एक चित्र डोळ्यापुढं आणा – ‘एक गुरु उभा आहे.. शिष्य त्यांच्या चरणकमलांवर आपलं मस्तक ठेवत आहे.. गुरु आशीर्वादासाठी त्याच्या मस्तकावर हात ठेवत आहे…’ हे चित्र म्हणजे खरं तर एक सर्किट डायग्रॅम आहे. ज्ञानसंपन्न गुरूच्या उर्जास्रोताला स्पर्श व्हावा म्हणून शिष्य पायावर डोकं ठेवतो, ज्ञानाचं संक्रमण सुरु होतं.. आणि गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून हे ऊर्जा किंवा ज्ञान सर्किट पूर्ण करतो…
एक काळ होता जेव्हा ही संकल्पना नीट रुजविण्यासाठी गुरु म्हणजे ज्ञान यांच्या देहात आपलं अज्ञानी शिष्यत्व झोकून देणं आवश्यक होतं. यासाठी गुरु अहंमन्य असला, तरी शिष्यानं स्वतःकडे अल्पस्वल्प ज्ञान आहे हे विसरून जात लीन व्हावं ही गोष्ट जनमानसात ठसविली गेली. मोठ्या व्यक्तीला लहान व्यक्तींनी नमस्कार करायचा हे संस्कार आहेत असं ठसवलं गेलं. आज त्याचं विकृत स्वरूप आपण सर्वत्र बघत आलो आहोत. ज्याची योग्यता आहे किंवा नाही हे पडताळून न पहाता त्याची वयानं आलेली ज्येष्ठता गुरु मानली गेली.. आणि वयानं कमी असणाऱ्यांची लायकी जास्त आहे कि नाही याची शहानिशा न करता केवळ तो कनिष्ठ आहे असं मानून त्याच्यावर शिष्यत्व लादलं गेलं. या सर्किट डायग्रॅमकडे पूर्ण दुर्लक्ष झालं.
पुराणकाळातली एक कथा आहे. या कथेत एका बालकाला शंभर गाय-बैलांचा कळप घेऊन वनात जायला सांगितलं जातं. बारा वर्षं पूर्ण झाल्यावरसुद्धा हा कळप शंभराचाच राहिला पाहिजे असं बंधन त्याच्यावर घातलं जातं. कळपातली गुरांची संख्या एवढ्या वर्षांमध्ये वाढताही कामा नये, आणि कमीसुद्धा होता कामा नये. हीच त्या बालकाच्या ज्ञानाची परीक्षा असते.
बालक परीक्षा देण्यास तयार होतो. वनात जातो. बघता बघता बारा वर्षांचा काळ पार पडतो. आणि गम्मत अशी की त्याच्या ताब्यात असलेली एका तपापूर्वीची शंभर गुरांची संख्या तेवढीच राखण्यात तो बालक यशस्वी होतो. या बारा वर्षांच्या काळात तो ज्ञानसंपन्न होतो, हा या कथेचा निष्कर्ष आहे. हे ज्ञान त्याला कुणी नेमून दिलेल्या गुरूनं दिलेलं नसतं, तर गुरांची संख्या अबाधित राखण्यात चराचराचा त्यानं एकट्यानं केलेला अभ्यास हाच त्याला ज्ञानसंपन्न व्यक्तीमध्ये परावर्तित करतो. ‘चराचर’ किंवा ‘निसर्ग’ हाच त्याचा या दीर्घ काळामध्ये गुरु होतो.
हे त्यानं कसं साधलेलं असतं? तर.. तो गुरं घेऊन एक भूखंड निवडतो. गुरं नजरेसमोर राहावीत म्हणून त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्या भूखंडाभोवती एक दगडी कुंपण घालायचं ठरवतो. दगड एकमेकांवर रचत असताना ते चपखल कसे बसतील याचं ज्ञान तो ‘दगडा’लाच गुरु मानून करून घेतो… दगडांची चपखल रचना करूनही काही भेगा आणि फटी राहतातच. त्या मातीनं लिंपायचं तो योजतो. पुरेसा चिकटावा असणारी माती मिळवण्यासाठी तो ‘माती’ला गुरु बनवतो. ते लिंपणं पार पाडल्यावरदेखील त्या भिंतीची उंची त्याला पुरेशी वाटत नाही. यासाठी त्यावर काटेरी झुडुप लावायचं तो ठरवतो. ‘वनस्पतीं’ना गुरु मानल्यावर त्याला मुबलक काटे असणारी खुरटी वनस्पती आणि भूखंडात गुरांना चरण्यासाठी कुरण करण्यास योग्य गवताळ वनस्पती यांचं ज्ञान होतं. ही भिंत बांधून होईपर्यंत त्याला ‘वनस्पतीशास्त्र’ आणि ‘स्थापत्यशास्त्र’ यांची ओळख झालेली असते. याच भूखंडात तो फळं, भाजीपाला आणि धान्य यांची स्वतःसाठी निर्मिती करतो.
एक दिवस एक वाघ कुठूनतरी येतो आणि एक गाय घेऊन जातो. आता ‘वाघ’ त्याचा गुरु बनतो. त्याची शिकार करण्याची पद्धत तो समजावून घेतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं कि वाघ अंधाराचा फायदा घेतोय. रात्रीचा अंधार टाळणं शक्य नाही, म्हणून कोपऱ्या-कोपऱ्यात तो विस्तव धगधगता ठेवायचं योजतो. विस्तव पेटवताना वाऱ्याचा झोत त्रास देत राहतो. आता ‘वारा’ त्याचा गुरु बनतो. वाऱ्याचा वहनाचा वेग आणि दिशा तो लक्षात घेतो. हाच वारा कुठल्या काळात कसा वाहतो, याचं ज्ञान त्याला मिळत जातं. हा वारा ऋतुमानानुसार बदलत असतो. म्हणजेच, आता ‘ऋतू’ हा त्याचा गुरु बनतो. ऋतुचक्र त्याला अनेक गोष्टींचं ज्ञान देत राहतं. त्या त्या ऋतूंचा वनस्पती निपजण्यावर काय परिणाम घडतो याचा विचार तो करू लागतो. विशिष्ट ऋतुकाळ आपल्याला उपयोगी कसा पडेल याचा विचार करताना प्रत्येक ऋतूची बैठक तो समजावून घेतो. ही बैठक वनस्पतींची वाढ आणि धान्य उत्पादन करणाऱ्या रोपांना कशी फायदेशीर ठरेल याची माहिती त्याला होते. अन्नसाठा करण्यासाठी ही माहिती त्याला उपयोगात आणता येते.
ऋतुकालाचं आपलं ज्ञानही तोकडं आहे, याची जाणीव त्याला होते. कारण अचानक त्या त्या ऋतूवैशिष्ट्यापेक्षा वेगळी बदललेली वातावरण परिस्थिती त्याला अनुभवायला येते. याची कारणं शोधताना अंतराळातली ग्रहांची स्थिती कारणीभूत ठरतेय ही जाण त्याला येते. ग्रह आणि ग्रहस्थिती यांना अजमावताना तो ‘आकाशा’ला गुरु मानतो आणि आकाशज्ञान त्याला होतं. आकाशाच्या स्थितीनुसार त्याला ऋतूंच्या बदलांचा अंदाज येतो. खगोलशास्त्र तो विकसित करतो.
गुरांच्या संख्येतील घट ही केवळ जंगली श्वापदांनीच बाधित होते असं नाही, तर गुरांच्या मृत्यूच्या कारणात गुरांचं आजारपणदेखील कारणीभूत आहे. हे आजारपण थोपवावं यासाठी झाडपाल्याची कुठली औषधं लागतात आणि त्यासाठी कुठल्या वनस्पतींची लागवड करावी याचं ज्ञान त्याला त्या त्या ‘विकारां’ना गुरु केल्यावर प्राप्त होतं. जंगली श्वापदं आणि आजारपण यांच्यापासून काही प्रमाणात तो कळपाला सुरक्षा देण्यात यशस्वी होतो.
हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करायला हवं. नियोजन हे या लहरी हवामानाच्या परिणामांना सामोरं जायला आवश्यक आहे, हे कळल्यावर ‘नियोजना’ला गुरु मानून तो नियोजनशास्त्राची मुहूर्तमेढ रोवतो. नियोजनाची बाराखडी तयार करतो. अनुभवातून काही आडाखे भूपत्रावर नोंदवून ठेवतो. या ‘नोंदीं’ना तो गुरु मानतो, तेव्हा लिखाणाची कला त्याला अवगत होते. बघता बघता आपल्या त्यावेळच्या भावनासुद्धा तो नोंदवायला लागतो… यातून त्याला आपल्या मनोव्यापारांची ओळख होते. हे अभ्यासताना मनाचे शरीरावर होणारे परिणाम त्याला दिसायला लागतात. पर्यायानं तो शरीरशास्त्र विकसित करतो. ‘पशुपक्ष्यांचे मृतदेह आणि सांगाडे’ हेसुद्धा त्याचे गुरु बनतात. या गुरूंच्या माध्यमातून त्याला मानवी शरीराचे अवयव, त्यांचं कार्य आणि महत्व ध्यानात येतं. औषध म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी करायची आणि कोणत्या आजाराला ती वापरायची याचं सम्यक ज्ञान देणारं ‘धन्वंतरीशास्त्र’ त्याला उलगडायला लागतं.
गुरांची संख्या घटू नये म्हणून काही प्रयोगात आपण यशस्वी होतोय, परंतु त्यांची उपज आपल्या हाती नाही. औषधं आणि सुरक्षा देऊन आपण मृत्युदर कमी केला, पण जन्मदर कसा सांभाळायचा? यातून गाय माजावर येणं, वळूंना ते निमंत्रण वाटणं याचा तो अभ्यास करायला लागतो. याचं नियंत्रण राखण्यासाठी माजावर येणाऱ्या गाईंची वासनापूर्ती करूनही गर्भधारणा कशी रोखता येईल, याचं परिवारशास्त्र तो बनवतो.
आणि अशा पद्धतीनं तो बारा वर्षांनंतरही मूळ गुरांची शंभर ही संख्या तेवढीच ठेवण्यात यशस्वी होतो. या अनुषंगानं येणारी प्रत्येक अडचण ही गुरु मानून व वारंवार त्या त्या अडचणीचं शिष्यत्व पत्करून तो ज्ञानसंपन्न होतो. सर्व शास्त्र आणि कला यात तो पारंगत होतो. या पुराणकथेतून एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला ज्ञानाची ओढ असेल तर निसर्ग, अवतीभोवतीची परिस्थिती व घटना यांचं तुम्ही बारकाईनं अवलोकन केलं तर तुम्हीच ‘शिष्य’ आणि तुम्हीच तुमचे ‘गुरु’ बनून जाता.
मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. एकानी मला विचारलं की काँक्रीटची रचना कशी असते? मी सांगितलं की मोठ्या आकाराची खडी मोठ्या पोकळ्या बनवते. यासाठी लहान आकाराची खडी वापरली म्हणजे या मोठ्या पोकळ्या कमी होतात. तुलनेनं तयार झालेल्या लहान पोकळ्या या वाळूनं भरून काढल्या जातात. तरीही शिल्लक राहणाऱ्या अगदी बारीक पोकळ्या सिमेंटमुळे भरून काढल्या जातात. हे काँक्रीट प्रवाही होण्यासाठी पाणी घातलं जातं…
माझ्या उत्तरानं त्याचं समाधान झालं. नंतर एका हार्डवेअर दुकानदाराशी बोलताना तो म्हणाला, की पाण्याच्या बुडबुड्यांमुळं काही पोकळ्या राहतातच. यासाठी प्लास्टिसायझर वापरलं जात. यामुळं पाण्याचं प्रमाण कमी होतं, परंतु आकर्षण शास्त्रानुसार पाण्याचे बुडबुडे नाहीसे होतात. माझ्या मनात समाजपुरुषाचं चित्र उभं राहिलं . समाजाला बांधणारा प्लास्टिसायझर म्हणजे उच्चं कोटींचं ज्ञान असणारा क्रिमी लेअर. व्यवहारातील काँक्रीट माझा गुरु बनलं आणि समाजाचं एक यथार्थ चित्र दाखवून गेलं…
आदिमानव चालत होता. त्यावेळी त्याचे गुडघे वेगवेगळी स्थानं घेत होती. यातून एक वर्तुळ आकाराला येतं होतं. डोंगरावरून गडगडत येणारे ओंडके त्यांनी पाहिले. म्हणजे गति हवी असेल तर वर्तुळ हवं. या संकल्पनेला गुरु मानलं तेव्हा चाकाचा जन्म झाला…
याचकाळात एका माणसाच्या मागं वाघ लागला. जीव वाचविण्यासाठी तळ्याच्या कडेला असलेल्या झाडावर तो माणूस चढला. वाघही त्याच्या मागोमाग झाडावर चढायला लागला. त्याला झाड सोडणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी पाण्यात उडी मारायचं ठरवलं. पाण्यात एक मगर आ वासून त्याच्या दिशेनं येत होती. तो विचारात पडला आणि एका फांदीला लोंबकळत राहिला. वाघ जवळ आलेला त्यानं पाहिला आणि घाबरून त्याच्या वजनानं हेलकावे घेणाऱ्या फांदीची पकड सुटली. फांदी ताणमुक्त झाल्यामुळं त्यावरचा वाघ लांब फेकला गेला. आता वाघ आणि मगर या दोघांपासून तो सुरक्षितपणे दूर गेला. ही घटना त्याची गुरु बनली आणि धनुष्याचा जन्म झाला…
माणसाला त्याच्या अवयवांचं निरीक्षण करताना डोळे, कान, हृदय आदी अवयवांच्या कार्याचं सूत्र कळलं. यातून दुर्बीण, टेलिफोन, पंप या कृत्रिम गोष्टी तयार करण्याची पूर्वपीठिका तयार झाली… डोंगर चढणीवर रस्ता तयार करायला प्रथम त्याची आखणी करावी लागते.. यासाठी सर्वेक्षण करावं लागतं.. सर्वेक्षण शास्त्र प्रगत झालेलं नव्हतं त्यावेळी डोंगरावर जाण्यासाठी गाढव सोडलं जाई. गाढवानं केलेली पायवाट ही किफायतशीर रस्ता आखणी असते, हे अनुभवानं स्पष्ट झालं होतं. याचं ज्ञान माणसाला ‘गाढव’ नावाच्या गुरूकडून मिळालं होतं.
सापानं डंख मारला तर विषबाधा होऊन मृत्यू येतो. परंतु साप घोडयांना चावला तर मात्र सहसा घोड्यांचा विषबाधेनं मृत्यू होत नाही. याचं कारण साप चावताच घोड्याच्या शरीरात लगेचच विषाला प्रतिकार करणारी प्रतिपिंडं तयार होतात. हे माणसाच्या लक्षात येताच साप चावलेल्या किंवा चाववलेल्या घोड्यांच्या रक्तातली प्रतिपिंडं वेगळी काढून ती सर्पदंश झालेल्या रुग्णाच्या शरीरात सोडण्याचा प्रयोग करण्यात आला… असं केल्यानं माणूस वाचतो, हे ज्ञान माणसाला ‘घोड्या’कडून मिळालं.
अशी अनेक उदाहरणं देता येतील, ज्यांच्यात ज्ञानप्राप्तीसाठी त्या त्या माणसांना ‘गुरु’ची गरज वाटली नाही. निसर्गातली निरीक्षणं हीच त्याची गुरु बनली. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं स्वतःमधला शिक्षक शोधू. आपणच आपले गुरु होऊ. काहीही कृती करण्यासाठी प्रथम स्वतःला काही प्रश्न विचारू – मी हे का करायचं? कसं करायचं? केव्हा करायचं? कुणासाठी करायचं? आणि सरतेशेवटी हे करून मला काय मिळवायचं आहे? हे ‘प्रश्न’ हेच आपले गुरु आणि मिळालेली उत्तरं ताडून कृतिशील होणं हेच आपलं ‘शिष्यत्व’!
*
वाचा
आज दिनांक
समाजकारण
कथा
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)
शेवटी निसर्ग आणि उद्भवणारी परिस्थिती हेच आपले गुरू बनतात ! फारच सुंदर लेख !