प्रिय आज्जी,
तुला मागचं पत्र वाचून थोडं टेन्शन आलं असेल तर ते घेऊ नको. मी काही प्रपंचाला कंटाळलो वगैरे नाहीये. त्यादिवशी इंटरव्यू देताना मी जरा भरकटलो होतो, एवढंच. मला पहिल्यापासूनच इंटरव्यू हे एखाद्या परीक्षेसारखे वाटत आले आहेत. म्हणजे ते विचारतात त्या प्रश्नांची त्यांच्या पसंतीस उतरतील तशी उत्तरं दिली तर आपल्याला नोकरी मिळते. ते सगळं जमणं हे स्कील आहे. शेवटी आजोबा म्हणायचे तसं ‘तुम्हाला नोकरी मिळणं हे नोकरी देणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतं, तिथे जाऊन तुम्ही केवळ परफॉर्मन्स द्यायचा असतो पण त्यांच्या मनात नसेल तर ते काही कारण न देताही तुम्हाला नाकारू शकतात.’
आजोबा गेले त्याला काल चार वर्षं झाली. (आता आजोबा गेले म्हणायचं का तुझ्याकडे आले म्हणायचं मला माहीत नाही.) मी मम्मीला काल म्हणालो की आजोबांना आवडायचे तर आपण गुलाबजाम करू या, पण ती तयार झाली नाही. सासरेबुवा गेले त्यादिवशी गोड खाण्याची संकल्पना तिला काही फारशी पटली नाही. खरं सांगू का, मला असं वाटतं की, जर आजोबांच्या किंवा तुझ्या वयाची व्यक्ती गेली तर तिच्या वाढदिवसाला किंवा ती गेली त्यादिवशी आपण तिच्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता आजोबा ९० वर्षांचे होऊन गेले, म्हणजे भरपूर जगले की, आता त्यांच्या आठवणी काढताना दु:ख कशाला करायचं?
तुला एक सिक्रेट सांगतो, तुझ्या वाढदिवसाला मी न चुकता तुझ्या आवडीचं चॉकलेट आइस्क्रीम खातो. तुला मिळतं का गं तिकडे आइस्क्रीम? स्वर्गसुख म्हणतात तसं सुख आहे का तिकडे?
काल सुजयची आज्जी आली होती. ती तुझ्याबद्दल आणि आजोबांबद्दल इतकं छान बोलली. मला ते सगळं ऐकताना खूप मजा आली. तुमचे बरेच किस्से सांगितले तिनं. ते सगळं ऐकल्यावर आमच्या भाषेत तुम्ही #कपलगोल्स होतात असंच वाटलं मला. मला म्हणाली, ‘विनायक तिकडे गेला ते त्यांना फारसं आवडलं नव्हतं. तू पुण्यातून येऊन हे सगळं सांभाळशील आणि बाबांना मदत करशील असं त्यांना वाटायचं. पण तुझ्या आज्जीनं त्यांना सांगितलं की, तो शिकायला गेलाय तिकडे. त्याला परत यायचं असेल तर येईल. त्यांना आपल्यासारखं एका गावात राहून संपूर्ण आयुष्य जगणं जमायचं नाही. त्याला त्याच्या मनासारखं जगू द्या.’ गंमत म्हणजे तू गेलीस त्याच्यानंतर मी जेव्हा पुण्याला जायला निघालो तेव्हा मला म्हणाले, ‘हे सगळं तुझंच आहे, पण हे सांभाळच असं म्हणणार नाही. तुला जसं वाटेल तसं कर. मनासारखं जग.’ तेव्हा त्यांना असं सगळं बोलताना बघून मला आश्चर्यच वाटलं, पण आता कळलं की, त्यांनी तुझा डायलॉग कॉपी केला होता. स्मार्ट आहेत नाही आजोबा!
खरं सांगू का आज्जी तू अशी शांत, गोड, निर्मळ आणि ते असे करारी, स्पष्ट बोलणारे, एखाद्याचा पटकन अपमान करणारे, ‘फालतू आहे ते’ असं म्हणून नावडती गोष्ट बाजूला टाकणारे पण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांना तुमचं संध्याकाळी फिरायला जाणं खूप आवडायचं. ते तसं म्हणायचे नाहीत तुला, पण तिकडे सोय असेल तर जात जा त्यांना घेऊन फिरायला… काळजी घ्या एकमेकांची… त्यांना सांग की, मला आठवण येते त्यांची गुलाबजाम खाताना आणि बाकी वेळीही….
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.