पुण्यातल्या एका शाळेतला ‘पाचवी ब’चा वर्ग. पहिला दिवस. पहिला पिरियड. वर्गशिक्षक म्हणून पन्नाशीच्या पुढचे सर आले. पहिली ते चौथीत आम्ही शिक्षकांना गुरुजी म्हणायचो. परंतु आता माध्यमिक शाळेत आल्यावर गुरुजींना ‘सर’ म्हणायचे असते, हा पहिला धडा गिरवायला घेतला. सर वर्गात आले तेव्हा त्यांच्या हातात काहीच नव्हतं. ना डस्टर, ना खडू, ना एखादं रजिस्टर. आम्हाला बसतं करत ते म्हणाले,
‘‘मुलांनो मी भास्कर सदाशिव लिमये. मी मराठी विषय घेऊन एमए झालेलो आहे. माझा मी परिचय करून दिला आहे. आता तुम्ही आपलं पूर्ण नाव खणखणीत आवाजात सांगायचं आहे. आणि यापुढं लक्षात ठेवा, अनोळखी माणसाशी बोलायला प्रारंभ करण्यापूर्वी नेहमीच आपलं संपूर्ण नाव सांगायचा प्रघात ठेवा.’’
माझ्यावर झालेल्या संस्कारांमधला हा एक संस्कार आहे. माझ्यासमोर आता तुम्ही वाचक आहात. तुमचा, माझा पूर्वी कधी संबंध आला असेल किंवा नसेल. पण मी माझा परिचय देतो, माझं नाव विनय प्रभाकर जोशी. माझ्या लिखाणातून पुढचा परिचय होईलच. १९७० साली मी शालांत परीक्षा म्हणजे एसएससी ६०% गुण मिळवून पास झालो. माझे वडील महानगरपालिकेत इंजिनीयर आहेत. आई पूर्वी सरकारी खात्यात नोकरी करायची. परंतु नंतर ती गृहिणी राहिली. आमच्या घरात आजी आणि धाकट्या तीन बहिणी आहेत. वडील एक नावाजलेले मराठी कादंबरीकार, नाटककार आहेत. यामुळं घरात साहित्यिक वातावरण आहे.
शालांत परीक्षा उत्तीर्ण होईस्तोवर माझा कल काय आहे, याची मला स्वतःलाच जाणीव नव्हती तर आई-वडलांना कुठून असणार. त्यावेळी ६०% गुण हे उत्तम असल्यानं आणि वडील स्वतः इंजिनीयर असल्यानं मला वडलांनी इंजिनीयर करायचं ठरवलं. पुण्यातल्या एका तांत्रिकी महाविद्यालयात इंजिनीयरिंग डिप्लोमासाठी मी ॲडमिशन घेतली.
जवळपास तीन महिने वर्गात नेमकं काय शिकवतायंत, हेच मला समजत नव्हतं. कारण शाळेमध्ये मराठी माध्यम होतं, तर आता हे इंजिनीरिंगचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून. पहिल्या सत्राची परीक्षा मी दिली. सहा विषयांपैकी फक्त एका विषयात पास झालो. घरात नाराजी. माझ्या मनात नाराजी. भीतभीत मी वडलांना मी म्हटलं,
‘‘दादा हे शिक्षण मला झेपत नाही. मी आर्ट्सला जाऊ का?’’
दादांनी माझं म्हणणं धुडकावून लावत म्हटलं,
‘‘आर्ट्सला जाऊन आयुष्यभर कारकुनी का करणार आहेस तू? मुळात डोक्यानं वाईट नाहीस. रेटून अभ्यासाला लाग. पहिलं दान देवाला. एक लक्षात घे, तू इंजिनियर म्हणून नोकरीला लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून ‘साहेब’ हे संबोधन असेल. कारकुनी करत बसलास तर दहाबारा वर्षांनी कदाचित तुला कुणी साहेब म्हणेल.’’
इतकं बोलून ते गप्प बसले. मीही गप्प.
१९७३ साल उजाडलं. रडतखडत मी पाच सेमिस्टर पूर्ण केल्या. सहाव्या आणि शेवटच्या सेमिस्टरचा ‘इरिगेशन’ हा विषय राहिला. त्यामुळं नापास हाच शिक्का मी वागवत होतो. आई-दादा माझी चिंता करतायत, हे पाहून आजी आणि धाकट्या तिघी बहिणीदेखील याचं पुढं काय होणार असं म्हणत माझी काळजी करत राहिले.
या सगळ्याचा माझ्यावर गहिरा परिणाम होत होता. माझा आत्मविश्वास ढासळत जायला हे एकमेव कारण नव्हतं. दुसरं कारण होतं ते शारीरिक व्यंगाचं. मी शाळेत जायला लागलो, तेव्हा माझ्या तिरळेपणाची जाणीव वर्गातली मुलं करून देत होती. माध्यमिक शाळेत माझी टिंगलटवाळी व्हायला लागली. कॉलेजमध्ये गेल्यावर तर मी इतर विद्यार्थ्यांपासून लांब राहायला लागलो. कदाचित याच मानसिकतेमुळं मी पिरियड चुकवत असे. किंवा बसलो तरी वर्गात काय चालू आहे, यातून स्वतःला बाजूला काढत असे. वय वाढत गेले तसा माझा तिरळेपणाही वाढत गेला.
या सगळ्याचा परिणाम एकच झाला. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पाच वर्षं घालवूनदेखील मी पूर्ण करू शकलो नाही. एक विषय राहिल्यानं मी पूर्ण डिप्लोमाधारक इंजिनियर झालो नव्हतो. आपण उपेक्षित आहोत ही वेदना वागवत, मन रमावण्यासाठी गोष्टी लिहायला सुरुवात केली. त्यात माफक यश मिळवून काही मासिकं, साप्ताहिकं यातून गोष्टी यायला लागल्या. परंतु यातून मी आर्ट्सला जायला हवं होतं, ही दुखरी जाणीव अधिकच जोर धरत होती.
१९७३ सालातील जुलै महिना असावा. कुणीतरी मला सांगितलं की, कोकण इरिगेशनमध्ये इंजिनियर भरतायंत आणि महत्त्वाचं म्हणजे जे डिप्लोमा पास नाहीत त्यांनाही कमी पगारावर घेतायंत. मला एक आशेचा किरण लाभला.
मी दादांना हे सांगितल्यावर ते इतकंच म्हणाले,
‘‘नाहीतरी घरात बसून तू काय करणार? तुझा डिप्लोमा झालेला नाही, त्यामुळं माझ्याच क्षेत्रात तुझ्यासाठी ‘कुठं लावून घ्या’ हा शब्द मला टाकता येत नाही. ठीक आहे, तुला जायचं असेल तर एक अनुभव घेण्यासाठी जा.’’
सेंट्रल बिल्डिंगमधून मी माहिती काढली. चिपळूणला कोकण इरिगेशनचे सर्कल ऑफिस आहे. चिपळूणला देना बँकेत माझा चुलत मामा मॅनेजर होता. मी ठरवलं की चिपळूणला जायचं. एखाद-दोन दिवस त्याच्याकडे राहायचं. सर्कल ऑफिसला जाऊन पहायचं.
मी घरातून स्वतंत्रपणे प्रवास करायला प्रथमच बाहेर पडलो. आजी डोळ्याला पदर लावेल, या शंकेनं तिच्याकडे न पाहता स्वारगेट गाठलं. चिपळूणला संध्याकाळी पोचलो. मामाचं घर माहीत नसल्यानं बँकेत गेलो तर बँक बंद. ‘आता काय करू?’ आयुष्यभराचा एक लाडका प्रश्न. मनात तयार झाला. बँकेच्या रखवालदाराचं लक्ष माझ्याकडे गेलं. कोण हवंय, विचारताच मी मामाचं नाव सांगितलं. रखवालदारानं चिंच नाक्याचा पत्ता दिला. पत्ता शोधत मी गेलो. बाहेरच मामा-मामी दिसले. हायस वाटलं.
रात्री माझ्या मामेभावंडांबरोबर वेळ घालवला. मला भाऊ नाही तरीही मामेभावाशी चांगलं जमलं. बारा वर्षं वयाचा हा मुलगा आत्मविश्वासानं जादूचे प्रयोग करून दाखवत होता. मामा विनोदी बोलणारा असल्यानं वातावरण हलकंफुलकं होतं. माझ्या चित्तवृत्ती फुलून आल्या.
सकाळी साडेदहाला मी पटाईत बिल्डिंगमधल्या ऑफिसच्या दारात उभा राहिलो. शिपाई सोडला तर आत कुणीच नाही. ११ च्या सुमारास एकेक जण यायला लागले. मी शिपायाला, का आलोय हे सांगताच तो म्हणाला, ‘‘हो, इंजिनीयर भरतायंत.’’
माझी उमेद वाढली. ते पाहून तो म्हणाला, ‘‘आत भट साहेब बसलेत. त्यांना भेट.”
दादा म्हणाले होते की, इंजिनीयर झालं म्हणजे पहिल्या दिवसापासून साहेब म्हणतात. पण आता हा शिपाई तर माझ्याशी एकेरीत बोलतोय. मग मीच माझी समजूत काढली, तू अजून कुठं पूर्ण इंजिनीयर झालायस आणि अजून कुठं तुला कुणी नोकरीवर घेतलंय?
मी भट साहेबांच्या समोर उभा राहिलो. माझी अशक्त मार्क लिस्ट पाहून ते म्हणाले,
‘‘आम्ही डिप्लोमा पास असलेल्यांना ४१० रुपये पगार देतो. तुला ३७५ मिळेल. पण त्यापूर्वी मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत.’’
मी उभाच. ते बसलेले.
त्यांचे प्रश्न विचारून झाले. एकाही प्रश्नाचं मी धड उत्तर देऊ शकलो नव्हतो. कारण ते इरिगेशनबाबत विचारत होते आणि नेमका माझा तोच विषय राहिल्यानं न्यूनगंड.
शेवटी ते म्हणाले,
‘‘निघ तू, आम्ही तुला आत्ता नोकरी देऊ शकत नाही. डिप्लोमा पास झाल्यावर ये, तेव्हा बघू.’’
इतका वेळ ते खुर्चीत बसून बोलत होते. मी उभा होतो. मात्र ‘आम्ही तुला नोकरी देऊ शकत नाही’ हे वाक्य उच्चारताना ते उठून उभे राहिले. इतका वेळ उभा असलेला मी मात्र त्यांची परवानगी नाही, हे माहीत असूनही समोरच्या खुर्चीवर मटकन बसलो.
हताश होऊन मामाकडे आलो. मामानं माझी अवस्था पाहिली आणि म्हणाला,
‘‘काही काळजी करू नको. ते भट अधीक्षक अभियंता भावेसाहेबांचे पीए आहेत. भावे साहेब आणि मी आम्ही दोघं ‘रोटरीयन’ आहोत. मी बोलेन त्यांच्याशी. बोलूनच घेतो आत्ता.’’
मामांनी फोन हातात घेतला.
मामाचा फोन संपला.
माझे खांदे दाबत गडगडाटी हसत म्हणाला,
‘‘झालं काम. उद्या बारा वाजता तू थेट भावे साहेबांकडे जायचं.”
मी भावे साहेबांकडे गेलो. त्यांनी माझ्याकडं पुरतं न पाहता शिपायाला सांगितलं, ‘भटांना बोलाव.’ भट साहेब आले. मी त्यांची नजर चुकवत उभा. भावे साहेबांनी मला बाहेर थांबायला सांगितलं. साहेबांच्या खोलीबाहेर एका बाजूला शिपाई आणि दुसऱ्या बाजूला मी उभा.
भट साहेबांनी मला त्यांच्या टेबलाजवळ बोलावलं. खुर्चीवर बसायला सांगितलं आणि अहोजाहो करत बोलायला लागले,
‘‘आम्ही तुम्हाला कुलाबा डीव्हीजनला पाठवतोय. पाच-सहा दिवसात ऑर्डर निघेल. ऑर्डर घ्यायला गुरुवार-शुक्रवारला या.’’
काही तरी पदरात पडल्याच्या आनंदात मी मामाकडे आलो. मनापासून जेवलो. रातराणीनं पुण्याला आलो. दादांना ऑर्डरबद्दल सांगितलं. फक्त मामाचा फोन वगळून. दादांच्या चेहऱ्यावर अस्फुट हसू. माझ्या मनात धास्ती. जे घडलं ते मामानी दादांना सांगितलं तर…
माझी ही धास्ती आता भीतीमध्ये रुपांतरीत होतेय, असं दादांच्या एका वाक्यानं वाटलं. दादा म्हणाले,
‘‘ठीक आहे मग. ऑर्डर घ्यायला चिपळूणला तू एकटा जाऊ नकोस. मी पण बरोबर येतो.’’
आम्ही दोघं मामाकडे पोचलो. आम्हाला पाहताच मामा मामीला ओरडून म्हणाला,
‘‘अगं बघितलं का, प्रभाकरपंत आलेत. माझ्या मनात शंकेचं काहूर आणि मामा दादांना पाहून कमालीचा खूश. या खुशीचं कारण मला रात्री कळलं, जेव्हा मामाच्या हातात बिअरची बाटली पाहिली.
बिअर पितानाच्या गप्पांत मामानी मला नोकरी कशी लावली, हे दादांना सांगितलं तर?
(क्रमशः)
*
(या कादंबरीतील घटना आणि व्यक्ती काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.)
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
कविता
लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
पुढचं वाचायची उत्सुकता आहे . 💐😊
Chhan kathaa. Pudhachi utsukata vaadhavali
खूप छान ओघवती निवेदनशैली आहे, त्यामुळे पुढे वाचण्यासाठी उत्सुक आहे
छान सुरवात केली आहे कथेची. कुठे लिव्हव्हेकंन्सी आहे असे कळले की आमचे वडिलही असेच सांगायचे आणि मग ते मुख्य साहेबांपुढे उभे राहायचे वगैरे सगळं आठवलं आत्ता
मी महाडकर असल्यामुळे आपल्या ‘ महाड ‘ विषयी कोणी कादंबरी लिहितंय…हे वाचून खूष झाले. सुरवात छान झाली आहे. उत्सुकता निर्माण झाली आहे.. रोहिणी म फडके.(ठाणे)
छान 👌👌👌👌👌