प्रिय आज्जी,
अश्विनीला पुण्याला जाऊन आठ दिवस झाले. मागच्या रविवारी पुण्याला पोचली ती. आठवड्याभारत तीन-चार वेळा तरी मानसी काकू येऊन गेली आणि अश्विनी कशी छान सेटल झाली आहे वगैरे सांगून झाली. दोन दिवसातच कंपनीत काम सुरु झाल्याने आमचं बोलणंच झालं नाहीये व्यवस्थित. रात्री काम संपल्यावर दमते गं बिचारी! मग मी उगाचच ते जेवलीस का वगैरे टिपिकल प्रश्न विचारुन तिला बोअर करत नाही. गुरुवारी तिनं रात्री व्हिडिओ कॉल केला होता, पण रेंजमुळे व्यवस्थित बोलणं झालं नाही.
मी पुण्यात असताना सारखं वाटायचं की, अश्विनीने पुण्याला यावं म्हणजे आम्हाला जरा मजा करता येईल, एकत्र वेळ घालवता येईल. एकदा ती तिच्या त्या कात्रजच्या मावशीकडे आलीही होती, पण मग आम्हाला फारसा वेळ मिळाला नाही. तिला भेटायला बोलवावं म्हणून फोन केला तर त्या मावशीने जेवायलाच बोलावलं आणि मग तो एकदम सगळा कौटुंबिक भोजन सोहळाच झाला. आम्हाला नीट बोलताही आलं नाही.
आता ती एकटी राहत्येय तर मी पुण्यात नाही. गुरुवारी रात्रीचा व्हिडिओ कॉल १५-१७ मिनिटं चालला, त्यातही ती ५-७ मिनिटं मी केस कसे कधीच विंचरत नाही याबद्दलच बोलली. तिनं तर पूर्वाताईला राखीबरोबर दोन चार कंगवे पाठवायला सांगते असंही सांगितलं. मला तिची खूप आठवण येत होती, मला तिच्याशी बोलायचं होतं, तिला एकदा बघायचं होतं पण माझ्या केस विंचरण्याकडे विषय सरकल्यावर आता मी काय बोलणार. मग मी इकडचं तिकडचं बोललो आणि फोन ठेवला. माझा मूडच गेला आज्जी.
कधीकधी ना अश्विनी अगदी तुझ्यासारखी किंवा मम्मीसारखी वागते. म्हणजे मी अगदी कौतुकाने सेल्फी काढून पाठवावा तर ही हाच टीशर्ट का घातलायस, अरे हाताची नखं काप किंवा मग अरे त्या फोनचा कॅमेरा जरा स्वच्छ कर वगैरे असलं काहीतरी सांगत राहते. मी काहीही उत्साहाने सांगायला लागलो की मध्येच खुदकन हसते आणि मग मी विचारतो काय झालं तर म्हणते असं तू एक्साइट होऊन बोलायला लागलास की खूप क्युट दिसतोस (तू गोड दिसतोस म्हणायचीस, तसंच काहीसं ती म्हणते. मला क्युट म्हणणारी तुझ्यानंतर ती एकच) आणि मग मला तिच्यावर रागावताही येत नाही.
सकाळी ९ ते साधारण संध्याकाळी ६.३० पर्यंत अश्विनीचा मेसेज नसतो. आजी दिवसाचा हा काळ प्रचंड अवघड असतो. सिनेमा बघताना किंवा दुसरं काही करताना सतत तिचा मेसेज येईल किंवा ती एखादा फोटो पाठवेल अशी आशा लावून मी बसलेला असतो. माझ्याकडचे पैसेही आता संपत आलेत त्यामुळे तिला सरप्राईज म्हणूनही काही देता येत नाही.
आमचा कॉलेजमधला मित्र, संतोष परवा भेटला होता, तो गंमतीने म्हणाला की, अश्विनीला आता तिच्या कंपनीतला एखादा तरी पोरगा प्रपोज करणार बघ वरद. मी हसून विषय सोडून दिला. संतोष हे बोलून निघून गेला, पण मला उगाचच असं वाटत राहिलं की, हे खरं झालं तर काय घ्या… आता एखादा दिवस तिचा मेसेज किंवा फोन यायला उशीर झाला तर असा एक इन शर्ट केलेला, उंच, चश्मीश मुलगा उगाचच डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग काय करावं तेच कळत नाही. म्हणजे अश्वीनीवर माझा विश्वास आहे. मी दोन वर्ष नोकरीत होतो तेव्हा तीही मला चिडवायची; पण आम्ही ते हसण्यावारी सोडून द्यायचो, पण अश्विनीच्या बाबत असा विचार करायलाही नको वाटतो गं.
पटकन काहीतरी कारण काढून पुण्याला जाऊन राहवं का असं वाटतं पण मग असंच उठून आता जाता येणार नाही हे लक्षात आल्यावर स्वत:चा प्रचंड रागही येतो. त्यादिवशी ती कोणतातरी टीम लीडर कसा चांगला आहे असं म्हणाली आणि आपण किती अपयशी आहोत असं वाटलं…
काय करु आज्जी, अश्विनीशी बोलू का? बरं दिसेल का ते? पोरगी जरा गरम डोक्याची आहे. खूप बोलेल. तिला वाईट वाटेल, पण मग नात्यातला विश्वास कसा टिकू द्यायचा… तू इथे हवी होतीस आज्जी… अश्विनी पुण्यात… तू तिकडे आणि माझ्या डोक्यात असले विचार… गणपती काही जादू करुन मला पुण्यात पाठवू शकेल का?
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.