आजीची गोधडी । पत्र अठरावं

aajjichi-godhadi-patra-18-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी,

मी अश्विनीला पत्र लिहिलं. अश्विनीला पत्र लिहिताना मला एकदम असं जाणवलं की मी आणि अश्विनी मेसेजेसवर सतत बोलत असल्याने मी पत्र लिहायला घेतल्यावर पहिली ५ मिनिटं मला काही सुचेचना आणि मग एकदा लिंक लागल्यावर मी इतकं लिहिलं की बहुधा ते जरा जास्तच मोठं झालं, पण ती मुलगी आहेच इतकी स्पेशल त्यामुळे मग मी पत्र लांबलं याचं फार टेन्शन घेतलं नाही आणि मोठं पत्र लिहिल्याने मुलगी खुश झाली. मला खरंतर सगळं पत्रच तुला दाखवायचं होतं पण मग अश्विनी आणि माझ्यातल्या काही अतिखासगी गोष्टी नातवाने आज्जीला सांगू नयेत अशा आहेत, त्यामुळे त्या सांगत नाही.

पत्र लिहिता लिहिता मी रोमँटिकचा सिरिअस कधी झालो माझं मलाच कळलं नाही. अश्विनीला माझ्या मेंदूतला केमिकल लोचा माहिती असल्याने तीही फारसं काही म्हणाली नाही. मला वाटणारी सगळ्या प्रकारची भीती मी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करुन टाकली. अश्विनी, पूर्वा ताई किंवा तुझ्याशी बोलताना, तुम्हाला काहीतरी सांगताना मला टेन्शन येत नाही. अश्विनी इतकं शांतपणे सगळं ऐकते आणि मग म्हणते तुला जर हे योग्य वाटतंय तर ते कर. पण मम्मी-पप्पा किंवा नातेवाईक ‘तुला जे योग्य वाटतंय ते कर’ असं म्हणून नंतर एखाद्याचा जसा गेम करतात (गेम करतात म्हणजे ‘तुला जे योग्य वाटतंय ते कर’ असं म्हणतात आणि थोड्या वेळाने “तुला काय कळतंय? काही सुचत नसेल तर मी म्हणतो तसं कर” म्हणत त्यांना जसं आणि जे हवं होतं तेच दुसऱ्या व्यक्तीकडून करुन घेतात.)  तसं काहीच अश्विनी करत नाही. ती म्हणते, समोरच्या माणसाने काहीतरी विचारांती निर्णय घेतला असेल त्यामुळे मी त्या माणसावर आणि त्याच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवते. पूर्वा ताईचं पण काहीसं तसंच आहे. त्यामुळे तुमच्या कोणाशीच बोलताना मला अपराधी वाटत नाही.

मी अश्विनीला पत्रात असं लिहिलं आहे: “मी तुला गमावून बसेन अशी भीती मला वाटत नसली तरी हल्ली अनेकदा तू माझ्यापेक्षा चांगला मित्र/ जोडीदार डिझर्व करतेस असं वाटतं. मी असा अजून किती काळ धडपडत राहीन मला माहिती नाही. कदाचित एखादं चांगलं स्थळ आणून तुझे आई-बाबा तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील आणि मला असं वाटतं की कदाचित असाच एखादा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे. मला तू खूप आवडतेस आणि आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे जरी खरं असलं तरी एकत्र राहायला केवळ एकमेकातलं अंडरस्टँडिंग पुरेसं नसतं कारण रोजच्या जगण्यातले प्रॅक्टीकल प्रश्न वेगळेच असतात असं मला हल्ली सतत वाटतं. मला फारशा महत्त्वाकांक्षा नाहीत, नोकरीतून निराशा आलेल्या अनेकांपैकी मी एक आहे याचा तुला त्रास होतो का गं? तसं असेल तर बिनधास्त सांग. तुझ्या मनाविरुद्ध या नात्यात तू राहावंस असं मला वाटत नाही. हे सगळं लिहिणारा मुलगा ज्याच्यावर तुझं प्रेम आहे तो अनेकांसारखाच एक भित्रा पुरुष आहे आणि सध्या बेरोजगार असल्याने नातं टिकवायलाही बहुधा सीव्ही लागत असेल असंच त्याला वाटतं आहे… तुझ्या माझ्या नात्यातल्या या वळणाला मी जबाबदार आहे हे मला माहिती आहे. पण हे नातं मला टिकवायचं आहे, तुझ्यासोबत राहायचं आहे.”

तिचं उत्तर येईलच पण मला आता मोकळं वाटतं आहे. अश्विनीसारखी मैत्रीण गमावणं मला परवडणार नाहीये आणि कुठेतरी मनात खात्रीही आहे की ती सोडून जाणार नाही. ती खूप समजूतदार आहे पण शेवटी मलाही तिच्या गरजांना प्राधान्य द्यावंच लागेल ना, असं सगळं फक्त माझ्याबद्दल कधीपर्यंत चालू राहणार आज्जी?

मी आणि अश्विनी यातून मार्ग काढणार आहोतच, पण तुला सांगून ठेवलं सगळं. अश्विनीबद्दल असल्यामुळे पत्र लांबलं आहे पण तुला सवय झाली असेल आता. गणपतीबरोबर चार दिवस तुला इकडे यायला हरकत नव्हती पण बहुधा आता तुला स्वर्गसुखाची सवय झाली आहे… काळजी घे.  

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

1 Comment

  1. खूप सुंदर गोड आहे हा पत्रसंवाद . या वयातल्या थोडा वेगळा विचार करणाऱ्या , स्वतःला शोधण्याच्या धडपडीत असलेल्या मुलाची स्पंदने फार छान टिपली आहेत .

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :