विषभरल्या नजरा,
चढल्या, झोंबल्या, डसल्या
आणि मी रक्ताळले तरीही
लेऊन उरलेली कातळी
मी रस्त्यानी चालतच जाईन.
मी रस्त्यानी चालतच राहीन
जखमेनंतरचा प्रत्येक व्रण मिरवत
तेव्हा अहंकार तुमचा फोफावेल
सोडाल माझ्या पंखांवर तुम्ही
कुविचारांच्या मुंग्या
आणि कातरलेल्या पंखांनी
मी वारा तुडवत उडतच राहीन.
मी उडताना बघून
रोवाल आकाशात तुम्ही
कुप्रथा आणि कुरितींचे विषारी बीज
मी घायाळलेल्या श्वासांत
भरून अर्धमेले प्राण
उडी समुद्रात घेईन
आणि उरलेले अस्तित्व एकवटून
मी पोहतच राहीन
काटत जाईल समाज तुमचा
मला येणारी नवीन फांदी तरीही
मी शोधून धरित्रीच्या पोटात पाणी
पालवी बनून परत फुटत जाईन
पेटवाल जरी बाईपण माझं
आणि पसरवाल वणवा
मी बनून पृथ्वी पसरेन चहूकडे
आणि जगतच राहीन.
– एल. प्रियंका
*
वाचा
कविता
चित्रकथा
चित्रपटविषयक लेख
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
मी एल. प्रियंका. पुणे विद्यापीठाच्या भाषा आणि संज्ञापन विभागातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन आता गोंदिया जिल्ह्यात स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाचे काम करते. 'न्यूबॉर्न पोएट्री' या माझ्या पहिल्या लघुपटाची निवड काही चित्रपट महोत्सवांमधे झाली असून अजूनही महोत्सवांचा प्रवास सुरू आहे. हिंदी आणि मराठी या भाषांमधे मी काव्य, लेख आणि चित्रपटासाठी लिखाण करते.