रॉयल बाप लेकाची कहाणी

दोन लिहिणारी माणसं. एक माणूस या जगात आता नाही, पण त्याच्या लेखणीनं तो आजही आपल्या आसपास आहे याची सतत जाणीव एका माणसाला आहे. तो माणूस म्हणजे या पुस्तकातला बॉय : अनिल किणीकर. आणि त्या दोघांच्या, बाप-लेकाच्या नात्याची वीण ‘रॉय आणि बॉय’ या लेखसंग्रहात उलगडण्यात आली आहे.

अनिल किणीकर हे त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातील काही अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग या पुस्तकातून मांडतात. एक लेखक, कलावंत म्हणून मनस्वीपणे जगताना त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी अतिशय वाचनीय आणि आकर्षक शैलीत सांगितला आहे.

घरात खायला काहीही नसताना, ऐन दिवाळीच्या वेळी, स्वतःच्या मामाच्या घरून, त्याला न सांगता धान्य घ्यावं लागल्यावर मनात चालणारी उलघाल लेखकानं नेमकेपणानं मांडली आहे. घरची गरिबी आणि वडिलांची मुशाफिरी या दोन्हीचा ताळमेळ अनिल किणीकर जेव्हा लहान होते तेव्हा मनाच्या पटलावर जसा उमटला तसा पुस्तकात प्रामाणिकपणे दिला आहे. मग शाळेत मुलांना परीक्षेला तांब्या भांडे घेऊन पाणी द्यायचं काम करणारा छोटा अनिल असो किंवा लिखाणाच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग करणारे मोठेपणीचे लेखक, संपादक अनिल किणीकर असोत. या दोन्हींच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा म्हणजेच रॉय किणीकर यांचा प्रभाव जागोजागी दिसून येतो.

दिवाळी अंक ही मराठी साहित्यातली एक जुनी महत्त्वाची आजही सुरु असलेली परंपरा. त्यातल्या नावाजलेल्या ‘दीपावली’ या अंकाचे संस्थापक- संपादक असणारे रॉय किणीकर हे त्याकाळात किती पुढचा विचार करत होते. त्यांनी कशापद्धतीने त्या अंकाला घडवले. त्यांचा हा प्रवास लेखकाने अतिशय परखडपणे मांडला आहे. मराठी साहित्य विश्वातली ही परंपरा तेव्हाच्या काळात किती समृद्ध आणि विविधांगी होती हे ही त्यातून अधोरेखित होते. पण एका बाजूला, आर्थिक गणिते न जुळल्यामुळे, कर्ज काढून अंक काढण्याचा प्रयोग, आणि त्यातून झालेलं नुकसान ‘मनस्ताप’ या प्रकरणातून लेखकाने मांडलं आहे.

लेखकाने त्यांच्या वडलांना काही पत्रे लिहिली आहेत. जी ते जिवंत असताना त्यांनी ती पत्रं दिलेली नाहीत. ‘न लिहिलेली पत्रे’ या शीर्षकाखाली त्यांनी वडिलांचा वेगळेपणा मुलाच्या नजरेतून मांडायचा प्रयत्न केला आहे. त्या दोघांमधले भावबंध, नात्यातला न सांगता येणारा आपलेपणा, न बोलताही कळणाऱ्या असंख्य गोष्टींचा उलगडा अनिल किणीकर या पुस्तकातून करतात.

जागोजागी वडिलांनी केलेल्या काव्याचा आधार घेऊन, त्यांच्या एकेक ओळीतील ताकद पुस्तकातून सांगायचा प्रयत्न ते करतात. यात रॉय किणीकर यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रे दिलेली आहेत. बापमाणूस गेल्यावरही त्याच्या कामाला, साहित्याला जिवंत ठेवायचा प्रयत्न यातून लेखक अनिल किणीकर यांनी अतिशय साधेपणाने आणि सरळ भावाने केलेला दिसून येतो.

जन्मापासून आईच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात, ती गोष्ट सहज होत असते. आणि ते नातं माणूस गेल्यावरही टिकून असतं. पण वडिलांचा वाटा, त्यांचा प्रभावही काहींच्या आयुष्यात सतत जाणवत असतो. वडिलांचे कळत-नकळत झालेले संस्कार एखाद्याच्या आयुष्याला कसं स्वरूप देतात हेही यातून समजून येतं.

एकाच वाटेवर चालणाऱ्या बाप-लेकाची ही गोष्ट तशी काहीशी ओबडधोबड आणि अमूर्त आहे. पण आपल्या वडिलांची वाट धरून तीच पुढे चालत राहणाऱ्या मुलाच्या मनातील वडील नेमके कसे होते हे या ‘रॉय आणि बॉय’ या पुस्तकातून अतिशय विधायक पद्धतीनं मांडलं आहे.

*

वाचा
शब्दांची सावली: अमृता देसर्डा

‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
कविता

चित्रकथा


संचालक at | Website | + posts

अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :