सकाळ झाली. मामांनी दादांना विचारलं,
‘‘पंत, तुम्ही कोकणात यापूर्वी आला होता? सवड काढून आला असाल तर कोकण फिरून या. असं मी सुचविन. निदान रत्नागिरी-पावस तरी करून यावंत तुम्ही.’’
दादांना ती कल्पना आवडली असं त्यांनी भासवलं. पण मला तर दादांची देहबोली हेच सुचवत होती की ते तसं काही ठरवूनच आले होते.
मी काही तुम्हाला आमचा कोकण दौरा कसा झाला, हे सांगत बसत नाही. पण प्रवासामध्ये दादा माझ्याशी खूपच उत्साहानं बोलत होते. यावरून माझी अशी कल्पना झाली की, मामानं मला नोकरीवर लावण्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं नव्हतं किंवा तसलं काही बोलणं त्या दोघात झालं असलं तरी दादांनी ती ओळख मला दिली नव्हती.
प्रवास उत्तम व्हायचं आणखी एक कारण घडलं. मी आणलेल्या बॅगेवरती दादांनी स्वतःचं नाव लिहिलं होतं. कारण काही वर्षांपूर्वी ते एका ग्रुपबरोबर परप्रांतात गेले होते. ते स्वतःला माणसासारखं माणूस समजत नव्हते. तरी बॅगेसारखी बॅग असू शकते, हे त्यांनी नाव टाकून जगाला सांगितलं होतं.
गर्दीच्या एसटीमध्ये मी आणि दादा कसंबसं चढलो. चपळाईनं एका सीटवर मी बसलो आणि खिडकी शेजारच्या सीटवर बसण्यासाठी दादांना हाका मारत सुटलो. दादा सीटपर्यंत पोचेस्तोवर बाहेरून एक रुमाल त्या सीटवर येऊन पडला. आता पन्नाशीच्या वयाचे दादा आणि तिशितला तो रुमाल टाकलेला दोघंही सीटवरून भांडत राहिले. आपल्या लिखाणातून भांडकुदळ माणूस रंगवणारा हा लेखक स्वतःची भांडणं मात्र करू शकायचा नाही. तसंच झालं. त्या माणसानं विजयी हास्य केलं.
ज्या सीटवर मी बसलो होतो तिथं तुम्ही बसा, हे मी दादांना सांगेपर्यंत ते ड्रायव्हर केबीनपाशी पोचून एका बारला धरून उभे राहिले. बस चिपळूणहून सावर्डेपर्यंत आली आणि माझ्याशेजारी बसलेल्या विजयी विराचं माझ्या बॅगेकडं लक्ष गेलं. त्यावरचं ‘प्रभाकर जोशी’ हे नाव त्यानं पुन्हापुन्हा वाचलं आणि म्हणाला,
‘‘तू प्रभाकर जोशींचा कोण?’’
मी जरा घुश्यात म्हटलं, ‘‘मुलगा.”
मी असं म्हणताच त्याचा स्वर बदलला. माझा हात हातात घेऊन म्हणाला,
‘‘अरे.. मी तर राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या दोनतीन नाटकात काम केलंय. कुठे असतात ते?’’
मी म्हटलं, ‘‘इथंच.”
‘‘म्हणजे?” त्यानं न समजून विचारलं. मी पुन्हा म्हटलं,
‘‘इथंच या बसमध्ये. मघाशी तुम्ही ज्यांच्याशी भांडत होता तेच ते.”
सावर्डे ते देवरुख तो माणूस उभा. दादा त्या सीटवर बसलेले. स्वतःचं कौतुक आपल्या फॅनकडून ऐकत. स्तुतीमुळं माणूस किती बदलतो, याचं दर्शन मला तेव्हा झालं. कधी नव्हे ते दादा माझ्याशी रागाचं न बोलता प्रेमाचं बोलत राहिले. बोलण्याच्या ओघात त्यांनी मी लेखन का आणि कधी करायला लागलो, हेही सांगितलं. मी पूर्वी हेच ऐकत आलो होतो, परंतु तेव्हा ते आत्मप्रौढीसारखं वाटत होतं. आता ते सांगत होते ते आत्मानंद मिळवत राहणारं होतं. ते बोलत असताना आपला मुलगा जे छटाकभर लिहीत आहे, त्याचं कौतुक ते करतायंत का, याची मी वाट पहात होतो. पण तसं काही झालं नाही. एका अर्थी ते बरंच झालं. उद्या कदाचित मी पावशेर लेखन केलं तर बापाचं अनुकरण केलं, त्यांची छाप दिसतेय, असलं बोलणं मी खोडून काढू शकीन.
रत्नागिरीहून आम्ही चिपळूण स्टँडवर आलो, तेव्हा पुणे बस लागलेली दिसली. क्षणभर मला वाटलं दादांना म्हणावं की, आता मला फक्त ऑर्डर घ्यायचीय तुम्ही पुण्याला गेलात तरी चालेल. पण माझी जीभ रेटली नाही. मामाकडचा पाहुणचार त्यांना खूप आवडला होता, असं मला दिसून आलं.
मी परत भट साहेबांपुढं उभा राहिलो. त्यांनी चक्क हसून स्वागत केलं. त्यांनी हातावर ऑर्डर ठेवली आणि म्हणाले,
‘‘विनय जोशी, ही ऑर्डर कमी स्केलची आहे. चांगला अभ्यास करा. काय तुमचे एक-दोन विषय राहिलेत ते सोडवून टाका. पुढच्या वेळी पूर्ण स्केलची ऑर्डर घ्यायला पेढे घेऊन या.’’
मी पटकन त्यांच्या पायाशी वाकलो.
दादांनी ऑर्डर घाईघाईनं वाचली आणि म्हणाले,
‘‘ऑर्डर डिव्हिजन ऑफिस पेणची काढलीय. आता पेणला मात्र तू एकट्यानं जायचंस.’’
मी गूढ हसलो. माझ्या चेहऱ्यावरचं हसू त्यांच्या डोळ्यांनी टिपलं.
मी आणि दादा पुण्याला आलो. काय घडलं हे मी आजीला सांगितलं. काय घडलं हे दादांनी आईला सांगितलं. पेणची ऑर्डर हे आईला समजलं. तसं ते आजीला समजलं. आईच्या चेहऱ्यावर समाधान, तर आजीच्या चिंता. मी खूप दिवसांनी आजीच्या गळ्यात पडलो. मला तिला विचारायचं होतं, ‘तुझ्या मनात चिंता कसली?’ परंतु त्या अगोदरच ती म्हणाली,
‘‘जातोयस बाळा, पण जीवाला जपून राहा.’’
दुसऱ्या दिवशी मी पेणला जायला निघालो. दादांनी नवा ‘होल्ड ऑल’ आणला होता. मला म्हणाले,
‘‘याचं एक बरं असतं. हवं नको ते सामान भरता येतं. बॅगेसारखं नाही, भरलेल्या सामानामुळं झाकण लागत नाही.”
एक छोटी बॅग आणि अवजड भासणारा होल्ड ऑल घेऊन मी पेणच्या स्टँडवर उतरलो.
चटकन ऑफिस कुठं आहे, हे विचारायच्या आधीच एक मांसाहारी टपरीवजा हॉटेल गाठलं. फळ्यावर लिहिलेले बरेच पदार्थ माश्यांचे होते. मी आजवर मासे खाल्ले नव्हते. मासे खाताना घशात काटा अडकून मृत्यू झाला, असं ऐकलं होतं. मासे खायची ऊर्मी दाबता येत नव्हती. मी जेवणाच्या थाळ्या घेऊन येणाऱ्याला विचारलं,
‘‘काटे नसलेला मासा कुठला?’’
त्यानं सांगितलं, ‘‘पापलेट, सुरमई.’’
पुन्हा माझ्याकडं नीट पहात म्हणाला, ‘‘पापलेट महाग आणि सुरमई स्वस्त.’’
मी ती सुरमई संपवली. लोकं माश्यांवर इतका का जीव टाकत असतील? मला तर तो प्रकार फारसा आवडला नव्हता. माझं जेवण संपताना त्यानं विचारलं,
‘‘सोलकढी आणू?”
मी ‘हो’ म्हटलं. तोंडाला आता कुठं चव आली. स्टँडसमोर कल्पना लॉज दिसलं. तिथं सामान टाकलं आणि इरिगेशनचं ऑफिस कुठं आहे याची चौकशी केली. एक जण म्हणाला, ‘‘मोकाशी साहेबांचं का?”
एखादं ऑफिस व्यक्तीच्या नावानं ओळखलं जातं, तेही सरकारी? मला गंमत वाटली. म्हटलं,
‘‘कोण आहेत हे मोकाशी साहेब?’’
तो म्हणाला, ‘‘मोठ्ठे इंजिनियर आहेत.’’
एका गल्लीत पाटी दिसली, ‘इरिगेशन प्रोजेक्ट्स इन्व्हिस्टिगेशन डिव्हिजन, कुलाबा.’
खात्री करून घेण्यासाठी विचारलं,
‘‘मोकाशी साहेबांचं ऑफिस हेच का?’’
ती व्यक्ती ‘हो’ म्हणाली आणि त्यांनी अधिकची माहिती देत म्हटलं,
“मी त्यांच्या जिपचा ड्रायव्हर. पण साहेब पुण्याला घरी गेलेत.’’
पुण्याला? घरी? मला एकदम जिव्हाळा वाटला.
लॉज घेतलं असल्यानं काही काळजी नव्हती. एक जिना चढून वर गेलो. एका प्रेमळ दिसणाऱ्या व्यक्तीला ऑर्डर दाखवली. त्यांनी ती पाहताच चहा सांगितला. अर्ध्या तासाच्या गप्पात मला समजलं की ते मोकाशी साहेबांचा टाईप केलेला पत्रव्यवहार हस्तलिखित मजकुराशी ताडून बघणारे आणि योग्य असेल तर सहीला ठेवण्याचं काम करणारे आहेत. अशी एक पोस्ट असते, हे मला प्रथमच कळलं.
दुसऱ्या दिवशी थोडा उशिराच ऑफिसला गेलो. ऑफिस कालच्या तुलनेत टिळनाटिळ भरलेलं. तेव्हाच ओळखलं साहेब नक्की आहेत.
डोक्यावरचे केस विरळ झाल्यानं कपाळ भव्य भासणारे, शोभेसा चष्मा लावलेले, मिशी ठेवावी की काढावी, अशा संभ्रमात अस्फुट मिशी ओठावर वागवणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं छान हसणारे साहेब बघताक्षणी मला आवडून गेले. माझी ऑर्डर डोळ्याखालून घालत त्यांनी विचारलं,
‘‘जोशी, तुला पेण, रोहा आणि महाड यापैकी कुठं जायला आवडेल?”
इतिहासाच्या पुस्तकात रायगडजवळ महाड आहे, हे वाचलं होत. केवळ गावाचं नाव ओळखीचं म्हणून मी म्हणालो,
“साहेब, महाड चालेल.”
केबिनमधून बाहेर आलो आणि मघाच्या गृहस्थांना महाडबद्दल विचारायला सुरुवात केली. ते म्हणाले,
‘‘पुण्याहून महाडला जायला तीन रस्ते आहेत. एक महाबळेश्वर मार्गे, दुसरा खोपोली इंदापूरमार्गे आणि तिसरा भोरवरून, जो सगळ्यात जवळचा आहे.’’
भोर, अरे व्वा! आमच्या शाळेची काय, सगळ्याच शाळांची भोर, भाटगर, बनेश्वर ही आवडती ट्रीप होती. मी पुन्हा लहान होऊन शाळेच्या बसनं भोरचा राजवाडा पाहायला लागलो. मला रुजू होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला होता. महाडची ऑर्डर घेण्यासाठी परत या ऑफिसला यावं लागणार, असा विचार मी करत असताना ते म्हणाले,
‘‘तुमची ऑर्डर ‘रनर’मार्फत ‘सब डिव्हिजनल इंजिनीयर, महाड’ इथं उद्याच पाठवा, असं साहेबांनी लिहिलंय. त्यामुळं तुम्ही लगेच तीन-चार दिवसात महाडला गेलात तरी चालेल.’’
मी लॉजवर आलो. समोर होल्ड ऑल. कशाला मला हे ओझं वागवयाला लावलं दादांनी? मी चरफडत म्हटलं. माझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला कंगोरे पडायला लागलेत, या कल्पनेनी खूश झालो. आजीला सांगायला हवं, आता मला ‘बाळ’ म्हणणं सोडून दे.
पुण्यात दोन दिवस काढले. पुणे-विन्हेरे एसटी स्वारगेटहून सकाळी साडेआठला निघते आणि महाडला दुपारी दोनपर्यंत पोचते, ही माहिती आणि रिझर्व्हेशन दोन्ही घेऊन आलो. निघताना मात्र बजावलं, तो होल्ड ऑल अजिबात नेणार नाही. महाडला पोचल्यावर काय आणि कशी व्यवस्था लागतीय ते पाहीन. उगाच कुठं ओझं वागवू?
दादांनी ‘बरं’ म्हटलं. माझं मत मी मांडणं आणि दादांनी त्याला होकार देणं हा विरळा अनुभव वारंवार यायला हवा, असं बॅग भरत मी पुटपुटलो.
१९७३ जुलै महिना. तारीख १० किंवा १२ असावी. मी बसमध्ये बसलो. दादांचं एक वाक्य आठवलं.
‘प्रत्येक प्रवास हा अंतिम ध्येय प्राप्तीसाठी नसतो, तर ध्येय गाठण्याच्या टप्यामधील तो स्वल्पविराम असतो.’
दादांबद्दल पोटात माया आहे, हे मला जाणवलं तेव्हा भोर मागं टाकलं होतं.
भोरच्या पुढं प्रवास कुर्म गतीनं सुरू झाला. हिर्डोशीला बस बराच वेळ थांबणार होती. सभोवार छान हिरवाई आणि हातात सिगारेट. वरंधा घाटाचा पूर्वार्ध संपला, तेव्हा एका घाट देवी मंदिरापाशी पुन्हा बस थांबली. उजव्या बाजूला खोल दरी आणि डाव्या डोंगरावरून माकडांचे कळप. मोठी माकडं छोट्या पिल्लांपेक्षा जास्त माकडचाळे करतायंत, हे पाहून खूप मजा वाटली. आजीनं दिलेला बिस्किटाचा पुडा काढला. सगळी बिस्किटं ‘विनय’ या माकडासाठी नसून वरंधा घाटातील माकडांसाठी आहेत. मग माझ्यासाठी काय? घाटमाथ्यावर असलेल्या टपऱ्यामधील मिक्स भजी, वडापाव आणि ग्लासातून वाफाळलेला चहा.
वरंधा घाटातील भयानक वळणं पार करत माझेरीला आलो. एक पाटी वाचली.
‘शिवथर घळ ६ कि. मी.’
समर्थांचे मनाचे श्लोक कधीकाळी पाठ केले होते. ते म्हणत असताना बस पुलावरून जात होती. खाली नदीचं अथांग पात्र तर उजवीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज. मी अधाशासारखा परिसर पिऊन टाकत होतो.
स्टँड दिसायला लागला. एका भल्यामोठ्या शेडमध्ये बस उभी राहिली. सोबतीला आणखी चार बस. कोसळणारा पाऊस. दादांनी छत्री घ्यायला का लावली नाही? मी होल्ड ऑल नकोय, म्हटल्यावर दुखावून जात दादांनी माझ्या सामान घेण्यातून अंग काढून घेतलं होतं. मला वाईट वाटलं. बॅग उचलून अंग चोरत उतरलो.
खरंच महाड आल होतं.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
कविता
लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
प्रवास वर्णन वाचून मीही महाडला पोचले.