पुरुषाच्या नजरेतून

१) जन्म

बाईपण शोधत-शोधत,
मी—
बाईच्या गर्भात शिरलो.

मला आता,
बाईचा जन्म—
घ्यावा वाटतोय.

२) पुरुष नजरेतून

१)
अक्षांश रेखांश—
लगडलेले असतात का देहाकृतीला ?
मी माझ्या पुरुष नजरेतून—
न्याहाळतो
सर्वांग तुझं.

२)
तू वसुधे सारखी—
सगुण.
मी दिनकरा सारखा—
दैदिप्यमान.
मी तुझ्या गर्भावर गाजवतो;
हक्क माझा.

३) पुरुषपण

मी तुझ्या सौंदर्याचं—
वर्णन करत असताना,
तु सुरु करतेस—
Thank you – Thank you चा पगडा…

Thank you च्याही पुढे—
एक भावना एक भावना असते,
जी मला व्यक्त करता येत नाही.
जी मला तुझ्याकडून काढून घ्यायची असते.

मी उतावीळ होत जाताना—
तू नि:शब्द होतेस.
तेव्हां—
माझ्यातून उफाळून येणारा—
वासनेचा उमाळा मी थंडपणे सोडून देतो.
तरी—
माझ्यात शिल्लक असलेलं पुरुषपण
नकळत,
बाईपणावर रेलून बसतंच.

४) स्री-पुरूष

पुरुषाच्या जागी पुरुष आहे.
स्त्रीच्या जागी स्त्री आहे.
दोघांमध्ये—
अमर्याद अंतर आहे.

दोघं समांतर आहेत.
दोघं एकरूप आहेत.
दोघं एकमेकांना छेदून:
अनंतात पोहचलेले आहेत.

दोघेही विकारी आहे.
षड्-रिपुंनी ग्रासलेले आहेत.

ह्या सृष्टीवर—
निराकार आहेत दोघं
स्री आणि पुरुष.

– श्रीकांत कदम

*

वाचा
कविता

चित्रकथा
चित्रपटविषयक लेख
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची


shrikant kadam
श्रीकांत कदम
+ posts

मी लिहीत असलो तरी; मी स्वतःला कवी, लेखक म्हणत नाही. मी जे लिहितो त्याला 'कविताच म्हणावी का ?' हाही माझ्यातला संभ्रम आहे. माझ्या जाणिवेतून, नेणिवेतून प्रतिभारुपाने जो भाव प्रकटतो त्याचं मी टिप्पण करतो. मला माझ्या लिखाणामागचा उद्देश जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत मी मनातल्या भावना शब्दात गुंफणारा एक माणूस असेन. तुम्हाला ह्या भावना आवडल्या तर नक्की प्रतिक्रिया द्या.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :