आजीची गोधडी । पत्र एकोणीसावं

प्रिय आज्जी,

आत्ता मी हे पत्र लिहायला घेतलंय तेव्हा सकाळचे अकरा वाजलेत. पप्पा सकाळी ९ वाजताच दुकानावर गेले आहेत. मम्मी किचनमध्ये काहीतरी करते आहे. सहसा दिवसाच्या यावेळी मी तुला पत्र लिहित नाही पण आज मला थोड्या वेगळ्याच विषयावर तुला पत्र लिहायचं आहे म्हणून डोक्यात लिहू का नको याचं युद्ध सुरु होण्याआधी लिहून टाकावं म्हटलं. गेल्या सहा सात महिन्यात पहिल्यांदाच एका विचित्र एकटेपणाचा अनुभव आला. अनेक दिवस अश्विनी इथे होती तेव्हा आपल्याला नोकरी नाही याबद्दल अपराधी वाटलं, थोडंसं वाईटही वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं पण नोकरीची मनात बसलेली भीती अजून जात नाही. पहिल्या नोकरीतला अनुभव बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करायला मन अजून तसं तयार होत नाही. हे सगळं असलं तरी या सगळ्या काळात एकटेपणा जाणवला नाही. पण आता अश्विनीच्या अनुपस्थितीत शेवटी त्यानं मला गाठलंच आहे.

गंमत म्हणजे अश्विनीने माझ्या पत्राला उत्तर म्हणून लिहिलेल्या पत्रातही तिला जाणवणाऱ्या एकटेपणाचा उल्लेख केला आहे. ती पत्रात म्हणते: “कधी कधी संध्याकाळी काम संपलं की कुणीतरी छान कॉफी करुन द्यावी आणि तू इथे माझ्यासोबत कॉफी प्यायला असावंस असं वाटतं. सकाळी उठताना दिवस सुरूच होऊ नये असं वाटतं. शनिवार-रविवारी एकटीनेच घरात बसणं किंवा नुसतंच  बाजारातले रस्ते फिरणं दोन्ही कांटाळवाणं होतं. पैसे मिळतात पण हे पुण्यातलं एकटेपण भयाण आहे. समोरच्या ब्लॉकमध्ये कोण राहतं हेसुद्धा माहित नाही. चार चिल्लीपिल्ली पोरंही दंगा करत नाहीत. जाम बोअर होतं राव या शांततेनं. कधीकधी वाटतं की तू पुण्यात आलाच नाहीस तर मला इथं एकटीलाच राहावं लागेल असं वाटतं. बिल्डिंगच्या खाली कुणीतरी एक लहान मुलगी संध्याकाळी एकटीच गोल गोल सायकल फिरवत असते. तिच्याकडे बघितलं की आपण सगळे कशा सायकली फिरवून कॉलनीतल्या ग्राउंडवर दंगा घालायचो ते आठवतं, पण इथे मोठ्याने कुणी कुणाला हाक मारली तरी ओरडतात अरे हळू आवाजात हाक मारा म्हणून… तुला घरी एकटं वाटतं का? शहरातलं एकटं राहतानाचं एकटेपण आणि घरात फॅमिलीबरोबर राहतानाचं एकटेपण वेगळं असतं का? आपल्याला वाटणारं एकटेपण लोकेशननुसार बदलतं का?

मी अजून तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये, पण तुला काय वाटतं आज्जी? एकटेपणाचं कोडं तुला पडलं होतं का कधी? तू तिकडे असताना आम्हाला सारखं वाटायचं की आजोबांना तुझ्याशिवाय एकटं वाटत असेल पण त्यांना विचारलं तर ते तसं काही म्हणायचे नाहीत. अश्विनी म्हणते तसं भयाण एकटेपण मी पुण्यात अनुभवलं आहेच पण त्याबद्दल कधी काही म्हणालो नाही कारण तू पुण्याला येऊ शकणार नाहीस हे माहित होतं. आणखी काहीच लिहायचं नाहीये, आम्हाला पडलेलं एकटेपणाचं कोडं बहुधा आम्हालाच सोडवावं लागेल. आपल्याला वाटणारं एकटेपण लोकेशननुसार बदलतं का? हा अश्विनीचा प्रश्न वाचल्यावर तू आठवलीस… आजोबा तिकडे येईपर्यंत स्वर्गात तुला एकटं वाटलं होतं का? तू काय केलंस?

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


   

Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :