प्रिय आज्जी,
मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे मी अश्विनीशी बोलायचा प्रयत्न केला पण मला तसं काही जमलं नाही. मला उगाच असं वाटलं की मी मला हे आवडत नाही असं सांगितलं आणि तिचा मूड ऑफ झाला तर मग उगाचच भांडण होईल मग ती मला एक तर इग्नोअर करेल किंवा मग ती उगाच प्रयत्न करून माझ्या आवडीचं काहीतरी बोलत राहील पण त्यात तिची नेहमीची एक्साईटमेंट असेलच असं नाही.
मी विचार करत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की, ती ऑफिसमधून दमून घरी येते आणि तिला असलंच काहीतरी अलाणा-फलाणा बोलायचं असेल तर काय हरकत आहे; इतरांची लग्न, लव्ह स्टोरीज आणि एकूण ऑफिस गॉसिप करण्यात तिला मजा येते. लहानपणी मी शाळेतून आल्यावर नाही का तुला आणि मम्मीला सगळं सांगायचो, तेव्हा मी कुठे विचारलं तुम्हाला ते सगळं आवडतंय का नाही? त्यातलाच हा एक प्रकार आहे की नाही… आणि अश्विनी खूप क्युट आणि समजूतदार आहे गं…
बाय द वे, हॅपी न्यू इयर आज्जी! तुझ्या भाषेत बोलायचं झालं तर “इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!” “तुम्हाला हे वर्ष समृद्धीचे, भरभराटीचे जावो,” असले टिपिकल मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. अजून एक चार दिवस येतच राहतील. मी तर बरेचसे वाचलेच नाहीत, नुसतंच हॅपी न्यू इयर असं लिहितो आणि पाठवतो. मयुरीचा मेसेज आला होता, “लेट्स होप की नव्या वर्षात तुझ्या आवडीचं असं तुला काहीतरी सापडू दे आणि फेवरीट लोकांना भेटण्यासाठी पुण्याला येण्याची बुद्धी होऊ दे.” हल्ली तिच्या प्रत्येक मेसेजमध्ये या न त्या कारणाने अश्विनीचा उल्लेख असतो.
काल पूर्वाताईने एक व्हिडीओ पाठवला होता. तिची एक मैत्रीण युट्युब चॅनेल चालवते. ती कौन्सेलर आहे. तिच्या व्हिडीओजचा format असा आहे की ती लोकांकडून आलेला एक प्रश्न घेते, ज्यात अनेकवेळा एक कॉन्फ्लीक्ट असतो आणि मग ती तिच्या पद्धतीने त्याचं एक पॉसिबल सोल्युशन देण्याचा प्रयत्न करते. तर काल ती आवडीचं करिअर निवडणं आणि त्यातल्या कॉन्फ्लीक्ट्सबद्दल बोलत होती.
ती बोलता बोलता असं म्हणाली, “आवडीचं करिअर निवडणं सोपं असतं कारण सुरुवातीला तुम्ही एक्साईटेड असता आणि तुम्हाला आनंद मिळत असतो, पण रोज तेच काम करू लागल्यावर त्यातली आवड तितकीच राहते का कमी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे नाहीतर ते आवडीचं करिअरही हळूहळू एखाद्या नाईलाजाने करायला लागणाऱ्या जॉबसारखंच होऊन जातं. पण तुम्ही सतत स्वत:ला रिइन्व्हेंट करत राहिलात तर त्यातली आवड टिकून राहू शकते.”
यातल्या रिइन्व्हेंट या शब्दावर मी विचार करतो आहे. आवडीचं काम एका ठरावीक टप्प्यानंतर एकसुरी आणि कंटाळवाणं होऊच शकतं. ते तिचं अगदीच बरोबर आहे, पण आपल्या सगळ्यांना रिइन्व्हेंट करण्याची इच्छा आणि समज असते का गं? म्हणजे मी जॉब सोडून घरी आलो तर शंभरातल्या ९५ जणांना वाटतं की मला नवीन जॉब मिळाला की गाडी रुळावर येईल. त्यांच्या मते, एक नोकरी सोडून तशीच दुसरी (आणि जास्त पगाराची) नोकरी करणं म्हणजे रिइन्व्हेंट करणं. मला तर असं वाटतं की आजूबाजूचे लोकच आपल्याला रिइन्व्हेंट करू देत नाहीत.
मम्मीच्या मराठी सीरिअलमधल्या एका मुलीने जरा बिनधास्त आणि वेगळ्या पद्धतीचा रोल केला तर तिला ते नको असतं. एवढंच कशाला त्या मुलीने एखाद्या कार्यक्रमात वेगळ्या फॅशनचे कपडे घातले तरी मम्मी आणि तिचं महिला मंडळ लगेच “शी हे काय घातलंय बाई. एखादी कशी नेटकी साडी का नेसत नाहीत या मुली?” अशी काहीतरी कमेंट करून मोकळं होतं. जे लोक अशा मुलीला वेगळ्या कपड्यात पाहू शकत नाहीत, त्यांना तिने स्वत:ला रिइन्व्हेंट वगैरे केलेलं आवडणारच नाही आणि मग आवडीचं प्रोफेशन असूनसुद्धा ज्या भूमिकांना आणि कपड्यांना पसंती आहे तेच घालावे लागतील.
पण मग लोकांचं न ऐकता या रिइन्व्हेंट करण्याला सुरुवात करायला पाहिजे का? तू असं म्हणशील की आपल्याला योग्य वाटेल आणि लोकांना त्रास होणार नाही असं काहीतरी करावं. पण आज्जी आता मी काही करत नाहीये तरी लोकांना किती त्रास होतोय.. पण पूर्वा ताईच्या मैत्रिणीचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला वाटतंय की तिच्याशी बोलावं, तिची मदत घ्यावी. बघू काय होतंय ते. कदाचित रिइन्व्हेंट करता करता सापडेल एखादी नवी आवड.
पण मी तिच्याशी बोलणारे. मेघना नाव आहे तिचं. पूर्वा ताईने तिचा नंबर दिलाय. युट्युब व्हिडीओमध्ये वाटते तितकीच सेन्सिबल ती बाहेरही असेल असं वाटतं. लेट्स होप की नव्या वर्षात मला नवं काहीतरी सापडेल आणि तुला सांगायला, या पत्रांमधून लिहायला माझ्याकडे काहीतरी नवीन असेल.
हॅपी न्यू इयर आज्जी! काळजी घे.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!
Great content! Keep up the good work!