एक अतिशय वाईट बातमी आहे. आमचे मराठीचे सरवटे सर मागच्या आठवड्यात हार्ट अॅटॅकने गेले. आता देवाघरी गेलेल्या माणसांबद्दल तुझ्याशी बोलताना नक्की कुठलं क्रियापद वापरायचं ते मला नक्की कळलेलं नाही पण आत्ता सर ‘गेले’ असंच म्हणूया.
मी सुजयचा व्हॉट्सऍप स्टेटस पाहिला तेव्हा मला कळलं. शाळेच्या वार्षिक अंकात येणारा त्यांचा हसरा फोटो त्याने स्टेटसला ठेऊन त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असं लिहिलं होतं. सरवटे सर इतिहास आणि मराठी शिकवायचे. पप्पा-मम्मीला शिकवणारे शिक्षक अलीकडे जख्ख म्हातारे होऊन गेलेले आम्ही ऐकलं आहे. आम्ही शाळेत असतानाही एक-दोन शिक्षक असेच अचानक गेले, पण तेव्हा त्याचं तितकं गांभीर्य कळत नव्हतं. हे सर ‘गचकले’, ते सर ‘ऑफ झाले’ असं सुद्धा पोरं अगदी सहज म्हणायची. पण सरवटे सर गेल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं. यातलं काहीच ओठावर आलं नाही.
कधीही वर्गातल्या खुर्चीवर न बसता पहिल्या बेंचच्या जवळ उभं राहून सर शिकवायचे. मराठीचा धडा शिकवताना त्यांनी कधीही हातात पुस्तक घेतलेलं मला आठवत नाही. सातवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘पाखऱ्या’ नावाची कथा होती. बरीच मुलं त्याला ‘धडा’ म्हणायची, तेव्हा ती ‘कथा’ आहे हे सर आवर्जून सांगायचे. एक म्हातारा शेतकरी आणि त्याचा बैल यांच्या नात्यावर ती कथा होती. ती कथा आता फारशी तपशीलात आठवत नाही, पण परवा सर गेल्याची बातमी पाहिली तेव्हा सर्वात पहिल्यांदा ते ‘पाखऱ्या’ नाव आठवलं आणि ती कथा एखाद्या गोष्टीसारखी सांगणारे सर दिसले.
सरवटे सर खूप मारतात असं पाचवीत गेल्यापासून आम्ही ऐकून होतो, त्यामुळे त्यांची भीती वाटायची. ते ज्यांना इतिहास शिकवायला होते त्या वर्गातली मुलं ते इतिहास काय अफलातून शिकवतात हे सांगायची, पण त्यांच्याकडून आम्हाला इतिहास शिकता आला नाही.
मी इथून एकदा कॉलेजसाठी बाहेर पडल्यानंतर सुट्टीला इथे आलो तरी शाळेत गेलो नाही. आपल्या जुन्या शिक्षकांना भेटावं वगैरे मला कधीच वाटायचं नाही. एवढंच काय कॉलेजमधून बाहेर पडल्यावर पुण्यात असूनही मी कॉलेजच्या शिक्षकांना भेटलो वगैरे नाही. सरांची बातमी पाहिल्यावर मी सुजयला फोन केला. फोन ठेवला आणि मग वाटलं की एकदा त्यांना भेटायला हवं होतं.
मी शेवटचं त्यांना भेटलो तेव्हा ते आमच्या बॅचच्या रियुनियनला आले होते. आम्ही शाळेतून बाहेर पडून ४ वर्षं झाली होती आणि तरीही रियुनियनला आलेल्या शिक्षकांना आम्हाला उपदेश करायचा मोह आवरला नाही. ‘मोठे व्हा पण पालकांना, गावाला, शाळेला विसरू नका’ वगैरे असली वाक्य प्रत्येक शिक्षकाने आपल्या भाषणातून फेकली. सरवटे सर उभे राहिले आणि फक्त एवढंच म्हणाले, “आता तुम्ही १९-२० वर्षांचे आहात. मी काही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाहीये. पण मी एवढंच सांगतो की, कधीही बोलावसं वाटलं, गप्पा माराव्याशा वाटल्या तर शाळेत या, माझ्या घरी या. मला तुमचा मित्र समजा. आपण बोलूया. तुम्ही काही नवीन वाचलं, पाहिलं, ऐकलंत तर मला आवर्जून सांगा. आनंदी रहा.”
सरांचं हे वाक्य मला तेव्हाही थोडं सरप्राईज करून गेलं होतं. आपल्या शिक्षकाने मैत्रीचा हात पुढे करावा आणि विद्यार्थ्यांनी तो स्वीकारावा अशी संस्कृती आपल्याकडे फारशी रुजलेली नाही. पण ते गेल्यानंतरच्या या सगळ्या दिवसात वाटतंय की त्यांच्याशी बोलायला हवं होतं. ‘सांगा कसं जगायचं?’ ही पाडगावकरांची कविता त्यांना आवडायची. ती परवा वाचली तेव्हा वाटलं सरवटे सरांना ‘सांगा कसं जगायचं?’ हे विचारायला हवं होतं कदाचित तेही पाडगावकरांसारखं ‘तुम्हीच ठरवा’ असं म्हणाले असते.
तू, सरवटे सर अशी माणसं गेल्यावरच त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं हे प्रकर्षाने जाणवतं. पण मग तुमच्याशी मनातल्या मनात संवाद चालू राहतो. तुमचे शब्द, तुमच्या आठवणी सोबत करत राहतात. त्या जगण्याचं बळ देतात. भूतकाळच वर्तमानकाळाला गती आणि बळ देतो का आज्जी?
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.