प्रिय आज्जी,
माझं आणि सुजयचं जे बोलणं झालं त्यावर मी बराच विचार केला. माझ्या मनात न्यूनगंड वाढू लागला आहे का या प्रश्नाचं उत्तर आत्ता तरी मला सापडत नाहीये. मी मेघनाला मेसेज केला तर ती म्हणाली की ‘मी पुढच्या आठवड्यात बोलते आत्ता जरा बाहेर आहे’. मी पूर्वा ताईशी बोलणार होतो पण तिने फोन उचलला आणि इतक्या आनंदाने काहीतरी सांगायला लागली की मग मी काहीच बोललो नाही. ती कशाबद्दल बोलत होती ते मी फोन ठेवल्या ठेवल्या विसरलो.
अश्विनीशी अजून बोललो नाही कारण सध्या आम्ही फारसं बोलतच नाहीये. म्हणजे नेहमीचं बोलणं होतं, पण मेसेजेस वर. ‘गुड मॉर्निंग’, ‘ऑफिसमध्ये बरंच काम होतं’, ‘आज खूप दमल्येय’, ‘या विकेंडला नक्की बोलूया’ इतपतच असतं ते सारं. अविनाशशी बरेच दिवसात मी बोललो नाहीये पण असलं काही सिरिअस बोलायला त्याला फोन केला की मग तो स्पष्ट बोलतो, ज्याने अजूनच त्रास होतो. मयुरीशी मी इतकं सिरिअस होऊन फारसं काही बोललो नाहीये आणि ती कायमच ‘हेही दिवस जातील’ याच प्रिन्सिपलवर जगत असल्याने तिचं उत्तर सगळ्याला एकच आणि ठरलेलं असतं की ‘अरे थोडा वेळ गेला की होईल सगळं व्यवस्थित आणि मग आत्ताचं आठवून आपण दोघंही हसू.’
माझा ना आज्जी, गजानन नावाचा एक मित्र होता कॉलेजला. तो माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मनाने खूप चांगला. आमच्या कॉलेजमध्ये लायब्ररी व्यतिरिक्त एक वर्ग तो स्टडी रूम म्हणून चालवायचा. मी त्या स्टडी रूममध्ये जायचो कधीकधी तर तो माझ्याशी बोलायचा. मी त्याला मुव्हीजबद्दल सांगायचो आणि तो खूप आवडीने ऐकायचा. तो आपलं मनापासून ऐकतो असं कळल्यावर मला सारखं त्याच्याशी बोलावंसं वाटायचं. त्याच्याशी मी खूप बोलायचो आणि काहीही बोलायचो. त्याला वाटायचं की, मी सिनेमातून जीवना-बिवनाबद्दल शिकतो बिकतो. मला नोकरी लागल्यावरही जेव्हा तो भेटायचा तेव्हाही कौतुकानेच बोलायचा. त्याला मी कायम काहीतरी तिसरंच सांगत बसायचो. मी माझ्या मनातला गोंधळ त्याला फारसा कधी कळूच दिला नाही. आज असं वाटतंय की त्याला जरी फोन केला आणि खरं खरं सांगितलं तरीही तो हसेल आणि नंतर काहीतरी जड बोलून माझंच कौतुक करेल.
याउलट आत्ता आजोबा असते तर म्हणाले असते, “काय तरी फालतू न्यूनगंड वगैरे. मनाचे चाळे उगाच. एवढंच जर वाटतंय तर करा नोकरी आणि करा काय ते अचिव्ह-बिचीव्ह. सटासट नोकरी शोध आणि कामाला लाग नाहीतर दुकानात बस. गल्ल्यावर बसलास की जाईल न्यूनगंड वगैरे उडून. आजोबा, बापाने कमवून ठेवलाय त्यातला थोडा आदर तुला देतील लोक.”
‘न्यूनगंड’ हा शब्दच मला एखाद्या भूतासारखा भीतीदायक वाटतो आणि म्हणूनच न्यूनगंडाने ‘पछाडले’ असं म्हणत असावेत बहुधा. मी आज ना उद्या इथून जाईन, काहीतरी नोकरी किंवा एखादं काम करेन पण हे न्यूनगंड या जड नावाचं भूत कधी ना कधीतरी गाठेलच मला.
मला नोकरी नाही, यापेक्षा माझ्या दिवसाला काही शिस्त नाही, नुसती चालढकल चालू आहे याचा त्रास आता व्हायला लागलाय आज्जी. मी खूप विचार-बिचार करत नाहीये पण मला हे स्पष्ट दिसतंय की मी जर असाच लोळत पडून राहिलो तर एक दिवस माझ्या असण्या किंवा नसण्याने फार फरक पडणार नाही. मला भीती वाटते ती, मला लोकं विसरून पुढे जातील याची, मी फारसा महत्त्वाचा नाही असं लोकांना खात्रीपूर्वक वाटू लागेल याची. मला वाटतं की एके दिवशी पूर्वा ताईपासून मेघनापर्यंत कुणालाही असं माझ्याबद्दल वाटू शकेल आणि मग ते सगळंच माझ्या हातून निसटलेलं असेल. काय करू आज्जी? एक घाव दोन तुकडे करून संपवून टाकू सगळं? का मयुरी म्हणते तसं हेही दिवस जातील म्हणून वाट पाहू दिवस सरण्याची? का सरळ नोकरी पकडू आणि मग त्याच्या सगळ्या ताण-तणावाची सवय करून घेऊ? काय करू आज्जी…. आता तर मला वाटतं तुलाही माझे अप्स अँड डाउन्स आणि मूड स्विंग्ज वाचून कंटाळा आला असेल. हो ना आज्जी? सांग गं उपाय काहीतरी…
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.