आजीची गोधडी । पत्र पंधरावे

प्रिय आज्जी,

         आज सकाळी अश्विनी पुण्याला गेली. तिची कंपनी हिंजवडी फेज १ मध्ये आहे आणि तिला वाकडला जागा मिळाली आहे. मी कॉलेजला पुण्याला गेलो आणि तिला बारावीला थोडे कमी मार्क मिळाल्यामुळे ती इथेच राहिली आणि इथल्या जवळच्या कॉलेजमधूनच तिने ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. मी पुण्यात एकटा राहायला लागलो होतो तेव्हापासून ती थोडीशी जेलस होती. ती कायम म्हणायची की, आई-वडीलांपासून वेगळं राहणाऱ्या, राहू शकणाऱ्या लोकांबद्दल तिला खूप कौतुक वाटायचं. मी तिला म्हणायचो की, तिलाही जमेल तेव्हा गंमतीने म्हणायची, “मुलांच्याइतकं इतकं सोपं नसतं सगळं आम्हा मुलींना आणि मला मजा वाटायची. काकू किंवा मम्मी असले डायलॉग खूप मारायच्या म्हणून मला वाटायचं की, ही इथे राहते म्हणून असं बोलतेय.

            आज खरं तर एक कन्फेस करायचं आहे तुझ्यापाशी, मी आणि अश्विनी रिलेशनशिपमध्ये आहे हे तुला सांगावं असं मला वाटत होतं. पण अश्विनी म्हणायची की, आज्जीशी सगळं बोलणं वेगळं आणि हे बोलणं वेगळं. तिला उगाच वाटत होतं की तुला कदाचित आवडणार नाही किंवा मग तू डायरेक्ट तिच्या आई-बाबांशी जाऊन बोलशील आणि आम्हाला एकदम ते सगळं अशा पद्धतीने डिक्लेअर व्हायला नको होतं. आता वाटतं की तुला सांगायला हरकत नव्हती. अश्विनी कशी चुणचुणीत मुलगी आहे हे तर तू हजार एक वेळा तरी माझ्यासमोर म्हटली असशील पण ती “चुणचुणीत” मुलगी मला आवडते हे मी सांगितलं नाही तुला.

            सध्या मम्मीला मला नोकरी नाही याची काळजी असल्याने माझ्या लग्नाचा विषय तिच्या डोक्यात नाहीये. “मुली शिकल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्यात. रूप, रंग, नोकरी, गाडी आणि फ्लॅट एवढं सगळं असूनही आजकाल मुलांना मुली मिळत नाहीत” असं सध्या मम्मी सारखी म्हणत असते ज्यातलं लपलेलं वाक्य असं असतं की, “तुला तर नोकरी नाही त्यामुळे तू तर विचारसुद्धा करु नको.” पण मीही उगाच “रूप, रंग, नोकरी, गाडी आणि फ्लॅट हे माझ्याकडे नसलं तरी माझ्यावर प्रेम करणारी एक मुलगी आहे आणि माझंही तिच्यावर प्रेम आहे” वगैरे असले डायलॉग टाकत नाही. कारण मग उगाच तमाशे होतील आणि या सगळ्या गोंधळात अश्विनीचं कुठल्यातरी मोठ्या पॅकेजवाल्या मुलाशी लग्न वगैरे लावायचे उद्योग सुरु होतील.

            आता अश्विनीचं रुटीन बदलेल. तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी बदलतील. बडबड करायला रोज फोन येईलच असं नाही. मला ना काही वेळा तिच्या बडबडीशिवायचा दिवस इमॅजीनच करवत नाही गं. मला आमच्या रिलेशनशिपबद्दल काळजीबिळजी वाटत नाही पण कधीतरी असं वाटतं माझा कंटाळा येईल का तिला? मला महत्त्वाकांक्षा नाहीत याची सवय करु शकेल का ती?

            तुझं आणि आजोबांचं एकत्र आयुष्य जवळपास ५० पेक्षा जास्त वर्ष टिकलं. आजही सगळे तुमच्या सहजीवनाबद्दल बोलतात. एकदा तुझ्याबरोबर शाळेत असणाऱ्या एक बाई आपल्याकडे आल्या होत्या आणि त्या तुला नवऱ्याबद्दल काहीबाही सांगत होत्या.  तू त्यांना म्हणाली होतीस की संवाद टिकला की सगळं टिकतं. मला आत्ता तरी विश्वास आहे. समजा काही झालंच तर येशील ना मदतीला? चुणचुणीत मुलीला आणि वेड्या मुलाला समजावशील ना?

उद्यापासून अश्विनीची बडबड मी मिस करणार आहे. म्हणजे ते मेसेज आणि फोन कॉल्स या सगळ्यात समोर बसून तिच्या चेहऱ्यावरच्या एक्स्प्रेशनसकट सगळं बघण्यातली मजा नाही. यामुळे कदाचित आता माझी पत्र लांबतील. अश्विनीच्या आठवणींचे परिच्छेद वाढतील. चालेल ना तुला?

– वरद  

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :