प्रिय आज्जी,
मला अजून तरी त्या इंटरव्यू दिलेल्या कंपनीकडून काही कळवलं वगैरे नाहीये. अविनाश म्हणाला की ते कळवतील लवकरच. मम्मी आणि अश्विनी यांच्यात माझ्या नोकरी करण्याबद्दल एकमत झाल्यानं इंटरव्यू दिलेल्या कंपनीकडून काही आलं का, असा प्रश्न मम्मी दिवसातून दोन वेळा आणि अश्विनी चार वेळा विचारते. अजून काहीच ठोस न कळल्यानं माझा सुपरस्टार स्टेटस अबाधित आहे.
पूर्वा ताईचा फोन आला होता. तिचं म्हणणं आहे की, या इंटरव्यूचं समजा काही नाही झालं तर मी मम्मी पप्पांना सांगावं की, मला एक वर्ष द्या, मी स्वत: काहीतरी करायचा प्रयत्न करतो पण मला नोकरी करायची नाहीये. मम्मी आणि अश्विनीच्या झालेल्या युतीबद्दल मी तिला सांगितलं नाही. तिचा दुसरा पर्याय असा की मी पुण्याला परत जाऊन थोडा काळ काय काय करता येईल याची चाचपणी करावी आणि त्या काळात एखादी पार्ट टाईम नोकरी करावी किंवा एखादा कोर्स करावा. मी पैसे देईन असंही ती म्हणाली आहे.
तिच्या बोलण्यात ना आज्जी एक समजूतदारपणा असतो. मला काही वेळा वाटतं की, खरं तर ती नोकरीला म्हणून दोनच वर्ष घराबाहेर होती, मग तिचं लग्नच झालं, पण ती अजिबात मम्मी-पप्पांसारखी नाहीये. ती तुझ्यासारखी आहे. “नातू बुवा तू, तू तिचा लाडका” असं ती मला म्हणायची तेव्हा वाटायचं की कदाचित तुझ्या वागण्याचा, माझे किंवा विनायकदादाचे तू तिच्यापेक्षा जास्त लाड केल्याचा तिला राग येत असेल, पण तसं नाहीये. तिच्याही नकळत, तुझ्यातलं बरंच आलंय तिच्यात. ती नसती तर बहुधा मी आत्तापर्यंत दुसरी नोकरी पकडली असती आणि मम्मीने माझ्यासाठी मुली वगैरे बघायला सुरुवात केली असती.
पण सगळे तिच्यासारखे नाहीत ना! म्हणजे आता हा इंटरव्यू झाल्याचं अश्विनी आणि मम्मी सोडून कमी लोकांना माहित आहे, त्यामुळे गावातला मला भेटणारा प्रत्येक जण, “माझी या कंपनीत ओळख आहे; ‘इकडे करतोस का काम?’ किंवा ‘आता तू पप्पांबरोबर दुकान असं सांभाळलं पाहिजे’ असं सांगत राहतात. पण ते पप्पांचे मित्र आहेत ना, शिंदे काका, त्यांनी परवा हाईटच केली. मी बाकी कुणाला त्याबद्दल काही सांगितलं नाहीये.
ते सहसा सणाचे फॉरवर्डेड मेसेजेस सोडता मला मेसेज करत नाहीत. त्यादिवशी त्यांनी मला युट्युबवरचा एक व्हिडिओ पाठवला. गेम खेळण्याने किंवा जास्त वेळ मोबाईल स्क्रीन बघितल्याने त्यातून येणाऱ्या रेजचा हृदयाला कसा त्रास होतो वगैरे असलं काहीतरी होतं. मला त्याचं डिस्क्रिप्शन वाचून लक्षात आलं म्हणून मी तो बघितला नाही. मी काहीतरी वाचत होतो, त्याकडे वळलो तर त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी तो लगेच डिलीट केला. पण तोपर्यंत मी तो वाचला होता, त्यांनी लिहिलं होतं ‘तू असे व्हिडिओज अपलोड करत जा. यातून चांगले पैसे मिळतात म्हणे.’ मी इतका मोठ्याने हसलो की मम्मीलाही काही कळेना…
मला खूप राग आलाय आज्जी त्यांचा. त्यांनी स्पष्टपणे ‘मला असं वाटतं’ असं म्हणून मला सांगितलं असतं तर मी एक वेळ शांतपणे ऐकून घेतलं असतं, पण त्यांनी ते डिलीट केलं. त्यांना माझी चेष्टा करायची होती का? वाट्टेल ती माहिती लोकांना सांगून ते बघायला लावणे हे स्कील आहे आणि यूट्युबवरच्या अनेकांना ते छान जमतही असेल पण ते करण्याचा सल्ला मला देण्यामागचं त्यांचं प्रयोजन मला काही पटलं नाही. माझ्या डोक्यात वेगळाच गोंधळ चालू आहे. युट्युबवर धादांत खोट्या माहितीचे व्हिडिओ बनवणं हे काही त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही.
पण अडला हरी… सारखी माझी स्थिती असल्याने मी काहीच बोललो नाही. नोकरी करायची नसेल तर पैसे मिळवण्याचे असे सल्ले ऐकण्याची तयारी केली पाहिजे बहुधा… दोन कानांचा पुरेपूर वापर केला पाहिजे… अवघड आहे बघ इथे पगारी नोकरी न करता राहणं…. पत्र जरा लांबलच पण… तू म्हणतेस तसं “यातूनही मार्ग निघेल” बहुधा… बघूया काय होतंय ते…
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.