आजीची गोधडी । पत्र तेरावं

aajjichi-godhadi-patra-13-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी,

पूर्वा ताईचा फोन आला होता. ती म्हणत्येय की, अश्विनी म्हणते आहे तसं मी पुण्याला परत जाऊन काहीतरी छोटी-मोठी नोकरी धरावी आणि या घरातून, या अशा अवस्थेतून माझी सुटका करावी. तिच्या मते आता मम्मी-पप्पांना माझी मानसिक अवस्था, माझी भीती, मला आलेलं नैराश्य हे सगळं समजावत बसण्यापेक्षा नोकरी शोधण्याचं कारण काढून मी इथून बाहेर पडावं, लोक काय बोलतायंत याचा विचार न करता पुण्याला जावं आणि मग तिथली परिस्थिती पाहून काय करायचं हे फिगर आउट करावं. मला तिचं म्हणणं पटलं तर आहे. ‘नोकरी नाही तर मग काय?’, या प्रश्नाचं उत्तर मी शोधतो तर आहेच.

मी या सगळ्याबद्दल विचार करत असतानाच परवा एक धक्कादायक गोष्ट घडली आणि आता मी पुरता हादरून गेलो आहे. माझा आणि पूर्वाताईचा फोन झाला त्याच रात्री उशिरा मयुरीचा फोन आला. ती रडत होती. ती म्हणाली, ‘सूरजने (तिचा आत्तेभाऊ) बेंगलोरमध्ये तो राहत होता त्या घरी सुसाईड केलं.’ ती बराच वेळ काही न काही बोलत होती. त्याच्या मनात नक्की काय चालू होतं ते कुणालाच कळलं नाही. शेवटचे दोन-तीन दिवस तो कुणाशीच काही बोलत नव्हता म्हणे.

आज्जी, त्या रात्रीपासून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये. त्याची गर्लफ्रेंड म्हणाली की, तो ज्या कंपनीत हल्ली काम करत होता तिथे त्याला प्रचंड राबवून घेत होते आणि त्या कामाचा स्ट्रेस त्याला जाणवत होता. मी त्याला एक दोनदाच वीकेंडला भेटलो होतो. मयुरीबरोबर आला होता तो. प्रचंड ॲम्बिशिअस मुलगा होता तो. आम्ही एका कलादालनात एका फोटोग्राफीच्या एक्झिबिशनला गेलो होतो. ते फोटो बघतानाही तो अविनाश आणि माझ्याशी सतत काम, कंपनी आणि कामाच्या ठिकाणची टेक्नोलॉजी आणि फॉरेनमधल्या कंपन्या या सगळ्याबद्दल बोलत होता. तिथे असलेल्या फोटोजकडे तो पाहतही नव्हता. मयुरी त्याला काहीतरी सांगत होती पण त्याचं सगळं लक्ष फोनमध्ये कुठल्यातरी कंपनीच्या वेबसाईटवर होतं. आम्हाला थोडं विचित्र वाटलं, पण मयुरी म्हणाली की तो असाच पॅशनेट आणि ड्रिव्हन आहे, त्याला कामाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आम्हीही नंतरच्या कामात त्याला विसरून गेलो. आता तो या कंपनीत या पोस्टवर, त्या कंपनीत, त्या पोस्टवर आहे एवढंच मयुरी अधूनमधून सांगायची आणि आम्ही अरे वा! म्हणून परत कामाला लागत असू.

अशा मुलाने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या ताणामुळे आत्महत्या करणं धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. म्हणजे काम न आवडणारे, न जमणारे लोक निराश होऊन आयुष्य संपवतात हे ऐकलं आहे. खोटं कशाला बोलू माझ्या बॉसच्या ‘युजलेस’ म्हणण्याने असा विचार माझ्याही मनात येऊन गेला होता. पण धाडस झालं नाही. तू, अश्विनी, मम्मी-पप्पा, पूर्वा ताई सगळे आठवायचात आणि मी प्रयत्नपूर्वक या सगळ्यातून स्वत:ला बाहेर काढायचो. सिनेमे बघायचो, मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकायचो.

त्यादिवशी आमच्याशी अगदी पॅशनेटली सगळ्याबद्दल बोलणारा सूरज मला सारखा आठवतो आहे. हे सगळं मन सुन्न करणारं आहे. आज मी बऱ्याच दिवसांनी खूप खूप रडलो. पेपरला आत्महत्येच्या बातम्या येतात, या संबंधातल्या कसल्याशा सर्वेक्षणाचे आकडे येतात; पण त्या वाचतो आणि विसरतो. पण आज काही केल्या सूरज डोळ्यासमोरून जातच नाहीये. त्याला विसरताच येत नाहीये. आपल्या मनात असाच विचार जोर धरू लागला तर असं वाटून आणखीच भीती वाटते आहे.

सूरजच्या जाण्याने सगळं संपलं नाही तर एका नवा गुंता जन्माला घातला आहे. सुटेल ना हे कोडं? मी तरून जाईन ना या सगळ्यात? यातूनही मार्ग निघेल ना, आज्जी?

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

1 Comment

  1. हे भयाण वास्तव खूप छान शब्दात मांडलं आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :