आजीची गोधडी । पत्र सतरावं

प्रिय आज्जी,

त्यादिवशी तुला पत्र लिहिलं आणि झोपलो तर दिवसभर डोक्यात सतत अश्विनीचा विचार असल्याने ती स्वप्नात पण आलीच. स्वप्नात आम्ही एका आईसक्रिमच्या दुकानात बसलो होतो. माझं खाऊन झालं होतं आणि तिचं आईस्क्रीम संपायचं होतं. अश्विनी तशीही संथपणे खाते, आणि स्वप्नातलं आईस्क्रीमही त्याला अपवाद नव्हतंच. खरं सांगू का आज्जी, तुला चॉकलेट आईस्क्रीम आवडायचं ना, तसंच तिला आईस्क्रीम आवडतं. फरक इतकाच की ती सगळ्या प्रकारची आईस्क्रीम खाऊ शकते. सतत बडबड करणारी ही मुलगी आईस्क्रीम मात्र एकाग्रतेने एकही शब्द न बोलता खाते. तिला तसं तल्लीन होऊन आईस्क्रीम खाताना बघणं हा एक वेगळाच आनंद असतो. तिच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान असतं.

ती आईस्क्रीम खाताना इतकी सुंदर दिसते (हे मी तुला सांगितलं असं तिला कळलं तर म्हणेल हे आज्जीला सांगतात का; पण असू दे.) फक्त तिच्याशी बोलताना मी तुझा उल्लेख वर्तमानकाळात करतो. “हे कळलं ना तर आजी ओरडेल हा”, ही मला द्यायची तिची लाडकी धमकी आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम कळलेली पूर्वाताईनंतरची ती एकमेव. त्यामुळे आमच्यासाठी तू आहेस. काळाच्या अलीकडे आणि पलीकडे तू आहेसच…  

स्वप्न तर पडलं पण दुसऱ्या दिवशीही आधीपासून वाटणारी ती सगळी भीती आणि तो विचार डोक्यातूनमात्र गेला नाही. मी मग अविनाशला फोन केला आणि संतोष काय म्हणाला, मला काय वाटतं हे सगळं त्याला सांगितलं. तो आधी इतक्या मोठ्ठ्याने हसला की मला खूप शरमल्यासारखं झालं. तो काय काय सांगत राहिला आणि मी ऐकत गेलो आणि मला पटलं त्याचं म्हणणं. तो म्हणतो, माझा अश्वीनीवर जितका विश्वास असेल तितकाच नात्यात दिसेल. माझा तिच्यावर विश्वास असेल तर मला कुठल्यातरी इन शर्ट असलेल्या चष्मीश मुलाची भीती बाळगायची गरज नाही.

तो म्हणाला की मी असा विचार करणं हे अश्विनीला माझ्याबद्दलं जे वाटतं, तिचा जो विश्वास माझ्यावर आहे, त्या सगळ्याचा अनादर करण्यासारखं आहे. तो असंही म्हणाला की, जर असंख्य चश्मिष मुलांना सोडून अश्विनीने माझ्य्यावर प्रेम केलं आहे तर ती काय ते सांगेल अशा मुलाला त्याची मी भीती बाळगण्याचं कारण नाही.

मग मी लगेच रात्री तिला फोन केला. ती टीम लीडरबद्दल काही म्हणणार मीच म्हटलं, किती चांगला आहे नाही का, कुणालाही आवडेल अगदी, तर म्हणते कशी, “तो लाख असेल रे चांगला; पण मला आवडतो तो मुलगा तर बसलाय घरी. मला आवडणारा मुलगा आहे ना, तो ना, मला एकही पत्र लिहित नाही, पण त्याच्या आज्जीला १७-१७ पत्र लिहितो… आज्जीला सांगणारे मी एकदा की त्याला सांग की, मलाही आवडेल एक पत्र…” आणि मग आम्ही खूपवेळ हसत होतो. त्या रात्री सगळे चश्मिष व्हिलन हवेत उडून गेले… कायमचे…

आत्ता तिला पत्र लिहायला घेतोय.  त्यामुळे तुझ्याशी जरा पुढच्या पत्रात बोलतो…

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


 

Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :