली लागणार आणि आपण हॉलमध्ये पिवळी प्रवेशिका दाखवून दिमाखात प्रवेश करणार.
एक नाटुकलं बसवणं चालू झालं. सिंहासनावर राजा आणि राणी बसलेले आहेत. मंत्री आणि सेनापती राजाला राज्यात काय चालू आहे ते सांगतायत. एक सामान्य नागरिक त्याचं गाऱ्हाणं मांडायला दरबारात यायचा प्रयत्न करतोय. त्याला दोन द्वारपाल अडवतात. एक द्वारपाल सुरेंद्र देवळे आणि दुसरा मी. दहा मिनिटाच्या त्या प्रवेशात माझं काम इतकंच.
पहिल्या दिवसाची तालीम झाली. मी घरी येऊन आजीला विचारलं,
“हे द्वारपाल का असतात गं आजी ?” आजी म्हणाली,
“राजाच्या जीवाला नेहमी धोका असतो, यामुळं कुणीही राजासमोर थेट जाऊ शकत नाही. द्वारपाल त्याला अडवतात. म्हणजे ते पोलीस असतात.”
आजीनी माझी शंका फेडली आणि माझी चाल सुधारली. डोळे तीक्ष्ण झाले, कान आणि नाक टवकारले जायला लागले. घरातील तीनचाकी सायकलवर बसताना रथात बसलोय असं वाटायला लागलं. सोवनीबाईंना मी विचारलं,
“माझे कपडे काय असतील ?” त्या म्हणाल्या,
“पांढरे धोतर, हिरवा शेला, गळ्यात मोत्याची माळ आणि डोक्यावर छोटा मुकुट. खांद्यावर गदा. ओठांवर गलेलठ्ठ मिशा.”
वाड्यातील मोठ्या मुलांबरोबर खेळताना एरवी लिंबूटिंबू असणारा मी रुबाबात त्यांच्याशी भांडायला लागलो. अर्धी पोळी आणि कुरकुरत भाजी खाणारा मी एक पोळी आणि पालेभाजीदेखील खायला लागलो.
तीन दिवसांच्या तालमीनंतर अचानक घाटे नावाचा मुलगा आमच्यात सामील झाला. तालमीसाठी आलेली मुलं पाहून सोवनीबाईंनी मला बाजूला घेऊन म्हटलं,
“पारखी, तुझं काम हा घाटे करणार आहे. तू वर्गात गेलास तरी चालेल. “
मला रडायचंही भान राहिलं नाही. माझी आजी सुनेला म्हणजे माझ्या आईला वाटेल तसं बोलायची, तेव्हा आईदेखील रडू शकायची नाही. माझी ती अवस्था पाहून बाई म्हणाल्या,
“तुझा जोडीदार देवळे आहे ना, तो तुझ्यापेक्षा उंच आहे. त्यामुळं तुमची जोडी जमत नाही. घाटेशी देवळेची उंची जमते. तुला पुढच्या वर्षी नक्की नाटकात घेऊ.”
दहा दिवसांनी मी संमेलनाच्या हॉलमध्ये पांढरी प्रवेशिका घेऊन प्रवेश केला. ओठ, गाल आणि कपाळ मूळ रंगात होतं, ओठांवर मिशा आणि खांद्यावर गदा नव्हती… डोळ्यात स्वप्न नव्हतं… होते थिजलेले अश्रू!
*
वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!