२ सप्टेंबर २०२०. मानवी इतिहासातील सर्वाधिक विनाशकारी ठरलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवट बरोबर ७५ वर्षांपूर्वी याच दिवशी झाला. या युद्धाचा आरंभ १ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. आरंभ होण्याच्या काळ्या दिवसाला आज ८१ वर्षे पूर्ण झाली. युध्दखोर भांडवलशाहीने साऱ्या मानवतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडले होते. त्या भयस्वप्नामागे शोषणासाठी जग आपापसात वाटून घेण्याची आकांक्षा होती. या हव्यासातून जन्माला आलेल्या हिटलरच्या नाझी भस्मासुराने मानवी स्वातंत्र्य ही संकल्पनाच इतिहास जमा करून टाकायचा विडा उचलला होता. मानवतेचे उत्सव साजरे करत असताना तिला लागलेले काही कलंक आणि काही चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्यांचे स्मरण आवश्यक ठरते. इतिहासातून काय घ्यावे आणि काय घेऊ नये, याचा संघर्ष वर्तमानातही चालूच असतो. हिटलरी वारसा पुन्हा रुजवण्यासाठी अमेरिकेचे डोनाल्ड जॉन ट्रंप , ब्राझीलचे येर मेसियास बोल्सोनारो आणि आपले दस्तुरखुद्द नरेंद्र दामोदरदास मोदी जोर लावून इतिहासाचे चाक उलटे फिरवू पाहात आहेत. अशा वेळी मानवतेला पुन्हा विनाशाच्या कडेलोटापासून वाचवायचं असेल तर इतिहासापासून योग्य ते धडे घेतले पाहिजेत.
मार्क्सच सांगून गेला आहे:
‘इतिहास विसरतात त्यांना इतिहासाची पुनरावृत्ती भोगावी लागते.’
यासाठी ‘जीवनमार्ग बुलेटिन’ घेऊन येत आहे एक विशेष लेखमाला. त्यातील पहिला लेख आज प्रसारीत करत आहोत.
दुसरं महायुध्द: पूर्वपीठिका आणि प्रारंभ
दुसऱ्या महायुद्धाने जगाचा इतिहास बदलून टाकला. या काळात साधारणपणे ७.५ ते ८ कोटी एवढी प्रचंड प्राणहानी झाली; मनुष्यहानी झालेली ही संख्या, त्यावेळच्या जागतिक लोकसंख्येच्या ३% एवढी प्रचंड होती. हिटलरच्या नाझी छळ छावण्यांमध्ये झालेल्या क्रूर वांशिक हिंसाचारात ६० लाख ज्यूंची कत्तल करण्यात आली (मुले, महिला, वृद्ध यांच्यासह!). हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर आवश्यकता नसताना, केवळ विध्वंसाच्या प्रयोगासाठी, तसेच सोविएत युनियनच्या लष्कराकडून जपानी लष्कराचा पराभव होऊन जपानचा कब्जा सोविएत फौजांकडे जावू नये, यासाठी हे अणुबॉम्ब टाकण्यात आले..! केवळ राजकीय प्रभुत्वाच्या कारणासाठी.
युरोपमधील ब्रिटन-फ्रान्स-जर्मनी ह्या सत्ता युद्धामध्ये पूर्ण मोडून गेलेल्याच होत्या. परिणामी युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका (USA) ही लष्करी, तसेच आर्थिक महासत्ता म्हणून स्थापित झाली, तर या नवीन साम्राज्यवादी अमेरिकन महासत्तेपासून समाजवादाच्या रक्षणासाठी तिला तुल्यबळ ठरण्याशिवाय सोविएत युनियनला पर्यायच राहिला नव्हता.
परिणामतः दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकीय पटलावर समाजवादी सोव्हिएत युनियन (USSR) आणि या महासत्तांमध्ये आपसात शीतयुद्ध सुरू झाले. त्या शीतयुद्धापासून दूर राहून पुढील काळात नवस्वतंत्र ‘अलिप्त राष्ट्रांची चळवळ’ या माध्यमातून भारत, ईजिप्त, सुदान, टांझानिया, घाना, युगोस्लाविया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, श्रीलंका, क्युबा, इराक, म्यानमार आणि इतर देशांनी स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारले. या युद्धामुळे साम्राज्यवादी व्यवस्थेलाच जबरदस्त तडाखा बसला. वर्षानुवर्षे साम्राज्यवादी देशांच्या टाचेखाली खितपत पडलेल्या वसाहतींमध्ये या महायुद्धाच्या काळात, तसेच त्यानंतरच्या काही वर्षांत मुक्तीलढ्यांनी उसळी घेतली. ते मुक्तीलढे यशस्वी होण्यासाठी महायुध्दही काही प्रमाणात कारणीभूत झाले. या दुसऱ्या महायुध्दाच्या निमित्ताने इतिहासाने विसाव्या शतकाच्या मध्यावर एक निर्णायक वळण घेतले. इतिहासाची पुढील वाटचाल समजून घ्यायची असेल तर दुसऱ्या महायुद्धाची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. त्यासाठी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या कारणांचा या लेखात उहापोह करूया.
खरे तर दुसरे महायुद्ध म्हणजे १९१४ ते १९१८ या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धाचाच अपूर्ण कार्यक्रम किंवा भाग २ होता. १७ व्या आणि १८ व्या शतकात नवनवीन प्रदेश काबीज करून त्या वसाहतींचे वर्षानुवर्षे शोषण करूनच युरोपमधील भांडवलशाही आणि त्यापूर्वी आशिया-आफ्रिकेतील त्यांची वासाहातिक साम्राज्ये उदयाला आलेली होती. वसाहतीवरील अधिकारांवरून त्यांच्या आपापसात चकमकी उडत असत. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्युक फर्डीनंड याचा खून झाला, या तात्कालिक कारणावरून पहिलं महायुद्ध सुरू झालं. १९१४ ते १९१८ पर्यंत चाललेल्या या पहिल्या महायुद्धानंतर ही ऑटोमन, जर्मन, ऑस्ट्रो हंगेरीयन आणि रशियन साम्राज्ये लयाला गेली.
पहिल्या महायुद्धानंतर जागतिक सामाजिक व भूराजकीय संरचनेत पुष्कळ बदल झाले. युद्धाच्या परिणामी, पराभूत आणि विजयी राष्ट्रांमध्येही अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय येथे झालेल्या तहात जर्मनीने पराभव स्वीकारला आणि युद्ध समाप्त झाले.
व्हर्सायच्या या तहामध्ये जर्मनीवर पुढील अटी लादण्यात आल्या:
• युद्धाची संपूर्ण नैतिक जबाबदारी आणि दोष जर्मनीने स्वीकारावा
• २५ हजार चौरस मैलांचा अर्थात ७० लाख लोकसंख्या असलेल्या प्रदेशाचा जर्मनीने त्याग करावा
• जर्मनीने सर्व वसाहतींचा त्याग करावा
• जर्मनीने केवळ एक लाख सैन्य पदरी ठेवावे, बहुतांश नौदलाचा त्याग करावा आणि वायुसेना बाळगू नये
या जाचक अटींमुळे जर्मनीचा राष्ट्रीय अपमान करण्यात आला आहे, अशी भावना जर्मन नागरिकांमध्ये निर्माण झाली. याच भावनेला खतपाणी घालून पुढे आक्रमक आणि वांशिक राष्ट्रवाद याची मुळे घट्ट रोवण्यात हिटलर आणि नाझी पक्षाला यश मिळाले.
१५ नोव्हेंबर १९२० रोजी, आपापसांमधील युद्ध टाळणे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे या एकमेव उद्देशाने राष्ट्रसंघ (League of Nations) ही आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली. राष्ट्रांमधील सौहार्द, नि:शस्त्रीकरण, सामूहिक सुरक्षा, प्रश्न सामोपचाराने सोडविणे अशी राष्ट्रसंघाची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात आली होती. परंतु, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन हे या राष्ट्रसंघाचे आर्किटेक्ट असूनही अमेरिका (USA) राष्ट्रसंघात सहभागी झाली नाही, तिने कधीही सक्रिय सहभाग घेतला नाही. राष्ट्रसंघाचे स्वतःचे असे वेगळे सैन्य निर्माण केले गेले नव्हते; त्यामुळे आर्थिक निर्बंध लादणे किंवा सैन्याची आवश्यकता पडेल तेंव्हा सदस्य राष्ट्रांच्या मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागत असे. आपसातील सामंजस्य वाढवावे याऐवजी, स्वार्थी राष्ट्रीय हिताच्या राजकारणासाठीचा अड्डा असे स्वरूप राष्ट्रसंघाला आलेले होते. परिणामी अक्ष राष्ट्रांनी (Axis powers: जर्मनी, जपान, इटली) १९३० च्या दशकात केलेले लष्करी हल्ले रोखण्यास राष्ट्रसंघ अपयशी ठरला.
पहिल्या महायुद्धानंतर, ज्या प्रकारची जागतिक अर्थव्यवस्था आणि भूराजकीय व्यवस्था निर्माण झालेली होती, ती मधूनच लष्करवाद व विस्तारवादी सामाजिक राजकीय तत्वज्ञान प्रसृत झाले. ‘वंश’ या घटकाला राजकीय निष्ठेसाठीची महत्त्वपूर्ण पूर्वअट असे स्थान, एकोणिसाव्या शतकातील अतिरेकी राष्ट्रवादाच्या उदयाने मिळवून दिले होते. विशेषतः इटली, जर्मनी, जपान ही राष्ट्रे लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान आणि आक्रमक बनली. परिणामी दुसरे इटली-अबिसीनिया युद्ध व दुसरे चीन-जपान युद्ध झाले. इटलीत आक्रमक लष्करी राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता, फॅसिस्ट बेनिटो मुसोलोनी हा रोमन साम्राज्याचे वैभव भूमध्यसागरालगत पुनःप्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होता. मुसोलिनीने १९३५ मध्ये इथिओपियावर, १९३८ मध्ये मध्ये अल्बानियावर आणि नंतर ग्रीसवर आक्रमण केले.
१९३० च्या आर्थिक महामंदीमुळे (Great depression), वांशिक आणि आक्रमक राष्ट्रवादाला पोषक असे सामाजिक राजकीय वातावरण निर्माण झालेले होतेच. आर्य वंशीय लोकच राज्यकर्ते होण्याच्या कुवतीचे असून ज्यू वंशीयांची लायकी दुय्यम नागरिक म्हणूनच राहण्याची आहे! असे वांशिक भेदभावाचे विष पेरून बेरोजगारांच्या फौजेला आकर्षित करण्यात हिटलर यशस्वी झाला. राष्ट्रीय समाजवाद ही घोषणा देत हिटलर सत्तेवर आला. जर्मनीचा फ्युहरर, जुलूमशहा म्हणून त्याने १९३३ मध्ये सूत्रे हातात घेतली. पुढे छळ छावण्या, होलोकॉस्ट, ज्यूंच्या कत्तली, कम्युनिस्टांवर खोटे आरोप, अटका, हत्त्या वगैरे इतिहास सर्वज्ञात आहेच.
आशियामधील जपानचा विस्तारवाद आणि आक्रमणे:
चीन व मांचुरियाच्या प्रदेशावर साम्राज्यवादी जपान अर्थातच डोळा ठेवून होता. जपान मधील आक्रमक लष्करी मूलतत्त्ववादी गटांना १९३० च्या महामंदीच्या निमित्ताने संपूर्ण आशिया खंडात लष्करी वर्चस्व स्थापन करण्याची संधी मिळाली. जपानने १९३१ मध्ये मांचुरियावर आक्रमण करून तेथे कठपुतली सरकार स्थापन केले. चीनमधील बाजारपेठांवर अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांचे असलेले वर्चस्व नष्ट करून त्या ठिकाणी जपानी एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी जपान संघर्षरत होता. त्यासाठी ‘Asia for Asians’ या घोषणेचा उपयोगदेखील करण्यात आला. याच संघर्षाचा एक भाग म्हणजे १९३७ मध्ये जपानने मांचुरियावर आक्रमण केले. जपानला केला जाणारा कच्च्या खनिज तेलाचा पुरवठा अमेरिकेने खंडित केला, याला ब्रिटन आणि नेदरलँड्स या राष्ट्रांनी पाठींबा दर्शविला. नेदरलँड्सच्या ताब्यात असणाऱ्या ईस्ट इंडीज मधील तेलविहिरींवर कब्जा मिळविण्याशिवाय जपानकडे पर्याय उरला नाही.
दरम्यान १९३६ ते १९३९ या काळात स्पेनमध्ये नॅशनलिस्ट विरुद्ध रिपब्लिकन या संघर्षात रशियाने रिपब्लिकन पक्षाला तर इटली आणि जर्मनीने नॅशनलिस्ट पक्षाच्या जनरल फ्रँकोला पाठिंबा दिला. यामध्ये अंततः जनरल फ्रँकोने सत्ता हस्तगत केली आणि तो स्पेनचा हुकूमशहा बनला.
मार्च १९३९ मध्ये हिटलरने म्युनिक कराराचा भंग करून झेकोस्लोव्हाकियावर आक्रमण केले, स्लोवाक जनतेने बंड करून त्यांचे स्वातंत्र्य घोषित केले, शेवटी झेकोस्लोव्हाकिया नावाचा देशच शिल्लक राहिला नाही. याच वर्षी इटलीचे अल्बानियावर आक्रमण आणि सोव्हिएट -जपान सीमारेषा युद्ध झाले.
प्रचंड आर्थिक अरिष्टामधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग हिटलरसमोर शिल्लक होता, तो म्हणजे पूर्व युरोपीय प्रदेशावर आक्रमण व जर्मनीच्या पोषणासाठी इतर राष्ट्रांचे शोषण.
राजकीय वांशिक महत्त्वाकांक्षा ,सततची युद्धे ही कारणे जरी वरकरणी दिसत असली तरी; दुसऱ्या महायुद्धाच्या राजकीय पार्श्वभूमीच्या तळाशी शोषणाधिष्ठित जागतिक अर्थव्यवस्था, वसाहतवाद, एका राष्ट्रांकडून दुसऱ्या राष्ट्राचे शोषण हेच मूलभूत सूत्र कार्यरत होते.
१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले, त्यानंतर दोन दिवसांनी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जर्मनीविरोधात युद्ध जाहीर केले; युद्धाची ठिणगी पडली आणि पुढे महायुद्धाच्या आगीत पुढची सहा वर्षे जग होरपळत राहिले…!
*
(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.)
जीवनमार्ग बुलेटिन: १५६
गुरूवार, ३ सप्टेंबर २०२०
संपादक: उदय नारकर
वाचा
दुसरे जागतिक महायुद्ध – लेखमाला
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
डॉ. सुधीर दहिटनकर हे पुणे येथे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत क्षयरोगाच्या प्रसाराविरोधात काम करणारे एक अनुभवी डॉक्टर आहेत.