विसाव्या शतकाचं शेवटचं म्हणजेच, नव्वदीचं दशक. असा काळ जेव्हा, शतक-दीड शतकभर स्त्रीमुक्तीसाठी राबलेल्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांना फळं येऊ लागली होती. स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत होऊ लागलं होतं. मोठ्या आत्मविश्वासानं त्या पुरुषांच्या बरोबरीनं विविध क्षेत्रांमधे वावरू लागल्या होत्या. आपलं मौलिक योगदान देऊ लागल्या होत्या. पण असं असलं तरी एक क्षेत्र होतंच, जिथं अजूनही स्त्रिला शिरकाव नव्हता. ते क्षेत्र होतं भारतीय सैन्याचं! स्त्रियांनी पुरुषांची कितीही बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी सैन्यामधलं कष्टप्रद जगणं त्यांना झेपणं अशक्य आहे, हे म्हणणारा तो काळ होता. स्त्रियांना सैन्यामधे शिरकाव करू देणं हे मोठं जोखमीचं काम आहे, हे समजणारा काळ होता. नव्या शतकाची, नव्या विचारांची ओढ लागली असली तरी जुनं पूर्णतः सोडता येत नाही, अशा संक्रमणाच्या अवस्थेचा काळ होता. अशामधे, एक साध्या घरातली मुलगी येते आणि पाहता पाहता समाजानं मांडलेली सगळी समीकरणं मोडीत काढून एक नवं क्षेत्र पादाक्रान्त करते… ही घटना निश्चितच येत्या काळाला नवा आकार देऊ पाहणारी होती. या मुलीची, म्हणजेच गुंजनच्या संघर्षाची कहाणी सांगणारा चित्रपट – गुंजन सक्सेना!
गुंजन सक्सेना ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन भारताच्या सुरक्षेसाठी आपलं योगदान देणारी पहिली महिला पायलट आहे. १९९४ साली भारतीय वायू सेनेमध्ये रुजू होणारी गुंजन १९९९ सालच्या भारत-पाक सीमेवर झालेल्या कारगिल युद्धामधे सामील झाली. हवाई मार्गासाठी अतिशय जोखमीच्या असणाऱ्या उद्धमपूरच्या दऱ्या-खोर्यांमधून हेलिकॉप्टर न्यायचं, युद्धभूमीची पाहणी करून शत्रूच्या जागा हेरायच्या आणि प्रत्यक्ष युद्ध चालू असताना युद्धभूमीवर जाऊन जखमी भारतीय सैनिकांच्या बचावाचं काम करायचं या प्रमुख जबाबदाऱ्या गुंजननं निर्भीडपणे पार पाडल्या. आणि हे करत असताना तिचं वय होतं अवघे २४ वर्षं!
गेल्या ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा चित्रपट फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावरून प्रेरित झालेला असला, तरी चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शक आपल्याला कबुली देतो की हा चित्रपट गुंजन यांच्या आयुष्याचं तंतोतंत चित्रण नाही. चित्रपट किंवा नाट्य परिणामकारक व्हावं म्हणून मूळ घटनांमध्ये गरजेप्रमाणे फेरफार केलेले आहेत. सत्य घटनांची काही प्रमाणावर मोडतोड केली आहे. शिवाय, चित्रपटाची ट्रीटमेंटसुद्धा टिपिकल बॉलीवूडपटांच्या वळणानं जाणारी आहे. पण असं असलं तरी दिग्दर्शक शरण शर्मा एका स्त्री-योद्ध्याची गोष्ट परिणामकारक पद्धतीनं सांगतात आणि चित्रपट बघण्याचा अनुभव अनेक पातळ्यांवर प्रेरणा देणारा ठरतो. आपल्या वैयक्तिक जगण्यातल्या युद्धांना तोंड देण्याचं बळ देणारा ठरतो.
कारगिलचं युद्ध गुंजननं वयाच्या २४ व्या वर्षी अनुभवलं असलं, तरी प्रत्यक्ष जगण्यातलं युद्ध मात्र त्या दिवशीच सुरु झालं होतं ज्या दिवशी तिनं मोठं होऊन पायलट व्हायचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेतला तेव्हाचं तिचं वय होतं केवळ १० वर्षं. स्वप्न बघणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं या दोन अवस्थांमधे मोजता येणार नाही इतकं प्रचंड अंतर असतं, हे न कळण्याचं ते वय होतं. अशा निष्पाप वयाची गुंजन आपल्या भविष्याविषयी एक स्वप्न बघते, इथपासून चित्रपट सुरु होतो.
गुंजन विमानप्रवासात असते. तिला खिडकीतून बाहेर बघायचं असतं. मात्र खिडकीची जागा घेतलेला तिचा मोठा भाऊ तिला काही केल्या खिडकी उघडू देत नसतो. दोघा भावंडांमधलं भांडण जेव्हा विमानातली एअर होस्टेस बघते, तेव्हा ती गुंजनला पायलट केबिनमधे घेऊन जाते. छोट्याशा खिडकीतून दिसणारं आकाश बघण्याची इच्छा असलेली गुंजन काचेतून पलीकडचं दृश्य बघते आणि बघत राहते… विस्तीर्ण आकाशाचा मोठाच्या मोठा तुकडा तिच्यासमोर पसरलेला असतो. पिंजारलेल्या कापसासारख्या ढगांच्या पुंजक्यांनी नजर पोहोचेल तिथवर केलेली गर्दी केलेली असते. डोळ्यांवर काळा गॉगल घातलेला पायलट ढगांच्या गर्दीतून वाट काढत असतो.. विमानाचे पंख घेऊन आकाशात भरारी घेत असतो.. तिला त्या पायलटचा प्रचंड हेवा वाटतो. तत्क्षणी ती ठरवते, की मोठं होऊन आपणसुद्धा पायलट व्हायचं आणि असंच आकाशात मनसोक्त उडायचं…
घरी येऊन गुंजन आपल्या दादाला आपलं स्वप्न सांगते, तेव्हा दादा तिची मस्करी करतो. तिला म्हणतो, ‘तू फार तर एअर होस्टेस होऊ शकतेस. कारण, मुलींना पायलट होता येत नाही..’ जेवणाच्या टेबलावर होणाऱ्या मुलांच्या या गप्पा वडील ऐकत असतात. वडील मुलाचं म्हणणं खोडून काढतात आणि गुंजनला सांगतात की मनापासून जे करावंसं वाटतं ते करण्याचं स्वातंत्र्य तुला आहे. आपल्या विचारांना, स्वप्नांना कधीही आडकाठी घालू नकोस, असा वडिलकीचा सल्ला ते तिला देतात. ते ऐकून गुंजन खुश होते आणि पुन्हा आपल्या स्वप्नरंजनामधे गढून जाते.
गुंजनचे वडील स्वतः निवृत्त सैनिक असल्यामुळं तिचा दादा वडलांच्या पावलावर पाऊल ठेवून आर्मीत भरती होतो. अभ्यासात हुशार असलेली गुंजन चांगल्या मार्कांनी दहावी पास होते. पायलट होण्यासाठी दिल्लीला जाण्याची आपली इच्छा असल्याचं गुंजन घरच्यांना सांगते, तेव्हा घरात एकच हाहाकार उडतो. जुन्या विचारांच्या आईला गुंजनचं हे स्वप्न पटत नाही. स्वतः आर्मीमधे असलेला दादासुद्धा पुन्हा एकदा तिच्यावर चिडतो. सैन्य ही काही मुलींनी जाण्याची, काम करण्याची जागा नाही, हे तो तिला खडसावून सांगतो. मात्र याही परिस्थितीमधे गुंजनचे वडील तिच्या पाठीशी भक्कम उभे राहतात. आणि गुंजन भारतीय वायू सेनेच्या मुलींच्या पहिल्या-वहिल्या बॅचला ऍडमिशन घेते.
या संपूर्ण बॅचमधे गुंजन एकटीच मुलगी असते. त्यामुळे, एवढ्या मुलांमधे एकटीच गुंजन कशी प्रशिक्षण घेणार याविषयी तिच्या दादाला खूप प्रश्न असतात. दादानं गुंजनच्या करिअरवर घेतलेली भूमिका एका बाजूनं रास्तच असते. आपल्या लाडक्या बहिणीची काळजी, तिची सुरक्षितता याव्यतिरिक्त कुठलाही वेगळा हेतू त्याचा नसतो. बहिणीवर त्याचं अतोनात प्रेम असतं. आणि या प्रेमातूनच तिनं दिल्लीला जाऊ नये, असं त्याला मनापासून वाटत असतं. गुंजनच्या आईची मतं ही कुठल्याही मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीच्या मतांपेक्षा वेगळी नसतात. अशा जोखमीच्या करिअरची निवड मुलीनं केल्यास तिच्या लग्नात अडथळे येतील, अशी टिपिकल चिंता तिला लागून असते. केवळ वडलांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर गुंजन आपल्या निर्णयावर ठाम राहते.
पोहोचल्यानंतर मात्र गुंजनच्या लक्षात येतं की तिथली परिस्थिती तिनं कल्पना केली त्यापेक्षा कैक पटींनी बिकट असते. तिचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही अशी एक वास्तू असते जिच्यामध्ये कधीही मुलींनी प्रवेश केलेला नसतो, किंवा मुलींनी प्रवेश करण्याची तिळमात्रसुद्धा तिथं शक्यता नसते. अशा ठिकाणी राहण्यासाठी असलेल्या कॉमन व्यवस्थेमध्ये गुंजन इतर मुलांबरोबर कशी राहणार? तिथं मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम नाहीत.. सगळे टॉयलेट्स जेन्टससाठी.. साधे कपडे बदलायला तिथं जागा नाही.. मुला-मुलांमध्ये चालणारे अश्लील जोक, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या..
अडचणींची ही यादी फक्तच निवासव्यवस्थेशी संबंधित असते. इतरही बऱ्याच अडचणी असतात. आणि या सगळ्यात मुख्य अडचण असते ती बॅचमधली मुलं आणि प्रशिक्षण देणारे अधिकारी यांच्या मानसिकतेची. गुंजनचा प्रवेश झालेला असतो तो केवळ त्या वास्तूमध्ये; तिथल्या पुरुषांची गुंजनचा स्वीकार करण्याची तयारीच नसते. गुंजनशी कोणीही मैत्री करत नाही, सगळे मिळून तिला एकटं पाडतात.. गुंजनला वर्गात बसून शिकण्यापासून कोणीही अडवत नसतं, मात्र तिला ‘सॉर्टी’ म्हणजे प्रत्यक्ष हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण देण्यामधे तिथले अधिकारी टाळाटाळ करत असतात. ज्या ज्या दिवशी सॉर्टीवर गुंजन जाणार असते तेव्हा तेव्हा कुठलं ना कुठलं कारण देऊन ती सॉर्टी रद्द केली जात असते. या असहकाराच्या मागं हेतू एकच असतो, तो म्हणजे गुंजननं कंटाळून जाऊन आपला प्रवेश रद्द करावा आणि पायलट बनण्याचं स्वप्न गुंडाळून ठेवून माघारी निघून जावं.
कुटुंबातल्या माणसांचा विरोध मोडून काढणं तुलनेनं सोपं असतं.. इथं मात्र नवी जागा, नवी माणसं, नवं काम… गुंजन या सगळ्या अडथळ्यांना कशी उत्तर देते याचा प्रवास वाचण्यापेक्षा बघावा असा आहे. गुंजनची भूमिका साकारणाऱ्या जान्हवी कपूरनं भूमिकेला न्याय दिला आहे, त्यामुळे तर हा अनुभव अधिक समाधान देणारा ठरतो.
फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांची कथा आपल्याला आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला भाग पाडते. जगण्यात चिकाटी आणि श्वासात जिद्द घेऊन लढण्याची उर्मी देते. शेवटी, युद्धभूमी असो किंवा तुमच्या-माझ्यासारख्या माणसांचं सामान्य जगणं असो.. ‘रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ आहेच!
***
वाचा
कविता दातीर यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
समाजकारण
कथा
कविता
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.