प्रिय आज्जी,
आज सकाळी मेघनाचा फोन आला होता. तिने लक्षात ठेऊन फोन केला आणि उशीर झाल्याबद्दल, मागच्या वेळी बोलू न शकल्याबद्दल सॉरीही म्हणाली. मी पूर्वा ताईशी जे काही बोललो किंवा मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी नक्की कशासाठी फोन केला होता यापैकी काहीच सांगितलं नाही. मग आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहिलो. ती तिच्या ‘फ्रेंड्स’बरोबर कुठेतरी फिरायला गेली होती, ते सगळं ती सांगत होती.
बोलता बोलता तिने एकदम विचारलं की, “तू नादाल आणि मेद्वेदेव यांच्यातली ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल पाहिलीस का?” मी नाही म्हटलं. तर म्हणाली “बघ ती फायनल. नादाल ज्या पद्धतीने खेळला आहे ते टेनिसपेक्षाही त्याचा दृष्टीकोन, त्याची प्रचंड मेंटल स्ट्रेन्थ आणि त्याची प्रयत्न करत राहण्याची सवय याबद्दल आहे. खूपच इन्स्पिरेशनल आहे नादाल.” मी ठीक आहे म्हटलं आणि सोडून दिलं. मी तो विषय ज्या पद्धतीने सोडून दिला त्यावरून मला इन्स्पिरेशन किंवा मोटिव्हेशन नको आहे हे तिला जाणवलं असेलच, त्यामुळे तीही पुढे फार काही बोलली नाही.
पण तिच्या बोलण्यावरून मला एकदम विनायक दादा आठवला. विनायक दादा खूप टेनिस बघतो, खूप म्हणजे अगदी वेड्यासारखं बघतो. कुठलं ग्रँडस्लम कधी, कुणी किती जिंकली, क्ले कोर्टवरच्या स्पर्धा कधी सुरु होतात, हे सगळं अगदी त्याला पाठ आहे. अभ्यास केल्यासारखंच तो टेनिस पाहतो. मला आठवतं अजून २००७ किंवा २००८ मध्ये विम्बल्डनला नादालने फेडररला फायनलला हरवलं तेव्हा दादाला खूप खूप दु:ख झालं होतं. मी आणि सुजय फक्त आणि फक्त क्रिकेट बघत असल्याने आम्हाला फेडरर, नादाल, विम्बल्डन यातल्या कशाचच कौतुक नव्हतं. आम्ही महेंद्रसिंग धोनीच्या प्रेमात होतो. हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस करत होतो, त्यामुळे दादाचं दु:ख आम्हाला कळतच नव्हतं.
तसंही दादा मनातलं फारसं काही बोलत नाही. माझ्याशी तर तो फारसा कधी बोलतच नाही. त्याचा मेसेज आला त्यालाही आता ४-५ महिने झाले. त्याने मला कुठलातरी दिवाळीचा मेसेज फॉरवर्ड केला होता. वर्क स्ट्रेसमुळे मी नोकरी सोडली हे त्याला आवडलेलं नाही. त्याचं म्हणणं, नोकरीत नवीन असताना तुम्ही कसं तहान भूक, हरपून, झपाटून काम केलं पाहिजे, माझ्यासारख्या मुलावर घरची जवाबदारी नाही तर मग मी अधिक उत्साहाने काम केलं पाहिजे. बॉस वाट्टेल तसं बोलतो याचा जर मला त्रास होत असेल, कामाचा स्ट्रेस येत असेल तर मी डरपोक आहे आणि मग मी आपल्या दुकानातच काम केलं पाहिजे. मला हे काम आवडत नाहीये किंवा मला दुसरं काही तरी आवडत असेल अशी शक्यता सुद्धा तो गृहीत धरू शकत नाहीये.
मी बोलताना मम्मी, पप्पा, पूर्वाताई, तू आणि अश्विनी एवढेच उल्लेख करतो. दादाबद्दल काही बोलावं असे विषयच निघत नाहीत. टेनिसचा विषय निघाला की मला दादा आठवतो पण मी ते बघत नसल्यामुळे तोही विषय येत नाही. आज मेघनाच्या बोलण्यात आला आणि मग ते आठवलं. मला आठवतं मयुरीला जेव्हा मी दादाबद्दल सांगितलं तेव्हा ती म्हणाली, “तुला एक मोठा भाऊ आहे असं वाटलं नव्हतं.”
महिन्याभरापूर्वी सुजय म्हणाला बेंगलोरला एक नोकरी आहे, दादा तिकडेच आहे तर तू का जात नाहीस? मला त्याच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देता आलं नाही, पण मग सारवासारव करत मी म्हटलं की, पुण्यात असेल तर बघ, अश्विनी पण तिकडेच आहे ना…”
मी हे सगळं लिहित असलो तरी मला माहित्येय की तुला हे सगळं वाचायला त्रास होत असेल. आमच्यात असा दुरावा राहू नये असंच तुला वाटत असेल पण पूर्वा ताई म्हणते की काही नाती क्लिकच होत नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या व्यक्तीशी (अगदी जवळच्या नात्यातल्याही) तुमची वेवलेंग्थ जुळतच नाही. त्यात कुणाचं चूक किंवा कुणाचं बरोबर असं काहीच नसतं, पण त्या नात्याचा आवाकाच तितका असतो. मला पटतं ते आज्जी. दादा माझ्याशी बोलत नाही किंवा मला डरपोक समजतो याचं मला थोडंसं वाईट वाटतं पण त्याला आनंद होईल म्हणून मी माझ्या मनाविरुद्ध काही करावं असं मला वाटत नाही. खरंच सॉरी आज्जी. एक सांगतो पण, उद्या वेळ आली, त्याला माझी मदत लागली किंवा तसं मला जाणवलं तर मी नक्कीच मदत करेन. काळजी नसावी…
– वरद
ता. क. पत्र लिहिता लिहिता मयुरीचा मेसेज आलाय, माझ्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग संधी आहे म्हणतेय. बोलून बघतो तिच्याशी आणि सांगतो लवकरच…
*
वाचा
आज्जीची गोधडी
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
कविता
चित्रकथा
कथा
निखिल 'सारद मजकूर' सोबत लेखन, भाषांतर, संपादन असं काम करतो. काम करत नसला तर तो काहीतरी वाचत / पहात किंवा मित्र मैत्रिणींशी चॅटींग करत लोळत असतो. तुम्हाला ए. आर. रेहमान आवडत असेल तर तुमची त्याच्याशी लगेच मैत्री होईल.