आजीची गोधडी । पत्र चौदावं

प्रिय आज्जी,

१५ ऑगस्टला तुझी खूप आठवण आली. त्यादिवशी १५ ऑगस्ट असूनही मी थोडा उशिराच उठलो. कॉलेजला गेल्यापासून आणि नोकरीच्या वर्षातही फारसं कधी झेंडावंदनाला गेल्याचं मला आता आठवत नाही. १५ ऑगस्ट म्हटलं की आठवते शाळा आणि ती फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि शाळेत दिली जाणारी जिलबी. शाळेतून मागून मी तुझ्यासाठी जिलबी आणायचो. त्यावेळी त्या मॅडमनाही त्याचं आश्चर्य वाटायचं.

तुला आठवतं का माहीत नाही पण मी एकदा लहानपणी शाळेत टिळकांवर भाषण केलं होतं आणि ते तू लिहून दिलं होतंस. मला वाटलं होतं की सगळं भाषण मोठ्या आवाजात करायचं असतं आणि मी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे वाक्य ज्या मोठ्या आवाजात म्हणायचो त्याच आवाजात पुढचं भाषण करायचो आणि तू म्हणायचीस की, अरे वरद, संपूर्ण भाषण असं ओरडत करायची गरज नाही.

ते भाषण इतकं चांगलं झालं होतं की पुढच्या सगळ्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांना मी (अगदी सातवीपर्यंत) टिळक होऊन मोठ्या आवाजात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य म्हणायचो. शाळेजवळ असलेला तो चणेवाला टक्कल असल्याने २६ जानेवारीच्या प्रभातफेरीला गांधी व्हायचा आणि १५ ऑगस्टला मी टिळक. ती पगडी शोधत मी आणि पप्पा किती फिरलो होतो, मग शेवटी पप्पांच्या पुण्याहून माल आणणाऱ्या एका माणसाने आणली.  मला अजून आठवतं तो चणेवाला मला टिळक आणि मी त्याला गांधी काका म्हणायचो. मला तर त्याचं खरं नावही माहित नाही. 

आता मात्र १५ ऑगस्टला सुट्टी आहे तर त्याला जोडून कुठेतरी फिरून यावं एवढेच प्लान होतात आणि हल्ली सगळे जॉब आणि स्ट्रेसपासून दूर एक दोन दिवस कुठेतरी छान फिरून येतात. ते पण एक प्रकारचं स्वातंत्र्य साजरं करणं असतं खरंतर.

पूर्वाताईला सकाळी फोन केला होता तर ती म्हणाली की इथून बाहेर पडलो तर मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईन. आता हळूहळू मला तिच्या म्हणण्याचा अर्थ पटू लागला आहे. इथून बाहेर पडलं पाहिजे. ते कसं आणि कधी करायचं हे मला ठाऊक नाही. अश्विनी आता पुढच्या आठवड्यात पुण्याला जाईल. तिच्या कंपनीत हजर होईल आणि मग तिथेच कुठेतरी फ्लॅट घेऊन राहील असं म्हणाली आहे. कारण अजून काही महिने त्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे. तिचं म्हणणं मी तिकडे जाऊन तिच्या बरोबरच राहावं पण याचा धक्का स्वतंत्र भारतातल्या मम्मी-पप्पांना आणि काका काकूंना सहन व्हायचा नाही त्यामुळे मी तिला “ते नंतर बघू” असं म्हटलं आणि आता ती रुसून बसलीये. पण ते होईल सॉर्ट आउट.

ए. आर. रहमानचं नवं गाणं आलंय आज्जी. सिनेमा काही खास नव्हता. पण अविनाशला रहमान खूप आवडतो त्यामुळे तो हे गाणं सतत ऐकतो आहे. त्याने मलाही ते ऐकायला लावलं. त्याचे लिरिक्स म्हणजे तुझ्या भाषेत शब्द वेगळ्याच अर्थांनी भिडले बघ. मला एकदम तू किंवा अश्विनीच आठवलात. ते गाणं मिमी नावाच्या सिनेमात आहे. गाण्याचं नाव रीहाई दे… त्याचे लिरिक्स असे:

चेहरा तेरा हसता तो है

आखे मगर खुश क्यू नही

कौन समझे दर्द तेरे

कौन तुझ को रिहाई दे!

हिंदी शुद्धलेखनाच्या चुका काढू नको हा प्लीज. मुद्दा लक्षात घे आज्जी. तू मेरे को रिहा कर सकती है! पण तू तिकडे असल्याने कधी येशील मला माहिती नाही त्यामुळे आता मीही ठरवलं आहे की व्हायचं स्वतंत्र… हळूहळू का होईना…

– वरद

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


  

Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :