प्रिय आज्जी,
काल सुजयचा वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही आपल्या गावात झालेल्या एका नव्या कॅफेत गेलो होतो. हा कॅफे एक सहा महिन्यापूर्वीच उघडलाय. भाजी बाजारातून आमच्या शाळेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आहे. मला आणि सुजयला आठवतंय त्यानुसार या जागेत पूर्वी चव्हाणांचं कापडाचं दुकान होतं. चव्हाणांचा मुलगा अनिकेत इंजिनिअर झाला आणि आता पुढचं शिकायला युएसला गेला आहे आणि मुलगी आरती (जी बहुतेक तुझ्याकडे गणिताच्या क्लासला यायची) ती आता डॉक्टर आहे आणि हैदराबादला असते. चव्हाण काका मागच्या वर्षी गेले त्यामुळे काकूंनी जागा विकली आणि त्या मुलीकडे हैदराबादला गेल्या.
जाहिरात बघितली तेव्हापासून मी आणि सुजय या कॅफेत जायचं ठरवत होतो. आम्ही लहान असताना काही ठरावीकच हॉटेल्स आपल्या गावात होती. त्यात एक उडप्याचं हॉटेल होतं आणि एक त्या नदीच्या रस्त्याला संजीवनी हॉस्पिटलच्या समोर होतं. कितीतरी वर्ष मोठी अशी दोनच हॉटेल्स होती. बाकी एखादं भोजनालय नाही तर स्नॅक्स सेंटर भर बाजारात होतं. या कॅफेची जाहिरात आली तेव्हापासून उत्सुकता होती. एक तर ही कुठल्यातरी मोठ्या कॅफे चेनमधली ब्रांच आहे म्हणून आम्हाला उत्सुकता होती आणि दुसरं म्हणजे आपल्या गावातील लोक खरंच पावभाजी, मिसळ, डोसा, वडा सांबार, बटाटा वडा हे सगळं ओलांडून पिझ्झा, बर्गर, फ्राईज, पास्ता हे खायला गर्दी करतील का याबाबत आमच्या मनात शंका होती.
आम्हाला असं वाटण्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे आपल्या गावात हॉटेलिंगची क्रेझ नाही. चहाच्या टपरीवर स्थानिक माणूस कदाचितच दिसतो आणि दुसरं म्हणजे हॉटेल म्हणजे उडुपी किंवा खानावळवजा भोजनालयात जायचं असं ठरलेलं होतं. पण आम्ही त्यादिवशी त्या कॅफेत गेलो, तर चाटच पडलो. तिथलं इंटेरीअर इतकं नवं आणि फ्रेश आहे की हा कॅफे आपल्या गावात आहे असं वाटत नाही. काल बर्यापैकी गर्दी होती. कॉलेजची मुलं होती आणि मम्मी-पप्पांच्या वयाचेही लोक होते. अॅमेझॉनमुळे जसं आता सगळं सगळीकडे मिळतं तसंच आता या कॅफेंच्या फ्रेन्चायझी किंवा चेनमुळे सगळं सगळीकडे मिळू लागलं आहे.
गप्पा मारता मारता आमच्या लक्षात आलं की जवळपास १०वी पर्यंत आम्ही एकमेकांच्या वाढदिवसाला एकत्र असायचो त्यानंतर काल आम्ही सुजयच्या वाढदिवसाला एकत्र होतो. सुजय खूपच बदललाय आज्जी. रात्रंदिवस क्रिकेट खेळणारा, बघणारा सुजय आता खूप शांत झाला आहे. आता तो फोटोग्राफीही करतो, थोडं लिहितो, वाचतो. मारधाडीचे हिंदी सिनेमे आता तो फारसे बघत नाही.
मला अजून आठवतंय तू वाढदिवसाला माझं औक्षण करायचीस ते बघून तो वसुधा आज्जीला हट्ट करायचा. त्याच्या वाढदिवसाला त्याची आई केक आणि आणि वेफर्स न देता दरवर्षी काहीतरी वेगळी डिश करायची. ‘औक्षण’ शब्द त्याच्या अजून लक्षात आहे. तो म्हणतो ओवाळलं म्हटलं तर ‘ओवाळून टाकले’ असं आठवतं पण ‘औक्षण’ केलं म्हटलं की काहीतरी चांगलं निमित्त आहे, चांगला दिवस आहे असं वाटतं.
मी त्याला काल म्हटलं की मी आत्ता तर माझ्याकडे जॉब पण नाहीये तरीपण तू मला वाढदिवस साजरा करायला इथे घेऊन आलास, माझ्याशी कायम बोलतोस त्याबद्दल थँक्स. तर मला म्हणाला, ‘अरे मूर्खा, आपण जवळजवळ बालवाडी किंवा त्याच्याही आधीपासून एकत्र आहे. तेव्हा तर आपल्याकडे काहीच नव्हतं आणि तरीही आपण मित्र होतो आणि आपण कायमच राहणारे. तर मग काहीतरी उगाच बोलू नको. तुझा सीव्ही काळा का गोरा, त्याच्यावर काय लिहिलंय हे मला माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची इच्छा पण नाही. तू मजा घे ना यार. मूड नको खराब करू…’
मी हसलो खरा पण मला आजकाल सारखं वाटतं की, आपण काही केलं किंवा एखादी गोष्ट अचिव्ह केली की आपल्याबद्दल एक रिस्पेक्ट समोरच्या माणसाच्या मनात तयार होतो आणि अचिव्ह करू न शकलेल्या माणसाला तो रिस्पेक्ट दिला जात नाही त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो. मला वाटतं की, हा न्यूनगंड हळूहळू माझ्या मनात तयार होऊ लागला आहे. म्हणजे बहुतेक तो पूर्वीपासून होता पण आता तो डोकं वर काढू पाहतो आहे, काय करावं ते कळत नाहीये. पूर्वा ताई किंवा मेघनाशी बोलून बघतो.
कळवेनच.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.