प्रिय आज्जी,
मागच्या पत्रात लिहिता लिहिता मी जरा वाहत गेलो त्याबद्दल सॉरी. लिहून झाल्यावर मनातला न्यूनगंड कमी झाला नाही पण बरं वाटलं. तू इथे असतीस तर बोलणं सोपं झालं असतं पण…
कालच मी अश्विनीशी बोललो आणि तिलाही सगळं सांगितलं. ती म्हणत्येय की मी पुण्याला जावं आणि तिथे केवळ काही दिवस राहावं, माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटावं. तिच्या मते मला हा ब्रेक गरजेचा आहे. मी पुण्याला जावून नव्यानं करता येण्यासारखं काहीतरी शोधलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम न करता वेगळं काहीतरी करावं. तिला खायला प्यायला खूप आवडतं त्यामुळे तिचा आग्रह आहे की मी रोहितबरोबर काम करायला हरकत नाही. (हा माझा पुण्यातला मित्र. तो शेफ आहे आणि युनिव्हर्सिटी रोडला त्याचा कॅफे आहे. आम्ही एनएफएआयमध्ये झालेल्या एका फिल्म फेस्टिव्हलला भेटलो होतो.) ती हे सगळं बोलत होती तेव्हा मला आमचं हे बोलणं ऐकून तुझा आणि मम्मीचा हसणारा चेहरा आठवत होता.
मी स्वयंपाक शिकावा अशी तुझी आणि पूर्वाताईची खूप इच्छा होती, पण मी अजूनही काही तो शिकलेलो नाही. हा आता मात्र जेवण झाल्यावर मी माझं ताट उचलून ठेवतो. अश्विनी तर मी स्वयंपाक शिकावा म्हणून हट्टच धरून बसलीय, पण खरं सांगू का आज्जी, आजकाल मी भूक लागली की खातो काहीतरी, पण बाकी मला खावंसं वाटतच नाही. रात्रीसुद्धा मी, मम्मी-पप्पा एकत्र जेवत नाही. ते मम्मीच्या सिरीयलच्या वेळेनुसार जेवतात आणि मग मला वाटलं की मी थोडं गरम करून घेतो आणि खातो. त्यामुळे अशा वेळी स्वयंपाक शिकणं अक्षरशः नको वाटतंय. पण तू काळजी करू नको, मी खाण्यापिण्याच्या बाबत स्वत:ची आबाळ होऊ देणार नाही. (‘आबाळ’ हा तसा किती विचित्र शब्द आहे ना आज्जी? म्हणजे असं एकदम ewww)
मी पूर्वा ताईला फोन केला आणि तिलाही मागच्या पत्रात तुला लिहिलेलं सगळं सांगून टाकलं. त्यादिवशी आम्ही बराच वेळ बोललो. अनायसे तिला वेळ होता. ती या माझ्या सगळ्या मन:स्थितीकडे फारच वेगळ्या नजरेतून पाहते आहे. तिचं म्हणणं आहे की, मला वाटणाऱ्या न्यूनगंडाकडे मी एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे, मी स्वत:ला पुश केलं पाहिजे. न्यूनगंडाच्या भावनेला सरेंडर न करता त्याच्यावर मात केली पाहिजे. तिचं म्हणणं की आपण कुणापेक्षा तरी कमी आहोत, आपल्यामध्ये जर उणीव आहे तर नुसतं बसून राहिल्यास ती दूर होणार नाही. तिने मला एक वेगळी बाजू दाखवली, ती म्हणते की, माणसाने आपले विकनेस हे स्ट्रेन्थमध्ये कन्व्हर्ट केले पाहिजेत. त्यादिवशी पूर्वाताई एकदम युट्युबवरच्या एखाद्या मोटिव्हेशनल स्पीकरसारखं बोलत होती, पण तरीही मला तिला थांबवावं किंवा विषय बदलावा असं वाटलं नाही. तिच्या मते, मला जर माझ्या मनातला न्यूनगंड घालवायचा असेल तर मला ज्यातून आनंद मिळतो, जे करताना मी स्वत:तल्या उणीवा शोधत नाही असं काहीतरी केलं पाहिजे. मला तिचं बोलणं तसं फारसं कळलं नाही, पण माझ्या एवढंच लक्षात आलं की मी न्यूनगंडाचे लाड करू नयेत.
तिच्याशी बोलल्यावर मला हसूच आलं. काही सिनेमांची ना कथा एवढीशीच असते. त्यातला प्रॉब्लेमही लहान असतो आणि सोल्युशनही सोपं असतं. पण सिनेमा लांबावा म्हणून त्या कथेला हजारो फाटे फोडतात आणि मग सोल्युशन अनेकदा शेवटच्या ५ मिनिटात अगदी अचानक, जादू झाल्यासारखं सापडतं. तसले सिनेमे मला अजिबात आवडत नाहीत. पण पूर्वा ताईशी झालेल्या एका अर्ध्या तासाच्या फोन कॉलवर मला तसंच काहीसं झाल्याचा फील आला. म्हणजे माझं याआधीचं पत्र आणि सगळाच विचारांचा प्रवास याला पूर्वा ताईने ‘अनावश्यक’ ठरवून टाकलं. मला ठोस उत्तर अजूनही सापडलेलं नाही पण मला उत्तर सापडेल अशी खात्री जरूर वाटते आहे.
एक सांगू का आज्जी, म्हणजे मी पूर्वीही सांगितलं असेल कदाचित पण पूर्वा ताईना अगदी तुझ्यासारखं बोलते. तुम्ही दोघी ना खऱ्या अर्थाने एकदम फियरलेस आणि स्ट्रॉंग आहात आणि तुमच्या दोघींचाही माझ्यावर खूप जीव आहे. म्हणजे मी पूर्वा ताईला सांगितलं तेच तुलाही सांगतो,
Thank you for not giving up on me.
याचं भाषांतर वगैरे करत नाही कारण भावना तुला कायमच समजतात.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.