वळण वाटातल्या जाळीत हिरवे छंद,
वाहत्या निर्झरांचे गुंतले भावबंध…
विविध वाटा चालून एका झऱ्याजवळ आपण येतो तेव्हा एक सुकून मनाला मिळतो आणि मन आनंदात रमतं.
नेमकी हीच भावना आत्ता माझ्या मनात आहे.
त्याचं झालं असं शाळा, कॉलेज करून निमसरकारी नोकरीत मी रुजू झालो. तेच ते काम करण्याचा मला कंटाळा आला. माध्यम क्षेत्राशी संबंधित माझं शिक्षण झालं असल्यानं या क्षेत्राशी संबंधित मी दुसरी नोकरी शोधू लागलो. काहीतरी नवीन, वेगळं आणि थ्रिल देणारं काम करायला मिळावं, असं माझ्या मनात होतं. त्याच दरम्यान मला ‘मीडिया को-ऑर्डीनेटर’ अशी एक जाहिरात दिसली. कामाचं ठिकाण होतं, दिल्ली. किमान मुलाखतीच्या निमित्तानं दिल्ली पाहता येईल, असा विचार करून मी फॉर्म भरला. पुढं सगळी प्रक्रिया होत माझी निवड या नोकरीसाठी झाली. मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून मी दिल्लीत आहे. तोपर्यंत माझा प्रवास घर एके घर आणि मुंबई एके मुंबई असंच सुरू होतं. दिल्लीत आल्यापासून जग किती मोठं आहे, हे समजलं. इथं आल्यापासून वेगवेगळे अनुभव येत आहेत. या अनुभवांमुळंच माझ्या मनाला सुकून मिळत आहे.
माझं ऑफिस दिल्लीतल्या एका उंच इमारतीत आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणारी विविध राज्याची माणसं इथं काम करतात. हिंदी या राष्ट्र भाषेत सगळे एकमेकांशी वाद-संवाद करतात. कुणी केरळचा, कुणी काश्मीरचा, कुणी गुजरातचा, तर कुणी बंगालचा. विविधतेत एकता कशी असते, हे मला आमच्या ऑफिसमध्ये काम करताना समजतं. त्याचाच अनुभव मी रोज घेत असतो.
मी महाराष्ट्राचा, त्यातही मुंबईचा असल्यानं मला अनेक बाबतीत व्हीआयपी सुविधा मिळाली. जसं दिल्लीचं आकर्षण प्रत्येकाच्या मनात असतं, तसंच कुतूहल प्रत्येकाच्या मनात महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईबद्दल असल्याचं मला जाणवत होतं. बहुतेक त्यामुळंच अनेकजण स्वतःहून माझ्या जवळ आले. बोलले. ‘मदत लगे तो बोलना…’, असंही काही जण म्हणत. दुसऱ्या बाजूला काही जणांनी सूचक अंतर ठेवूनही वागले. काहींना मी आपला वाटलो तर मला काही आपले वाटले. ओळख होत होती, तसं माझ्याही मनात एक कुतूहल तयार होत होतं. ते असं की हे सगळे भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेले, आपल्या महाराष्ट्राबद्दल काय विचार करत असतील? त्यांच्या मनात महाराष्ट्र कसा असेल? महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या मनातल्या प्रश्नाचा मी शोध घेतला. हा शोध त्यांच्याच शब्दांत –
१. आसामचा मित्र, वय ३२
एक आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य असल्याचं या माझ्या मित्राचं मत आहे. महाराष्ट्र म्हणताच, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, बॉलीवूड, मुंबईचे डबेवाले आणि स्ट्रॉंग मराठा माणूस असं काय काय त्याला आठवतं.
२. तामिळनाडूचा मित्र, वय २४
महाराष्ट्र म्हणजे भरपूर गर्दी, शिवसेनेचा भगवा ध्वज, उत्साहात साजरे केले जाणारे सण, नागपूरची संत्री, मराठी पारंपरिक स्त्रिया कपाळावर लावतात ती चंद्रकोर आणि बॉलीवूड या गोष्टीच त्याला पहिल्यांदा आठवत असल्याचे त्याने सांगितले.
३. आंध्रप्रदेशचा मित्र, वय २८
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र भारतातील तिसरं मोठं राज्य आहे, असं शाळेत अभ्यासल्याचं सुरुवातीलाच याला आठवलं. हे आपल्या देशातलं सगळ्यात व्यस्त राज्य असल्याचं याचं मत आहे. या माझ्या मित्राला महाराष्ट्रात साजरे केले जाणारे सण, इथले पारंपरिक पोशाख आवडतात. भारताची आर्थिक राजधानी मुंबई कशी असेल, याचं आकर्षण याच्या मनात मला दिसलं. आयुष्यात एकदातरी महाराष्ट्र पाहण्याची इच्छा त्यानं मनात बाळगली आहे.
४. दिल्लीतला मित्र, वय ४०
महाराष्ट्र म्हटल्यावर याला नेमकं काय आठवतं, याची मलाच उत्सुकता होती. कारण एकच मी त्याच्या दिल्लीत होतो ना…
महाराष्ट्र म्हणताच याच्या मनात आले, शिवाजी महाराज, हापूस आंबे, वडा पाव आणि मिसळ. पाठोपाठ स्त्रियांचा पारंपरिक पोशाख आणि त्यावरील मोत्याची नथ विशेष लक्षात राहिल्याचे त्याने सांगितले. मुख्य म्हणजे मराठी लावणीचा त्याने आवर्जून उल्लेख केला.
५. पुन्हा नवी दिल्लीचा मित्र, वय ३७
चित्रपट सृष्टीत काम करण्याची या मित्राची इच्छा होती. त्यासाठी तरुण असताना त्याने मुंबईत जाऊ आणि स्ट्रगल करू, अशी स्वप्नही पाहिलं होतं. मात्र काही कारणामुळं या मित्राला दिल्ली सोडता आली नाही. मी ज्या मुंबईत वाढलो, त्या मुंबईच्या अनुषंगाने देशातली कितीतरी तरुण मुलं मुली स्वप्न पाहत असतील. असा सहजच मनात विचार येऊन गेला. महाराष्ट्र म्हटल्यावर या मित्राने साहजिकच बॉलीवूड हा शब्द उच्चारला. मुंबईतला स्ट्रगल हाही शब्द पाठोपाठ त्याच्या बोलण्यात आला. पाठोपाठ अंडरवर्ल्ड, बाळासाहे ठाकरे, शिवसेना, भरपूर ट्राफिक, पाण्याचं संकट या गोष्टी त्याला आठवल्या.
६. हरियाणातला मित्र, वय २७
महाराष्ट्र म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे गेट वे ऑफ इंडिया, फिल्मसिटी, शिवाजी महाराज, पहिला बाजीराव, शिर्डी, अजंठा-एलोरा आणि ‘हराभरा देस’ असं वर्णन त्यानं केलं.
७. उत्तरप्रदेशमधला मित्र, वय ४०
‘महाराष्ट्र म्हणजे समता’ असे शब्द या मित्राने उच्चारले. तेव्हा खरंच मी महाराष्ट्राचा असल्याचा मला अभिमान वाटला. पुढं या मित्राने शिवाजीमहाराज, आयपीएल, गरिबी, शेतकरी आत्महत्या आणि रामदास आठवले यांचा उल्लेख केला.
८. श्रीनगरमधला मित्र, वय ४२
श्रीनगर मधल्या या मित्रानं ‘नाईट लाईफ’ असा शब्द उच्चारला. सतत अस्वस्थ असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या मित्राला शहरातली शांत आणि सुरक्षित रात्रीची ओढ असणारच. लोकल ट्रेन, बिझी रस्ते, स्ट्रीट फूड आणि उंच इमारती ही प्रतिमा त्याची महाराष्ट्राची असल्याचे तो म्हणत असला तरी हे सांगताना त्याच्या मनात मुंबई असल्याचे लगेचच लक्षात येते.
९. ओडिसाचा मित्र, वय ३७
महाराष्ट्र म्हणजे शूरवीर लोकांची भूमी, देशभक्त आणि व्यापार-उद्योगाची भूमी अशी प्रतिमा या मित्राच्या मनात त्याने जपली आहे.
१०. उत्तरप्रदेशमधला मित्र, वय ५०
जेएनयू मध्ये शिकलेल्या या सरांची महाराष्ट्राबद्दल काही पक्की मते असल्याचे जाणवले. त्यांच्या मते, महाराष्ट्र म्हणजे साध्या सरळ लोकांचा प्रांत, सर्वांशी एकरूप होणारी धार्मिक सलोखा जपणारी सिक्युलर माणसं.
त्यांचे काही नातेवाईक मुंबईत आहेत. या नातलगांनी छोटा व्यवसाय करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला, त्यामुळं ते स्वतःला मुंबईशी कनेक्ट करतात.
या साऱ्यांशी बोलल्यावर माझ्या महाराष्ट्राची वेगवेगळी रूपं त्यांच्या मनात असल्याचे लक्षात आले. मुंबई, शिवाजीमहाराज, शिवसेना, बॉलीवूड, शूरवीर माणसं या काही गोष्टी ‘महाराष्ट्र’ या नावाला अगदी घट्ट चिकटल्या आहेत, असं जाणवलं. आपला ज्या भागातून आलो, त्या भागाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता आहे, हेही या गप्पांमधून मला जाणवलं. त्यांच्याकडून महाराष्ट्राबद्दलचं मनोगत ऐकलं आणि माझा महाराष्ट्र दिन, दिल्लीत साजरा झाला.
– कमल अशोक, नवी दिल्ली
***
वाचा
आज दिनांक
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
कथा
कविता
चित्रपटविषय लेख
कमल अशोक हे माध्यम क्षेत्रात नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. मुंबई आकाशवाणी, दूरदर्शन मध्ये त्यांनी काम केलं आहे.