मराठीतील एक थोर कवी आणि समीक्षक श्री पुरुषोत्तम शिवराम रेगे यांनी आपल्या वेगळ्या शब्दकळेने, मराठी साहित्याविषयीच्या सखोल विचाराने मराठी कविता व कादंबरी यांना एक वेगळी दिशा दिली, एक वेगळे परिमाण निर्माण केले. त्यांच्या साहित्यकृतींचे मराठी साहित्य विश्वात एक आगळेच स्थान आहे.
त्यांनी आपल्या कवितांमधून,कथांतून आणि कादंबऱ्यांतून स्त्री-पुरुषांमधील नाजूक, सौंदर्यपूर्ण व गुंतागुंतीच्या संबंधांचे चित्रण इतक्या समर्थपणे, अवघड परंतु समर्पक शब्दांतून रंगविले आहे की, त्यांची एखादीच कविता वाचून आपल्याला इतर कविता वाचण्याची उत्सुकता वाटू लागते. ‘प्रियाळ’, ‘पुष्कळा’ या त्यांच्या कवितासंग्रहातील कविता वरील प्रकारातच मोडतात. ‘प्रियाळ’मधील ‘शहनाज’, ‘खूण’ वगैरे कविता मुळातूनच वाचण्यात मजा आहे.
तूं
तूं म्हणाली होतीस
चांदणं पाण्यात डुंबतं
तेव्हा आपण बोलायचं नसतं
कारण तेव्हा ते एकटंच असतं
अशा एकांत चांदण्याच्या सुहृद गाथा या आत्मस्थ कवीने व्रतस्थपणाने लिहिल्या आणि शुद्ध कलेची उपासना केली. या रंगपांचालिकांची सर्व देणी माधवी अन् लाघवी होती.
सौंदर्य, मग ते कोणतेही असो, त्याचे आकलन पु. शि. रेगे केवळ स्त्रीनिष्ठ समतानतेनेच करतात. केवळ निसर्गाची निसर्ग म्हणून त्यांना कधीच अपूर्वाई वाटत नाही. (उदा. ‘कोरूनी मी नभ घेतो’, ‘मस्तानी’ इ.)
हे आकलन करताना त्यातील सर्व बारकावे नवनवीन प्रकारे वेधून घेण्याचा त्यांच्यातील कवी प्रयत्न करीत असतो. त्यात त्यांची केवळ उत्कट रसिकाची भूमिका असते. उदा. ‘लंपट ओले वस्त्र होऊनी’, ‘जिप्सी’, ‘पुष्कळा’, ‘शहनाज’, ‘आणि मी उशवदत्त होतो तेव्हा’ वगैरे कविता! पैकी आणि ‘मी उशवदत्त होतो तेव्हा’ ही कविता काव्यात्म मिथ ह्या प्रकारात मोडते. गुंतागुंतीच्या नात्याची आणि एकमेकांवरील पराकोटीच्या प्रेमाची ही ऐतिहासिक कथा पु. शि. मोजक्याच पण विलक्षण अर्थपूर्ण शब्दांत मांडतात, की काव्य रसिकाला वारंवार वाचून, मनोज्ञपणे रसग्रहण करूनदेखील ही कविता पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटते.
संवेदना ही प्रथम शारीरिक आणि मग इतर काही अशा भूमिकेतूनच त्यांच्या कविता जन्माला आल्या आणि म्हणूनच नकली वर्णन व बुळबुळीतपणा त्यांच्या कवितेत सापडत नाही. प्रत्येक शब्दात माझे सर्वस्व व्यक्त करण्याचा माझा हव्यास असतो, असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या कविता वाचताना येतो.
उदाहरणार्थ-
कुणीही यावं,
काहीही बोलावं.
उतरतील ते शब्द
आपलेच आहेत.
‘सावित्री’ या कादंबरीतही सावित्री व ‘तो’ यांचे हळूहळू जुळत गेलेले रेशीमबंध त्यांनी इतक्या सूक्ष्मपणे रंगविले आहेत, की वाचकाला तितक्याच तरलपणे कादंबरी अनेक वेळा वाचावी लागते; तरच तिचा आस्वाद घेता येतो आणि प्रत्येक वेळी त्यांतल्या वेगवेगळ्या जागांमधील सौंदर्याचं दर्शन होतं. हीच स्थिती ‘मनवा’ या कथासंग्रहातील कथा वाचताना होते. स्त्रीची विविध रूपे त्यांनी आपल्या लेखणीतून इतक्या समर्थपणे उतरवली आहेत, की नकळतच त्यांच्यापैकी एखादीचे प्रतिबिंब आपल्याला सभोवती असलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये दिसू लागते.
‘छांदसी’ या लेखसंग्रहात त्यांनी अनेक विषयांची अतिशय बारकाईने चर्चा केली आहे. हे लेख वाचून कोणाही सुज्ञ लेखकाचे अथवा वाचकाचे साहित्यासंबंधी असलेले गैरसमज निश्चितच दूर होतील. ‘श्लिल-अश्लिल’, ‘साहित्य आणि समस्या’, ‘वाड;मयकृतीच्या समीक्षणाचे निकष’, ‘लेखकाची जबाबदारी’ वगैरे लेख साहित्याची आवड असणाऱ्यांनी मुळातूनच अभ्यासले पाहिजेत. “उत्कृष्ट कलाकाराचे कौशल्य विषयात नसते, त्या विषयाच्या आविष्कारात असते. हाच कोणत्याही कलेचा आद्य निकष!” असे त्यांनी ‘ छांदसी’मध्ये म्हटले आहे. हा निकष त्यांच्या साहित्याला लावल्यावर ते उत्कृष्ट कलाकार होते, हे आपल्याला लक्षात येते. एवढेच नव्हे, तर नृत्य, शिल्प, संगीत व साहित्य यांच्याविषयी असलेली निष्ठा व त्यातून निर्माण झालेले समर्थ, अर्थसंपन्न असे त्यांचे साहित्य त्यांना एकमेवाद्वितीय कलाकार या श्रेणीत नेऊन बसवते
– नानासाहेब महादेव गव्हाणे
*
वाचा
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
नानासाहेब गव्हाणे हे वालचंद महविद्यालय, सोलापूर येथे मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांना संशोधन, संपादन व लेखन कार्यात विशेष रुची असून सुलेखन (Calligraphy) आणि पर्यटनाची विशेष आवड त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या कथा, कविता, लेख व निबंध विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.