प्रिय आज्जी,
सरवटे सरांची आठवण अजून येते आहे, पण आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो. पूर्वा ताईकडून नंबर घेऊन मी मेघनाला मेसेज केला. मी सकाळी मेसेज केला आणि दुपारी तिने चक्क फोन केला. मी तिच्याशी बोललो. मला खरंच खूप बरं वाटलं. मी बोलताना ती फक्त हो… हं… ओके… एवढंच म्हणत होती. मी एखादं स्वगात सादर करतो आहे असंच मला बोलताना मध्येमध्ये वाटत होतं. ती दुसऱ्या बाजूला ऐकते आहे हे माहीत असूनसुद्धा मध्येमध्ये मी खात्रीसाठी हॅलो म्हणत होतो. आमचं बोलणं झाल्यावर तिचा व्हॉट्सऍपवर मेसेजदेखील आला. मी पूर्वा ताईला मेसेज करून सांगितलं आणि तिचाही एकदम “आता ठीक होईल सगळं” असा मेसेज आला. म्हणजे हे सगळंच मला खूप नवीन आहे आज्जी.
मेघनाच्या बोलण्यावरून पूर्वा ताई म्हणते तसं वाटतंय पण तरीही खात्री अशी वाटत नाहीये. मी एक गोष्ट काबुल करू का, मला सायाकॉलॉजिस्ट किंवा कौन्सेलर या लोकांबद्दल असं वाटतं की, ते ना काही वेळा जरा जास्तच आशावादी वगैरे वागतात. म्हणजे ‘ कोणत्याही परिस्थितीतलं चांगलं पाहावं’ वगैरे या सकारात्मक गोष्टी बाजूला ठेवल्या तरी परिस्थितीची म्हणून एक दाहकता असते, एक गांभीर्य असतं. म्हणजे सायकोलॉजिस्ट लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणायचं नाहीये पण मला असं वाटतं की, नुसतं ‘ऑल इज वेल’ किंवा ‘ऑल विल बी वेल’ म्हटल्याने गोष्टी सुधारत नसतात.
मेघनाशी बोललो तेव्हा कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीशी बोलल्यासारखं वाटलं. तिच्याशी बोलताना सायकॉलॉजी किंवा कौन्सेलर यातलं काही जाणवलं नाही. सुजय, अश्विनी, मयुरी, अविनाश यांच्याशी बोलताना जसं वाटायचं तसं वाटलं. आता आम्ही आठवड्यातून एकदा बोलणार आहोत. मी तिला आपल्या पत्रांबद्दलही सांगितलं आणि तुझ्याबद्दलही. पण तिनं त्यावर असं काही विशेष मत वगैरे मांडलं नाही. काही गोष्टी मी तिला सांगितल्या तेव्हा तिनं ‘आणि?’ किंवा ‘नंतर काय झालं?’ असं विचारलं आणि काही गोष्टींबाबत ओके या शब्दाच्या पलीकडे तिनं फार प्रतिक्रिया दिल्या नाहीत.
म्हणजे हे सगळं वाचून शाळेतून घरी येऊन नव्याने भेटलेल्या मित्राचं प्रचंड कौतुक करणारा मी तुला आठवत असेन. असं मैत्रीच्या पहिल्या काही दिवसात मी किती एक्सायटेड असायचो ना? आणि मग सहा महिन्यांनी माझं आणि त्या मित्राचं कशावरुन तरी बिनासायचं आणि मग मी त्या मित्राचं नावही घ्यायचो नाही. मला आठवतं नंतर नंतर तर तू आणि मम्मी माझ्या नव्या मित्रांच्या गोष्टी ऐकायचात आणि म्हणायचात ‘सहा महिन्यांनी बघुया’.
पण खरं सांगू आज्जी, आज इतक्या दिवसात पहिल्यांदा तू सोडून जिच्याशी मोकळेपणाने बोलता येईल असं कुणीतरी भेटलं. पूर्वाताई, अश्विनी, मयुरी, सुजय, अविनाश हे सगळे जवळचे असले तरी ते त्यांच्या त्यांच्या कामात असतात, त्यांचे विषय वेगळे असतात. त्यांच्याशी बोलताना त्यांचे विषय आणि माझ्या मनातला गोंधळ याची सरमिसळ असते. अश्विनी तर हल्ली ऑफिस, गॉसिप, बॉसच्या तक्रारी एवढंच बोलत असते. मयुरी, सुजय, अविनाश हेही त्यांना वेळ झाल्याशिवाय मेसेज किंवा फोन करत नाहीत. पूर्वा ताईला तिची तिची कामं असतात. थोडक्यात मी एकटा असतो आणि बराच वेळ फोनमध्ये काहीतरी उगाचच करत असतो किंवा बघत असतो.
आज मेघनाशी बोललो तेव्हा वाटलं की जसं मी तुला कधीही पत्र लिहितो तसं तिच्याशी कधीही बोलू शकतो. हे पूर्वाताईमुळे शक्य झालं हे खरंच आहे. ही आत्ता कितीही सुरुवातीची एक्साईटमेंट वाटली तरी मला मेघनाशी बोलावंसं वाटतं आहे आणि मी तिच्याशी बोलणार आहेच. सहा महिन्यांनी बघुया काय होतंय ते…
आणि मेघनाशी जरी मी बोलणार असलो तरी तुला अधूनमधून अशा पत्रांमधून त्रास देणारच आहे.
– वरद
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.