आजीची गोधडी । पत्र एकविसावं

प्रिय आज्जी,

आत्ता सकाळचे साडेदहा वाजलेत. अश्विनी ऑफिसला पोचली असेल. हल्ली दिवसाचे हे सात आठ तास खूप अवघड असतात. अश्विनीशी बोलता येत नाही हा एक भाग पण सगळेच ऑफिसमध्ये किंवा दिवसभराच्या कामात असतात आणि मग माझ्याशी बोलायला इथे कुणीच नसतं. मम्मी आपल्या कामात, पप्पा दुकानात. अश्विनी मध्येमध्ये मेसेज करते पण तीही कामात असल्याने आमचं बोलणं असं होत नाही. ऑफिसमधून घरी आल्यावर ती न चुकता फोन करते पण मग मला ती दमलीय हे जाणवू लागल्यावर मीच विषय आवरता घेतो. म्हणजे तिला बोलायचं असतं, ऑफिसमधल्या गोष्टी सांगायच्या असतात पण मग मलाही ती सगळी माणसं माहिती नसल्याने मी केलेलं ‘हाहाहा’, ‘हो?, ‘अरे वा’. ‘बरं बरं बरं’ हे सगळं किती खोटं आहे हे तिच्या लक्षात येऊ लागतं आणि मुलगी रुसून फोन ठेवते. 

परवा आम्ही बोललो  तेव्हा ती मागे पत्रात म्हणाली त्या एकटेपणाचा विषय निघाला आणि म्हणाली “तरी बरं मी पुण्यात आहे. वाटलं तर इथून सहा सात तासात घरी येऊ शकते, तुला भेटू शकते. हैदराबाद किंवा बेंगलोरला असते तर काय केलं असतं कुणास ठाऊक. तिथे तर भाषेचा प्रॉब्लेम आला असता, तुझ्या त्या मल्याळम / तामिळ / तेलुगु दिसतात तशी सबटायटल्स माणसं बोलताना दिसत नाहीत ना!” मी तिला एक उपाय सुचवला पण मग आमचं सगळं बोलणं भांडणाकडे वळू लागलं कारण मी दिलेलं सोल्युशन तिला पटलं नाही.

काही नाही, म्हणजे मी इतकं वाईट सोल्युशन दिलं नव्हतं आज्जी. मी म्हटलं की, एखादा ब्लूटूथ एक स्पीकर घे आणि जेव्हा कधी एकटं वाटेल तेव्हा मोठ्या आवाजात गाणी लावत जा. गाणी चालू असली की एक धून, चाल कानावर पडत राहते. तितकं एकटं वाटत नाही. गाणं आजूबाजूची सगळी रिकामी जागा भरून काढतं…” पण मग ती म्हणाली की, “शांतता पण हवीय आणि एकटं पण वाटलं नाही पाहिजे. सगळं शांत असताना कुणीतरी उगाच काहीतरी गात असलं की मला इरिटेट होतं अरे मला. मला नाही आवडत असं एकट्यानेच बसून गाणी-बीणी ऐकायला. त्यापेक्षा मग मी झोप काढेन, कुठेतरी फिरून येईन पण आत्ता आठवड्याच्या ऑफिसनंतर मी इतकी दमते की कुठेही फिरायला जावसं वाटत नाही आणि खूप वेळ घरात बसून बोअर पण व्हायला लागतं.”  

तिचा फोन येऊन गेला ना आज्जी की सारखं असं वाटतं की, इथून निघावं, पुण्याला जावं आणि तिथेच राहावं. नुसतंच आत्ता कुणी पुण्याला जाऊन राहू देणार नाही ना! आणि खरं सांगू का असं जर एक दोन दिवस पटकन जाऊन अश्विनीला भेटून आलो ना तर इकडे परत आल्यावर खूप आठवण येईल तिची, त्रास होईल जरासा आणि तिचीही उगाच धावपळ होईल. मग ते ठरून कॅन्सल वगैरे झालं तर उगाच सॉरी आणि सगळं…

तिला भेटायचं तर निवांत वेळ पाहिजे. मयुरी आणि अविनाशलाही भेटायचं आहे खरंतर पण आत्ता मी उगाचच भटकायला पुण्याला जायचा विषय काढला तर नको ते तमाशे होतील आणि उगाच इंटरव्यू वगैरेचं खोटं बोलून मला जायचं नाही आणि सध्या कुठे खरे इंटरव्यूही चालू नाहीयेत, म्हणजे चालू आहेत पण ते घरी बसूनही देता येतायत. आम्ही बोलत असलो, फोटो आणि व्हिडिओ कॉलवर एकमेकांना  बघत मी आणि अश्विनी आपापल्या जागी एकटेच आहोत आणि एकमेकाला खूप मिस करतो आहोत. काहीतरी करायला पाहिजे, नाही का?  बघतो पूर्वा ताईशी बोलून…

– वरद     

*

वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता

चित्रकथा
कथा


Freelance Translator, Content Writer, Editor at Saarad Majkur | + posts

निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :