आजीची गोधडी । पत्र बावीसावं

प्रिय आज्जी,

आज्जी, आपल्याला कधीतरी एक वाईट किंवा भीतीदायक स्वप्न पडतं आणि मग पुढचे दोन तीन दिवस मनातून सारखी भीती वाटत राहते ती ते वाईट किंवा फारसं चांगलं नसलेलं स्वप्न खरं होण्याची आणि मग ते सगळे दिवस डिस्टर्ब होतात. तुझं व्हायचं का असं कधी? तुला वाईट स्वप्न पडायची का?

मी एकदम सुरुवातीला असं का विचारतोय हे तुला कळत नाहीये ना… सांगतो. त्याचं असं झालंय की मला गेल्या एक दोन आठवड्यात सारखं एक स्वप्न पडतंय आणि मी त्याने अस्वस्थ आहे. त्या स्वप्नात मला एवढंच दिसतं:

तुझ्या देव्हाऱ्यासमोरच्या कॉटवर तू बसली आहेस. तुझ्या डोक्यावरचा तुमच्या खोलीतली ट्यूब चालू आहे. तुझ्या हातात जपाची माळ आहे. माझ्याबद्दल किंवा अश्विनी, मयुरी, अविनाश यांच्याबद्दल माझी काहीतरी बडबड चालू आहे, पण तू प्रतिक्रिया म्हणून काहीच बोलत नाहीयेस. तुझे डोळे बंद आहेत. जपाच्या माळेवरची तुझी बोटं  फारशी हलत नाहीयेत. मी तुला हाक मारतोय, आजी काहीतरी बोल असं म्हणतोय पण तू कशालाच काही प्रत्युत्तर करत नाहीयेस… मी तुझ्या दंडाला हात लावून हलवतो आहे पण तू काहीच बोलत नाहीयेस, जणू माझे शब्द, माझ्या हातांचा स्पर्श यातलं काहीच तुझ्यापर्यंत पोचत नाहीये. हळूहळू मला भीती वाटू लागते आणि तुझ्या कॉटच्या इथे खाली बसून मी रडू लागतो…

हे स्वप्न पहिल्यांदा पडलं तेव्हा मी अस्वस्थ झालो. मी तुझ्याच खोलीत झोपत असल्यामुळे बराच वेळ तुझ्या कॉटकडे पाहत राहिलो, तर स्वप्नात तुला जसं पाहिलं होतं तशीच मला दिसलीस. मी घटाघटा पाणी प्यायलो आणि झोपायचा प्रयत्न केला. झोप लागली पण मग पुढचे दोन तीन दिवस अशी भीती वाटत राहिली की, खरंच तू मला प्रतिसाद द्यायची बंद झालीस तर…

तू गेलीस तेव्हा मी पुण्यात होतो. तू गेल्याचं पप्पांनी कळवलं तेव्हा मी पटकन स्वारगेटला गेलो आणि इकडे येणाऱ्या बसमध्ये बसलो. इथे पोचेपर्यंत मी रडलो नाही. तुला तसं शांत झोपताना पाहिलं तेव्हा आपसूकच हात जोडले. मला रडू आलं नाही. तू किंवा आजोबा दोघंही सतत म्हणायचात की ‘आम्ही मेल्यावर रडू नका. मनासारखं जगा’. तू गेलीस त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तू आणि मी बोलू लागलो. मी नोकरी सोडून आल्यावर पत्रंही लिहू लागलो पण परवा पडलेलं स्वप्न एकदम नव्याने सत्याची जाणीव करून देणारं ठरलं.

मी तुला अगदी सुरुवातीच्या पत्रात लिहिलं तसं हल्ली उपयोग संपला किंवा त्या व्यक्तीकडे असलेलं काम झालं की हळूहळू संवादही संपतो. अनेकवेळा माणसं सीव्ही बघून संबंध जोडतात. एकमेकांशी बोलतानाही लोक लग्न; लग्न झालं नसलं तर मग ते कधी करणार;नोकरी, गाडी, गाडीचं अॅव्हरेज-मायलेज; नवा फ्लॅट, जागांच्या किंमती; नवा मोबाईल,अँड्रॉइडचं व्हर्जन; नोकरी नवी असेल तर नव्या नोकरीचं पॅकेज; ऑफिसला कसे जाता? ऑफिसला जाणाऱ्या कुठल्या रस्त्याला ट्रॅफिक कमी असतो? परवाची मॅच बघितली का? सरकारचा अमुक निर्णय कसा चुकला; असंच सगळं बोलतात. अनेक लोकांशी नातं आणि संवाद टिकवण्यासाठी सारखं काहीतरी अचिव्ह करत राहावं लागतं. माझ्याशी यातलं काहीच बोलता येत नसल्यामुळे अनेक जण माझ्याशी काहीच बोलत नाहीत, अगदी मम्मी-पप्पा सुद्धा!

पण तू माझ्याशी हे सगळं बाजूला ठेवून बोलतेस, आपण जिवलग म्हणून एकमेकांशी बोलतो. तिकडे गणपतीकडे का होईना, पण तू असणं मला महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या दिवशीचं स्वप्न खरं होणार नाही असा आपण प्रयत्न करूया.

आज स्वप्नात भेटलोच तर मी तुला अश्विनीने तिच्या पुण्याच्या फ्लॅटच्या बाल्कनीत ठेवलेली झाडं दाखवतो. आपल्या अंगणातल्या तुझ्या लाडक्या जास्वंदाचाही फोटो दाखवतो. आजोबांची एक लाल कानटोपी सापडलीय तीही तुझ्याकडे देतो. तिकडे त्यांच्या कानाला वारा लागत असणार. पूर्वा ताईने नैनितालहून आणलेला तुझा स्वेटर हवा असेल तर तसंही सांग, तोही घेऊन येतो. आपण एखाद्या छान कॅफेमध्ये भेटू आणि गप्पा मारू आज्जी. मी पाचशे आणि तू दोन वाक्यं बोललीस तरी चालेल पण खरोखरंच त्या स्वप्नातल्या सारखं निश्चल बसून राहू नको. आपल्यातला संवाद बंद झाला तर लाईफ वुड बी रिअल नाइटमेअर. त्यामुळे तसं नको. बोलूया…

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :