प्रिय आज्जी,
मागच्या पत्रात त्या विचित्र स्वप्नाच्या गोंधळात तुला सांगायचं राहूनच गेलं की, अश्विनी आणि मयुरी पुण्यात एकमेकीला भेटल्या. पुण्याच्या एकूण प्रथेप्रमाणे त्या बाहेर हॉटेलमध्ये भेटल्या आणि मग दिवसभर काहीतरी शॉपिंग करून रात्री बाहेरच पाणीपुरी खाऊन आपापल्या घरी गेल्या. त्या रविवारी पूर्ण दिवस एका बाजूने मयुरी आणि एका बाजूने अश्विनी मला सारखी मेसेजवर सगळे अपडेट्स देत होती. अश्विनीने नंतर नवे घेतलेले ड्रेसेमध्ये फोटो पाठवले. रात्री घरी जाताना मयुरीचा फोन आला आणि ती एकदम अश्विनीचं कौतुक करू लागली. तिचं सगळं बोलणं ‘मुलगी पसंत आहे’ या दिशेने चाललं होतं. तिच्या आवाजातली सगळी एक्साईटमेंट ऐकून मला हसू येत होतं. तिचा फोन ठेवला तर अश्विनीचा फोन आला आणि तिनं मयुरीचं तोंड भरून कौतुक केलं. मला खूप छान वाटलं.
मयुरी मला गंमतीत म्हणाली की, “आता बरोबर आणि लवकर पुण्याला येशील पठ्ठ्या. आता अश्विनी आहे ना पुण्याला. मी किंवा अविनाश म्हणतोय पुण्याला ये तर येणार नाहीस. आता अश्विनी नुसतं प म्हणाली की उडत येशील पुण्याला.” मी काहीच म्हणणार नव्हतो पण अश्विनी पुण्याला असल्यापासून मला पुण्याला जायची किती घाई आहे हे काही मयुरीपासून लपवायची गरज नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी लाजायचा अभिनय केला. फोन ठेवल्यावर दहा मिनिटांनी मला मयुरीचा मेसेज आला,
“Ashwini loves you a lot. You both are very lucky to have each other. I am happy for you.”
आमच्या नात्याबद्दल आणि आम्हा दोघांबद्दल मयुरीला वाटणारा विश्वास त्यादिवशी मला खूप आनंद देऊन गेला. आता पुण्याला गेलो तर त्या दोघी मिळून माझी शाळा घेतील आणि मग “कसा रे राहतोस?”; “हे कसले कपडे घालतोस?;” असले प्रश्न विचारले जातील. मयुरी असलं विचारत नाही पण अश्विनीशी युती करून मला त्रास द्यायला ती काही वाट पाहणार नाही.
मी पूर्वा ताईशी बोललो. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर नोकरी करायची तर दोन शक्यता स्वीकाराव्या लागतील: एक म्हणजे कदाचित कमी पगारावर सुरुवात करावी लागेल किंवा मग एखादा कोर्स करून स्कीलसेट वाढवून त्या कोर्सचा वापर करून फ्रेशर म्हणूनच नोकरी शोधायची. पण माझं काही ठरत नाहीये.
अविनाशशी बोललो तर तो म्हणाला की, एवढा मोठा ब्रेक घेऊन नोकरीत परत जाण्यापेक्षा मी काही नवीन ऑप्शन्स एक्सप्लोअर करावेत. म्हणजे थोडक्यात मला आवडतंय असं काहीतरी करुन त्यातून पैसे मिळवावेत. तो पुढे असंही म्हणाला, “दोन-चार पैसे कमी मिळाले तर काय हरकत आहे, आता अश्विनी पुण्यात आहे आणि तिला आहे की चांगली नोकरी.” पण मी काहीच म्हटलं नाही.
तुला सांगू का आजी, अश्विनीला चांगला पगार आहे, आम्ही दोघं पुण्यात असताना मला तिची मदत होऊ शकते हे खरं आहे, पण तिला पैसे मिळतात म्हणून मला माझ्या कामाशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता मी पुण्यात जाऊन जे काही करेन ते निवडताना माझी मानसिक शांतता या गोष्टीला प्राधान्य असेल. अविनाश म्हणतो तसं मला आवडेल असं काम सुरु करायचं झालं तरी ते फिगर आउट करून ते सुरु व्हायला थोडा वेळ जाईल.
पण हळूहळू पूर्ण वेळ नोकरी नको हे मात्र मी मनाशी पक्कं करू लागलो आहे. जे काही करायचं त्यासाठी इथून बाहेर पडलं पाहिजे हा विचार आता आणखीच जोर धरू लागला आहे आणि अश्विनी पुण्यात असल्यामुळे… म्हणजे तुला कळलं ना? तू समझदार है आज्जी.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.