प्रिय आज्जी,
काल रात्री ११ वाजता मयुरीचा फोन आला होता. मी झोपायची तयारी करत होतो पण तिचं नावं फोनच्या स्क्रीनवर वाचून इतका आनंद झाला की डोळ्यावरची झोप उडून गेली. पहिली दोन मिनिटं तर तिने सॉरी म्हणण्यातच काढली कारण ‘मी तुला आज रात्री फोन करते’ असं ती १५ दिवसांपूर्वी म्हणाली होती. पण ते झाल्यावर आम्ही बराचवेळ बोलत होतो. तिच्या नव्या जॉबबद्दल अगदी आनंदाने ती सगळं सांगत होती आणि मग म्हणाली “पहिले सहा महिने सगळं छानच वाटतं पण मला हे सगळं तुला सांगायचं होतं रे. हल्ली अविनाशचं काम जोरात चालू आहे, त्याला बोलायला-भेटायला वेळ नसतो. तू नाहीयेस ना इथे, नाहीतर तुला तरी बोलून बोलून बोअर केलं असतं. आय रियली मिस यू ड्यूड. तू येऊन जा की पुण्यात. जस्ट भेटायला तरी येऊन जा”
अश्विनी पुण्यात असल्याचं मी सांगितल्यावर तिला खूपच आनंद झाला. अश्विनीला नक्की भेटेन वगैरे म्हणाली आहे. नंबर वगैरे घेतलायन, बघुया काय होतंय ते. ती अश्विनीला भेटणार या गोष्टीने मला मात्र उगाचच थोडा जास्त आनंद झाला आहे. त्या दोघींचं छान जमेल, मैत्री होईल असं मला वाटतं. मयुरी मुळात सतत हसतमुख असते. ऑफिसमध्येही ती असली की फ्रेश वाटायचं. अविनाश थोडासा गंभीर आणि वर्कोहोलिक आहे. त्याला हातात काम असलं की काही सुचत नाही. वर्क लाईफ बॅलन्स आणि जॉब सॅटिसफॅक्शन असल्या विषयांवर काहीतरी फिलोसॉफी झाडायला म्हणून खरंतर तो आमच्याबरोबर ऑफिसबाहेरच्या टपरीवर चहा प्यायला यायचा. पण मयुरी कायम अशी छान हसतखेळत आनंदात असते. प्लेझंट वाटतं तिच्याशी बोलल्यावर.
त्यादिवशी बोलता बोलता सूरजचा विषय निघालाच. त्याची गर्लफ्रेंड आता सावरली आहे. त्याच्या आई-बाबांना मात्र अजून जरा त्रास होतोय. झोप लागत नाही. आई रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत बसते आणि बाबा पुन्हा ड्रिंक्स घ्यायला लागलेत. हे सगळं ऐकताना कामाबद्दल पॅशनेटली बोलणारा सूरज दिसत राहिला. मयुरी बोलत होती, मग मी तिच्या आवाजात असं दु:ख ऐकल्यावर काहीतरी करुन विषय बदलला. मयुरीचा जड आवाज ऐकायची सवय नाही त्यामुळे थोडं विचित्रच वाटत होतं मला.
तिचा फोन ठेवल्यावर एक गोष्ट मात्र जाणवली ती म्हणजे मयुरी, अविनाश किंवा अश्विनी यांची माझ्याशी असलेली मैत्री सगळ्यापलीकडे आहे. मी सध्या त्यांच्यासारखा नोकरी करत नाही, मी इकडे घरी आहे, मी अजून नोकरीबद्दल काही निर्णय घेतलेला नाही किंवा माझ्या मनात एक गोंधळ सतत चालू असतो यापैकी कोणत्याच गोष्टीचा, आमच्या मैत्रीवर, बोलण्या-वागण्यातल्या मोकळेपणावर परिणाम होत नाही. मयुरी, अश्विनी किंवा अविनाश शांतपणे माझं बोलणं ऐकतात, मुख्य म्हणजे मला बोलू देतात. मला टेंशन नसतं त्यांच्याशी बोलताना. हे लोक जेव्हा शांतपणे ऐकतात तेव्हा त्यांना माझ्याबद्दल वाटणारा विश्वास आणि काळजी मला जाणवते.
गंमत म्हणजे मी पुण्याला कॉलेजला असताना दाढी वाढवत होतो आणि मम्मीला ते आवडत नव्हतं बघ, तेव्हा एकदा मी तिला म्हटलं की, तू सोडून सगळे म्हणतात की दाढी चांगली दिसते आहे तेव्हा ती म्हणायची, “कधीतरी भेटणारे लोक चांगलंच वागतात, बोलतात. मित्र मैत्रिणींवर काही तुझी जबाबदारी नाहीये. तुझ्या दाढीला ते कशाला नावं ठेवतील…” आज मयुरी, अविनाश आणि अश्विनी माझ्याशी जसं चांगलं वागतात ते बघून मला वाटतं की आमच्या मैत्रीची, एकमेकाला साथ देण्याची जबाबदारी त्यांनीही स्वीकारली आहे. हे लोक तोंडदेखलं बोलत नाहीत. पण मी मम्मीला यातलं काही सांगितलं तरी ती मग “त्यांना नोकऱ्या पण आहेत” असं म्हणेल आणि विषय तिसरीकडेच जाईल.
पण मयुरीशी बोलून छान वाटलं. ही सगळी समजूतदार लोकं सोबतीला आहेत म्हणून माझा सूरज झाला नाही असं मला कायमच वाटतं. त्यात तुझाही मोठा वाटा आहे.
तुझा शांत आणि सॉफ्ट आवाज अधूनमधून आठवतो आज्जी. तूही जमलं तर एखादा फोन कर ना. तू कुणाला तरी खोकल्याचं औषध सांगितलं होतंस, त्याची ऑडीओ क्लिप आहे माझ्याकडे ती ऐकतो मी अधूनमधून, पण तरीही बघ एकदा गणपतीला विचारुन… देवाला शक्य असतं सगळं असं म्हणायचीस की तू…
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.
सुंदर कथा