दुसऱ्या महायुद्धाच्या अंताला ७५ वर्षे : फॅसिझम विरुद्ध अटीतटीचा राजकीय विजय

second-world-war-international-politics-germany-donald-trump-narendra-modi-Chitrakshare-Jivanmarga-dr-ashok-dhavale-fascism

७५ वर्षांपूर्वी, २ सप्टेंबर १९४५ रोजी जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध समाप्त झाले. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे ६ आणि ९ ऑगस्ट रोजी अतिभयानक अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपानने अखेर पराभव स्वीकारला.

त्याच्या काही महिन्यांपूर्वी ३० एप्रिल १९४५ रोजी जर्मन सेनेचा फडशा पाडत आणि अनेक अभूतपूर्व विजय मिळवत सोव्हिएत युनियनची लाल सेना जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये घुसली आणि या पराभवामुळे फॅसिस्ट क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरला स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली! ८ मे १९४५ रोजी नाझी जर्मनीने पराभव पत्करला. इटली आधीच पराभूत झाला होता.

अतिसंहारक दुसरे महायुद्ध

१९३९ ते १९४५ अशी ६ वर्षे चाललेले दुसरे महायुद्ध मानवी इतिहासातील आजवरचा सर्वात अतिसंहारक संघर्ष होता. त्यात जगातील ६१ देशांचे एकूण सुमारे ७ ते ८.५ कोटी लोक मारले गेले! यात प्रत्यक्ष युद्धात तसेच युद्धामुळे झालेले दुष्काळ व रोगराईत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष युद्धात ५ कोटीहून अधिक लोक मारले गेले. जबर जखमी झालेले कोट्यवधी लोक वेगळेच! कोट्यवधी महिला व लहान मुलांवर झालेले भयानक अत्याचार वेगळेच!

ज्या देशांचे सर्वात जास्त बळी गेले ते पुढीलप्रमाणे: सोव्हिएत युनियनचे सर्वाधिक २.५ कोटी लोक नाझी जर्मनीशी झालेल्या घनघोर युद्धात मारले गेले. त्याखालोखाल चीनचे १.७५ कोटी लोक जपानशी झालेल्या भयानक युद्धात मृत्यमुखी पडले.

हे युद्ध लादणाऱ्या जर्मनीचे ७२ लाख लोक मारले गेले. इतर काही प्रमुख देशांतील या युद्धातील मृतांचे आकडे पुढीलप्रमाणे: पोलंड – ६० लाख, इंडोनेशिया – ३५ लाख, जपान – २८ लाख (त्यात अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे २ लाख), भारत – २६ लाख (१ लाख ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून युद्धात आणि उर्वरित २५ लाख १९४३च्या बंगालच्या महादुष्काळात), फ्रेंच इंडोचायना (आजचे व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) – १५ लाख, योगोस्लाव्हिया – १४ लाख, इथिओपिया – १० लाख, ग्रीस – ७.५ लाख, फ्रान्स – ६ लाख, फिलिपाईन्स – ५.५ लाख, इटली – ५ लाख, कोरिया – ५ लाख, रोमानिया – ५ लाख, हंगेरी – ४.६ लाख, इंग्लंड – ४.५ लाख, अमेरिका – ४.२ लाख.

हिटलरच्या फॅसिझमचा उदय

१९१४ ते १९१८ ही चार वर्षे पहिले महायुद्ध चालले. त्यात सुमारे २ कोटी लोक मारले गेले. ही दोन्ही महायुद्धे मुळात सुरू झाली ती साम्राज्यवादी देशांच्या भांडवली स्वार्थामुळे जगाची आपापसात फेरवाटणी करण्यासाठी. भांडवलशाही जशी अरिष्टे आणि बेरोजगारीशिवाय जगू शकत नाही तशीच ती युद्धाशिवायही जगू शकत नाही हे मार्क्स आणि लेनिनने सिद्ध करून दाखवले आहे.

पण पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या रशियात १९१७ साली कॉ. लेनिन आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी क्रांती झाली आणि जगाचे स्वरूप पार बदलले. दुसऱ्या महायुद्धानंतरही चीन, व्हिएतनाम व कोरियामध्ये अशाच समाजवादी क्रांत्या झाल्या. क्युबाची क्रांती आणखी १४ वर्षांनी झाली.

पहिल्या महायुद्धात सुद्धा जर्मनी हरली होती. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आदी देश जिंकले होते आणि त्यांनी पराभूत जर्मनीवर अनेक जाचक अटी लादल्या. या अटींविरुद्ध जर्मनीच्या जनतेत प्रचंड प्रक्षोभ खदखदत होता. १९२९ साली भांडवलशाहीचे अविभाज्य लक्षण असलेली जागतिक महामंदी सुरू झाली आणि तिचा फटका प्रचंड बेरोजगारीच्या रूपाने इतर देशांप्रमाणेच जर्मनीलाही बसला. या दोन्ही घटकांचा फायदा ऍडॉल्फ हिटलरच्या नाझी (म्हणजे नॅशनल सोशलिस्ट!) नावाच्या पक्षाने उठवला. त्याला ज्यू धर्मीयांबद्दल कट्टर द्वेषाची फॅसिस्ट फोडणी देऊन बहुसंख्य जर्मन लोक ‘आर्यन’ असल्याचे सांगून त्यांना ज्यूंविरुद्ध संघटित करण्याची मोहीम चालवली.

हुकूमशाहीचे हिटलरने अनेकदा उघड समर्थन केले होते. केवळ जर्मनीतील कम्युनिस्टांनाच नव्हे, तर जगभरच्या कम्युनिस्टांना आणि विशेषतः सोव्हिएत युनियनला संपविण्याचा इशारा त्याने ‘माईन कॅम्फ’ या त्याच्या आत्मचरित्रात दिलेला होता. त्या दिशेने त्याने जर्मनीतील सर्व बड्या भांडवलदारांशी चांगलेच मेतकूट जमविले होते.

वरील सर्व कारणांमुळे निवडणुकांमध्ये हिटलरच्या नाझी पक्षाची ताकद संसदेत वाढत गेली. दुसरीकडे कम्युनिस्टांची ताकदही संसदेत वाढत होती. पण कम्युनिस्टांनी अनेकदा सांगूनही मध्यममार्गी आणि तथाकथित ‘समाजवादी’ पक्षांनी हिटलरचा धोका ओळखला नाही. त्याला रोखण्यासाठी वेळीच संयुक्त आघाडी केली नाही. परिणामी ३० जानेवारी १९३३ रोजी हिटलर जर्मनीत सत्तेवर आला आणि त्याने लवकरच आपली हुकूमशाही राजवट प्रस्थापित केली.

त्याच्या ११ वर्षांपूर्वी १९२२ साली त्याच फॅसिस्ट विचारांचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी इटलीत सत्तेवर आला होता आणि त्यानेही नेमकी तशीच धोरणे अमलात आणली होती.

जपानमध्येही त्याच फॅसिस्ट व युद्धखोर विचारांचा जनरल हिडेकी टोजो याच्याकडे पंतप्रधानपदाची सत्तासुत्रे गेली. पण जपानचा सम्राट हिरोहितो हाही युद्धास तितकाच जबाबदार होता.

पण हा केवळ काही व्यक्तींचा प्रश्न नव्हता. जर्मनी, इटली आणि जपान या तिन्ही फॅसिस्ट व साम्राज्यवादी देशांतील मक्तेदार भांडवलदारवर्ग जगावरील आपले शोषण, ताकद आणि प्रभाव वाढविण्यासाठी युद्धाला उत्तेजन देत होता आणि त्याने हिटलर, मुसोलिनी आणि टोजो सारख्या नरराक्षसांना हाताशी धरले होते.

पहिला वार कम्युनिस्टांवर, ६५ लाख ज्यूंचे शिरकाण!

हिटलरने पहिला वार केला तो कम्युनिस्टांवर. सत्तेवर येण्याच्या एक महिन्याच्या आत त्याच्या आदेशावरून, २७ फेब्रुवारी १९३३ रोजी राजधानी बर्लिनमधील जर्मनीच्या संसदेच्या इमारतीला नाझी गुंडांनी आग लावली आणि त्याचे खापर कम्युनिस्टांवर फोडले. हजारों कम्युनिस्टांना तुरुंगात टाकण्यात आले. पुढे जगप्रसिद्ध होणाऱ्या कॉ. जॉर्जी दिमित्रोव्ह नावाच्या बल्गेरियन कम्युनिस्ट नेत्यालाही या खटल्यात अटक झाली, पण त्याने खुल्या कोर्टात हिटलर राजवटीचे वाभाडे काढले. न्यायालये अजून हिटलरला पूर्णतः विकली गेली नव्हती, म्हणून ते निर्दोष सुटले.

पण पुढे जर्मनीतील हजारों कम्युनिस्टांचे शिरकाण झाले. मग असंख्य कामगार नेत्यांचा, समाजवाद्यांचा, विचारवंतांचा, लोकशाही मानणाऱ्यांचा एकामागून एक नंबर लागला आणि त्या सर्वांना संपविण्यात आले. हे सर्व करताना हिटलर राजवटीने ज्यू धर्माच्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला. १२ वर्षांच्या त्याच्या सत्तेमध्ये हिटलरने तब्बल ६५ लाख ज्यू लोकांना कॉनसंट्रेशन कॅम्पसमध्ये डांबून ठार मारले! ‘द डायरी ऑफ ऍन फ्रॅंक’ नावाच्या एका लहान ज्यू मुलीची हृदयद्रावक कहाणी जगप्रसिद्ध आहे.

आरएसएस चे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी १९३९ साली लिहिलेल्या ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड’ या पुस्तकात ज्यूंच्या शिरकाणाच्या या कृत्याबद्दल हिटलरवर स्तुतिसुमने उधळली आहेत आणि भारताने यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे अशी पुस्ती जोडली आहे! आरएसएस चे आणखी एक संस्थापक डॉ. बी. एस. मुंजे १९३१ सालीच खास इटलीला जाऊन मुसोलिनीला भेटले आणि त्यांनीही भारतात येऊन मुसोलिनीचा गौरव केला.

जग जिंकण्याचे स्वप्न

हिटलरचे स्वप्न जग जिंकण्याचे बनले. त्यातूनच दुसरे महायुद्ध सुरू झाले. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले, त्यामुळे इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीवर युद्ध पुकारले आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले. जपानने त्यापूर्वीच चीनवर आक्रमण केल्यामुळे चीन युद्धात ओढला गेला. पुढे जर्मनीने २२ जून १९४१ रोजी सोविएत युनियनवर आक्रमण केल्यामुळे सोविएत युनियन युद्धात ओढले गेले. जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हवाई हल्ला चढवला आणि त्यामुळे अमेरिका युद्धात ओढली गेली.

म्हणजे जर्मनी, इटली आणि जपान एका बाजूला तर सोविएत युनियन, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि चीन दुसऱ्या बाजूला असे मुख्य प्रतिस्पर्धी होते. त्यापैकी फ्रान्स १९४० साली एका महिन्यातच पराभूत झाला. चीनमध्ये तेव्हा प्रतिगाम्यांचे राज्य होते, पण चिनी कम्युनिस्टांनी पुढाकार घेऊन संयुक्त आघाडी तयार केली आणि तेथील जनतेने जपानविरुद्ध कडवी झुंज दिली.

सोव्हिएत युनियनने फॅसिझमचा धोका फार पूर्वीच ओळखला होता. १९३५ साली कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या मॉस्को येथे भरलेल्या ७व्या अधिवेशनात, हिटलरच्या कचाट्यातून सुटलेल्या आणि आता या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस असलेल्या कॉ. जॉर्जी दिमित्रोव्ह यांनी फॅसिझम विरुद्ध जागतिक संयुक्त आघाडी बांधण्याचे बुलंद आवाहन केले. रशियाने इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेलाही हिटलरविरुद्ध एकत्र येण्याचे अनेकदा आवाहन केले, पण त्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट इंग्लंड आणि फ्रान्सचे तत्कालीन नेते तेव्हा हिटलरचे तुष्टीकरण करण्यात मग्न होते. त्यांचा डाव हा होता की, जर्मनीने आधी रशियावर आक्रमण करावे, दोन्ही देश त्या संघर्षांत पार कमजोर व्हावेत आणि मग आपण युद्धात हस्तक्षेप करून ते जिंकावे. रशियाने योग्य डावपेच करून हा डाव उधळून लावला.

सोव्हिएत युनियनने हिटलरचा डाव उधळला!

हिटलरने आधी पश्चिम युरोप पादाक्रांत केला. फक्त इंग्लिश खाडी मध्ये असल्यामुळे इंग्लंड कसाबसा वाचला. आणि मग २२ जून १९४१ रोजी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर घमासान आक्रमण केले. पहिल्या वर्षात रशियाचा पश्चिमेचा एक तृतीयांश भाग जर्मनीने गिळंकृत केला. डिसेंबर १९४१ मध्ये राजधानी मॉस्कोच्या उंबरठ्यावर जर्मन सैन्य पोहोचले. पण त्यानंतर सोव्हिएत युनियनच्या लाल सेनेने जबरदस्त प्रतिचढाई सुरू केली आणि जर्मन सैन्याला मागे ढकलले. रशियन क्रांती झाली त्या लेनिनग्रॅड शहराला अडीच वर्षे जर्मन सैन्याने वेढा घातला पण तरीही ते शहर शरण गेले नाही. जगाच्या इतिहासातील सर्वात घनघोर अशी स्टॅलिनग्रॅडची लढाई १९४२-४३ साली सहा महिने चालली पण त्यात मात्र जर्मन सैन्याचे कंबरडे मोडले गेले. जगातील आजवरची रणगाड्यांची सर्वात मोठी लढाई कुरस्क येथे लढली गेली. तीही लाल सेनेने जिंकली.

१९४४ साली आपल्या देशाचे सर्व क्षेत्र पुन्हा मुक्त केल्यानंतर लाल सेनेने पूर्व युरोपचे सर्व देश जर्मन कचाट्यातून मुक्त केले आणि पुढील वर्षी ती खुद्द जर्मनीत घुसली. बर्लिनकडे तिने कूच सुरू केले. भरपूर वेळ घालवल्यानंतर, आता रशिया सर्वच जर्मनीवर कब्जा करेल या भीतीने, जून १९४४ मध्ये इंग्लंड आणि अमेरिकेने इंग्लिश खाडीमार्गे जर्मनीच्या कब्जात असलेल्या फ्रान्सवर आक्रमण केले. एप्रिल १९४५ मध्ये लाल सेनेने बर्लिनमध्ये विजयी प्रवेश केला. ३० एप्रिलला स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या करण्याशिवाय हिटलरला पर्याय उरला नाही. त्याच्या दोनच दिवसांपूर्वी २८ एप्रिल रोजी इटलीतील वॉल्टर ऑडिसीओ नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने मुसोलिनीला पकडले, त्याला ठार मारले आणि त्याचे शव मिलान नावाच्या शहरातील भर चौकात उलटे टांगले. २ मे रोजी एका सोव्हिएत कम्युनिस्ट सैनिकाने जर्मनीच्या संसदेच्या इमारतीवर विळा हातोड्याचा लाल झेंडा फडकवला! ८ मे रोजी जर्मनीने अखेर शरणागती पत्करली.

जपानविरुद्धचे युद्ध आणखी काही महिने चालले, आणि तसे कोणतेही सबळ कारण नसताना अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर पहिले भयानक अणुबॉम्ब टाकले. जगावर दादागिरी प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा तो उघड प्रयत्न होता. जपानने शरणागती पत्करल्यानंतर जनरल टोजो आणि इतर युद्धखोर नेत्यांना फाशी देण्यात आले.

हे अटीतटीचे युद्ध जिंकण्यासाठी लाल सेनेचा आणि सोविएत जनतेचा त्याग आणि धैर्य कळीचे होतेच. पण त्यामागे समाजवादाने अल्प काळात उभारलेली जबरदस्त अर्थव्यवस्थाही होती. लाखों कामगार-शेतकऱ्यांचे अभूतपूर्व श्रम होते. असंख्य महिलांचे व लहान मुलामुलींचे प्रचंड योगदान होते. या सर्वातून तयार केलेली अफाट रणसामुग्री होती. जनतेमधील समानता व एकजूट होती. हे सर्व करण्यात कम्युनिस्ट पक्षाचा सिंहाचा वाटा होता. कॉ. जॉर्जी झुकोव्ह व इतर अनेक जनरल्सचे मौल्यवान योगदान होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉ. लेनिन यांच्या १९२४ सालच्या निधनानंतर कॉ. जोसेफ स्टालिन यांचे अत्यंत खंबीर आणि बेडर नेतृत्व होते. रानटी फॅसिझमचा पराभव समाजवादाच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीच करू शकते हे दुसऱ्या महायुद्धाने सिद्ध केले.

आता पुन्हा नवीन फॅसिझमचा धोका वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या व इतर काही देशांतही निर्माण होत आहे. त्याचा पावलोपावली अत्यंत नेटाने आणि एकजुटीने सामना आपण केलाच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाचा तोच सर्वात महत्त्वाचा धडा आहे.

*

(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.)
जीवनमार्ग बुलेटिन: १५७
शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२०
संपादक: उदय नारकर


वाचा
दुसरे जागतिक महायुद्ध – लेखमाला
समाजकारण
कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :