‘दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..’
होय, महाराष्ट्र माझाच! खरं सांगायचं तर माझा जन्म झाला गोव्यात; परंतु आत्मीयता, प्रेम, ममता आणि तत्सम बाबी, ज्या ज्या म्हणून निष्ठा या टॅगसह असतील किंवा आहेत, त्या त्या सगळ्या माझ्या मनात केवळ एका महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि या पुढेदेखील त्या तशाच कायम राहणार आहेत. आणि ते प्रेम वृद्धिंगत होतच राहील. आता माझ्या मनात एवढी आत्मीयता प्रेम केवळ एका महाराष्ट्राविषयीच का म्हणून? असा प्रश्न समस्त वाचकांच्या मनात न आल्यासच नवल.
वाढता वाढता वाढत चाललेली ही नखभर (?) प्रास्ताविकरूपी भाषणबाजी तूर्त बाजूला ठेवून देऊ. मी एक सिंधुदुर्गातील मालवणी मुलगी (म्हणजे आमचं कुलदैवत तिथं आहे आणि माझ्यासाठी ही अत्याधिक आनंदाची उधळण करणारी बाब आहे.) माझा जन्म एका ‘मासेखाऊ’ मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. पण म्हणून मीदेखील मासेखाऊ आहे, असा गोड, अथवा तिखट गैरसमज मुळीच नसावा, एवढीच माफक विनंतीवजा अपेक्षा. मी एक शाकाहारी मनुष्य प्राणी आहे. शब्द, साहित्य, कथा, ललित लेख, पटकथा, गीतलेखन, संहितालेखन, कविता, गझल, हायकू आणि अशाच अन्य माध्यमातून मराठीच्या चरणी सेवा सुरू आहे.
अरे, नमनाला घडाभर तेल पुरेसं आहे, असं मला वाटतं.
गोव्यात राहून मी माझ्या महाराष्ट्राकडे बघत असते. नेहमी. तेव्हा काय दिसतं? तर – सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, आध्यात्मिक असे अनेक ‘इक’ प्रत्यय लागणारे परीघ नित्यनूतन अशी ओळख या माझ्या राज्याला प्राप्त करवून देत आहेत. त्यातही अधिक ठळकपणे अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे माझ्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडली गेलेली माझी नाळ. ही नाळ जोडली गेल्यानं माझ्या श्वासश्वासात महाराष्ट्र आहे, मराठी भाषा आहे. इथं गोव्यात मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण संमिश्र आहे. मी मात्र जाणीवपूर्वक कायम मराठीतूनच बोलते. प्रत्येक प्रांतागणिक, व्यक्तिपरत्वे मराठी भाषा तिच्या बोली आणि उच्चारातून वेगवेगळं रूप धारण करते. मराठीच्या या सगळ्याच रूपांची मला ओढ आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात माझ्या परिचयाची मंडळी आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं मराठीत कसा व्यक्त होतो, त्यातून स्वतःचं भाषिक वेगळेपण कसं जपतो, याचं निरीक्षण त्यांच्याशी बोलताना मी करते तेव्हा माझ्या मराठीशी अजूनच नातं घट्ट करते.
मराठीचा भाषिक ऐवज जपण्यासाठीची, मराठीची अस्मिता जोपासण्यासाठीची, मराठीच्या कक्षा रुंदावण्यासाठीची महत्त्वाकांक्षा उरी बाळगून मी जगते आहे. मराठी भाषेविषयी आत्मिक प्रेमभावना मनात होतीच. पण ती रुंदावत गेली भाषाविज्ञान अभ्यासल्यामुळं. तेव्हापासून मराठीचे विविध रंग, ढंग, भाषिक छटा शिकून आणि समजून घ्याव्यात, असं मनोमन वाटत आहे. आणि त्या अनुषंगानं माझिया मनाचा प्रवासी पक्षी उड्डाण करण्यास अत्युत्सुक आहे.
हिंदवी स्वराज्याची भगवी पताका या विशाल आभाळात अभिमानानं फडकत राहिली आहे, अशा माझ्या पुण्यभूमी महाराष्ट्राविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. माझा जन्म गोव्यातल्या डिचोलीतला. या भागाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालाय. या संदर्भाचं माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. बा. भ. बोरकरांच्या गोव्याच्या भूमीत आजच्या घडीला मी श्वास घेतेय. पण माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका महाराष्ट्राच्या काळ्या मातीशीच इमान राखणारा आहे. तो तसाच अढळ आणि अबाधित राहील.
महाराष्ट्राचा व माय मराठी मातीचा मृदगंध नित्य नव्या उमेदीनं अंगी भिनवावयाचा, हा एकमेव उद्देश माझ्या मनात आहे. माय मराठीला उराशी कवटाळत, तिच्याच प्रेमाचं अमृतपान करत मला माझा अखेरचा श्वास माझ्या महाराष्ट्रभूमीत घ्यायचा आहे.
गोव्यात राहून मी माझा महाराष्ट्र रोज अनुभवतेय, रोज जगतेय. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र अनुभवायचा आहे, महाराष्ट्र जगायचा आहे. एवढी एकच इच्छा आहे.
प्रत्येक महाराष्ट्रीय मनाला माझ्या मराठी मनाकडून मानाचा मुजरा!
आणि हो,
महाराष्ट्रदिनाच्याही हार्दिक शुभेच्छा!
– साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली (गोवा)
*
वाचा
आज दिनांक
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
चित्रकथा
साधना आरोंदेकर या कविता, ललित लेखन, हायकू गझल लेखनाची आवड जोपासणाऱ्या गोमंतकीय लेखिका आहेत. संहितालेखन तसेच गीत, पटकथा लेखनातही प्रयत्नशील असून मनमंथन आणि शुभंकर हे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.
साधनाला मी ओळ्खतॊ, ती उत्तम लिहिते… मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीबद्दल तिला अपार प्रेम आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व तर आहेच…ती जसं वाचकाला आपल्या लेखणीत मग्न करते तशीच ती बोलते देखील…
हल्लीच तिच्याशी संपर्क झाला… जवळपास सात ते आठ पुस्तकांचं काम सुरू आहे… लवकरच ही पुस्तके वाचकांच्या भेटीला येतील.
उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा! 💐💐💐