दुसऱ्या महायुद्धाचे जगातील राजकीय-सामाजिक व्यवस्थेवर दूरगामी परिणाम झालेच. पण या महायुध्दाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलून टाकला. पूर्वी ज्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान समाजामध्ये विकसित व्हायचे, ती पद्धतदेखील बदलून गेली. ज्याला ‘संस्थात्मक विज्ञान’ म्हणता येईल असे विज्ञान संशोधनाचे स्वरूप आकाराला आले आणि नंतर दृढ होत गेले.
क्षेपणास्त्रे
नाझी जर्मनीने दोन प्रकारची क्षेपणास्त्रे विकसित केली होती. एक, ज्याला आपण ‘क्रूझ मिसाईल’ असे आता म्हणतो ते. ही मिसाईल्स, म्हणजेच क्षेपणास्त्रे, एका अर्थाने स्वयंचलित विमानासारखी असतात. त्यांना स्वतःची इंजिने आणि पंख असतात. अत्यंत अचूकपणे ती लक्ष्यावरती जाऊन आदळतात. आणि दुसरे, ‘बॅलेस्टिक मिसाईल’. ते जमिनीवरून अथवा आकाशातून विशिष्ट लक्ष्यावरती डागले जाते. त्यांना अर्थातच स्वतःची उडण्याची यंत्रणा नसते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने जर्मनीच्या शास्त्रज्ञांना अलाबामा राज्यात नेऊन यांच्याकडून या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक अग्निबाणाचे तंत्र आत्मसात केले. पुढे अवकाश संशोधनात, चंद्र मोहिमेत या तंत्रज्ञानाचा वापर झाला.
ब्रिटिशांनी नाझी जर्मनीचे संदेश उकलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर्स विकसित केले. अमेरिकनांनी देखील अशाच प्रकारच्या कॉम्प्युटरचा उपयोग बॅलेस्टिक आणि युद्ध क्षेत्रातील इतर समीकरणे सोडवण्यासाठी केला. त्याकाळी जहाजावरून आणि विमानातून वापरल्या गेलेल्या कॉम्प्युटर नेटवर्कच्या तंत्रज्ञानाने आज आपल्या जीवनातील सगळी क्षेत्रे व्यापली आहेत.
ढगांतून आरपार पाहणे !
ढगांमुळे पाकिस्तानला आपली क्षेपणास्त्रे दिसणार नाहीत, अशा अर्थाचे विधान आपल्या पंतप्रधानांनी नुकतेच केले असले तरी रडारचा वास्तविक शोध हा ढगातून आरपारचे आणि दूरवरचे पाहून शत्रूराष्ट्राच्या येणाऱ्या विमानांची टेहाळणी करण्यासाठीच लावण्यात आला होता ! त्यामुळे बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करण्याची शक्यता आता पार मावळली आहे. शांतता काळात विमानतळावरून येणाऱ्या विमानांचे नियंत्रण करण्यासाठी रडारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.
रडारमध्ये वापरण्यासाठी अगदी कमीतकमी आकाराची यंत्रणा आवश्यक होती. त्यातून आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेषतः टेलिव्हिजनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म घटकांचा शोध लागला. याशिवाय रडारचा वापर हा हवामानशास्त्रामध्ये देखील होतो. अग्निबाणामध्ये छोटी रडार यंत्रणा बसवून लक्ष्य नजीक आले की त्यातील फ्यूज काढायची कल्पना पुढे आली. आता विमान विरोधी क्षेपणास्त्रात वापरण्याचे छोटी रडार यंत्रणा हे एक प्रमुख साधन बनले आहे.
दंडात टुच्च करण्याचे शास्त्र !
महायुद्धामुळे वैद्यकीय विज्ञानातदेखील फार प्रगती झाली. पेनिसिलीन हे अँटीबायोटिक महायुद्धापूर्वीच शोधले गेले होते हे खरे, पण त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग मात्र महायुद्ध काळात केला गेला. DDT सारख्या जंतुनाशकाचा वापर डासांना मारून मलेरिया थांबवण्यासाठी याच काळात केला गेला. अर्थात मलेरियाचे पर्यावरण विषयक दुष्परिणाम नंतर लक्षात आले आणि त्यातून आधुनिक पर्यावरणवादी चळवळ सुरू झाली. हवाई वैद्यक शास्त्रातून नाईट विजन, सीट बेल्टस्, क्रश हेल्मेटस्, प्राणवायू पुरवठा या गोष्टींचा शोध लागला.
रासायनिक प्रयोगशाळेतूनदेखील विनाशक अशा बऱ्याच गोष्टींचा जन्म झाला. नवीन पद्धतीचे स्फोटके, त्याचप्रमाणे नापामसारखे बॉंब्ज, फ्लेम थ्रोअर्स आणि स्मोक स्क्रीन या साऱ्या रासायनिक प्रयोगशाळांच्या निर्मिती आहेत. काही जुन्या वस्तूंचे नवीन उपयोगदेखील शोधण्यात आले. पूर्वी चांदीची उपकरणे, भांडी बनवणाऱ्या कंपन्या आता सैन्याला लागणारी सर्जिकल उपकरणे बनवायला लागल्या. मोटरगाड्या बनवणाऱ्या कारखान्यातून आता रणगाडे आणि विमाने तयार होऊ लागली. कारखान्यांमधून हे बदल घडवून आणण्यासाठी फार तातडीने अभियांत्रिकीची, दळणवळणाची तंत्रे यात बदल करावे लागले. युद्धसाहित्यावर जास्त भर देण्यासाठी उत्पादन केले जात असताना सामान्य नागरिकांना बऱ्याच मूलभूत गोष्टींचा – उदाहरणार्थ रबर, पेट्रोल, कागद आणि कॉफी – तुटवडा सहन करावा लागला. टायर जास्त काळ टिकावेत म्हणून तासाला पस्तीस एवढी वेगमर्यादा सांभाळणे आवश्यक बनले. जपानने आग्नेय आशियावर बराचसा कब्जा मिळवलेला असल्याने नैसर्गिक रबर हे दुर्मिळ बनले होते. तेव्हा ग्राहकांना काटकसर करणे भाग होते. स्त्रियांच्या स्कर्ट्सची लांबीदेखील कमी होत गेली आणि बेदिंग सूट केवळ दोन तुकड्याचे (बिकिनी) बनू लागले.
बापरे, प्लास्टिक!
तुटवडा भरून काढण्यासाठी नवीन पद्धतीचे पदार्थ शोधणे आवश्यक होते. यातले काही दुसऱ्या महायुद्धापूर्वी शोधले गेले होते, पण त्यांचा सार्वत्रिक उपयोग मात्र दुसऱ्या महायुद्धकाळात सुरू झाला. उदाहरणार्थ, अॅल्युमिनियम फॉइल ऐवजी अन्नपदार्थ झाकण्यासाठी प्लास्टिक शीटस् चा वापर. आता या प्लास्टिकचा अतोनात प्रादुर्भाव झाल्याने पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. काचेच्या बाटल्यांची जागा कार्डबोर्डपासून बनवलेल्या दूध आणि ज्यूस कंटेनरनी घेतली. अॅक्रिलिक शीट्सचा वापर करून बॉम्बर विमानांची नाके बनविणे, किंवा फायटर प्लेनच्या कॅनॉपीसाठी, छतासाठी ते वापरणे सुरू झाले. दुर्मिळ धातूंच्या ऐवजी सर्वत्र प्लायवुडचा वापर सुरू झाला. पन्नासच्या दशकातील अमेरिकेचे रुपडे म्हणजे आधुनिक जगातले प्लायवूडचे मोल्डेड फर्निचर, फायबर ग्लास, प्लास्टिक आणि पॉलिस्टर – या सगळ्यांचे मूळ दुसऱ्या महायुद्धकाळात शोधल्या गेलेल्या पदार्थांमध्ये आहे.
उदरभरण !
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अन्नशास्त्राचादेखील विकास झाला. अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांनी कोणत्या विटामिन्सची आणि मिनरल्सची शरीराला आवश्यकता किती प्रमाणात असते, हे शोधून काढले. वेगवेगळ्या क्रिया करताना किती प्रमाणात कॅलरीज खर्च होतात तेही ठरवण्यात आले. अन्नधान्य व्यवस्थितपणे तयार करणे, गोठवणे आणि हाताळणे, टिकून ठेवणे या सगळ्या गोष्टी यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. सैनिकांना जास्त पोषण आणि शक्ती मिळावी यासाठी त्यांचे खाद्यान्न काळजीपूर्वक ठरवण्यात आले होते. त्यातही विविधता आणि चव कशी येईल, याचा अभ्यास झाला. ही आव्हाने स्वीकारणे याचा अर्थ असा स्वयंपाकघराआधी प्रयोगशाळांमध्ये त्यांचा शोध घेणे. ‘डी- रेशन’चे एक उदाहरण सांगणे येथे अप्रस्तुत ठरणार नाही. सैनिकाचे हे ‘इमर्जन्सी रेशन’ पुष्कळ कॅलरीज असणारे होते. ते चॉकलेट बारच्या स्वरूपात दिले जायचे. या बारचे तीन तुकडे हे सैनिकाला अठराशे कॅलरीज एवढी शक्ती प्रदान करायचे. या चॉकलेटचा उपयोग आपत्कालीन रेशन म्हणून करायचे ठरले. यासाठी अपेक्षित गुणधर्म असे ठरवण्यात आले- वजन चार औंसपर्यंत असले पाहिजे; खूप कॅलरीज असल्या पाहिजेत; उष्ण तापमानाला ते टिकून राहायला हवे आणि उकडलेल्या बटाट्यापेक्षा त्याची चव थोडीशीच बरी असायला हवी! शेवटची अपेक्षा ही सैनिकाने नेहमीच डी-रेशन खात सुटू नये म्हणून होती. युद्ध संपेपर्यंत लक्षावधी डी-रेशन अमेरिकेत बनवले गेले आणि जगभर वाटले गेले.
विध्वंस!
आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ती दुसऱ्या महायुद्धाची सर्वाधिक भयंकर देणगी म्हणजे अणुबॉंब. १९४५ मध्ये मुख्य युध्द संपल्यावरही केवळ आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने अमेरिकेने त्यातले दोन जपानवर टाकले. अणुबॉंब करण्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ, अभियंते आणि औद्योगिक कारखान्यातील सामुग्री यांचा वापर केला. बॉम्ब तयार करण्यासाठी दोन शहरांची निवड करण्यात आली. टेनेसी मधील ओक रिज – त्याच्या भोवती ५९ हजार एकरापर्यंत जंगल होते. इथे काम करणारे लोक बॉम्बसाठी युरेनियम वेगळा करत होते. वॉशिंग्टन स्टेटमध्ये हॅनफोर्डची निवड केली गेली, कारण तिथे कोलंबिया नदीलगत पाच लाख एकर जागा उपलब्ध होती. तिथे लोक प्लुटोनियम हा नवीन धातू तयार करत होते. अणुबॉंबचे पदार्थ विज्ञान अतिशय किचकट आहे आणि तो तयार करणे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय कठीण. दोन प्रकारची अण्वस्त्रे बनवण्यात आली- निदान त्यातले एक तरी यशस्वी व्हावे म्हणून. हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियमपासून बनवलेला होता आणि नागासाकीवर टाकलेला प्लुटोनियमपासून. जर्मनीमध्येदेखील शास्त्रज्ञ अणुबॉंबवर काम करत होते, पण अमेरिकन शासनाने ज्या प्रचंड प्रमाणात आपल्या या शास्त्रज्ञांना सामुग्री पुरवली तेवढी जर्मनीने पुरवली नाही. अणुबॉंब ही गोष्ट अशी आहे की त्या काळात एकाचादेखील वापर झाला असता तरी त्याचा युद्धावर आणि सैनिकी हालचालींवर मोठा प्रभाव पाडणे शक्य होते. तुलनेने नेहमीची शस्त्रास्त्रे विकसित करायला आणि नंतर त्याचे घाऊक उत्पादन व्हायला इतका अधिक काळ लागायचा की त्यावरचे संशोधन युद्धकाळात अगदी सुरुवातीला जरी सुरू झाले तरी जवळपास युद्ध संपेपर्यंत ती हाताशी आली नव्हती.
नव्या कल्पनांची निर्मिती!
दुसऱ्या महायुद्धादरम्यान आधीच्या काळाप्रमाणेच नुसती नवनवीन शस्त्रास्त्रे किंवा वस्तू बनल्या नाहीत, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नवनवीन कल्पना उदयाला आल्या. युद्ध सुरू होण्याच्या आधीच्या काळात शास्त्रज्ञ म्हणजे बहुधा छोट्याश्या प्रयोगशाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करणारी प्राध्यापक मंडळी असत. त्यांना पैसे आणि सामुग्री अगदीच तुटपुंज्या प्रमाणात मिळायची. शास्त्रज्ञ निसर्गातील मूलभूत तत्त्वे शोधून काढणे, हेच काम तेवढे करायचे. आपल्या संशोधनाचा प्रत्यक्षात काय उपयोग होईल, याबद्दल त्यांना तमा बाळगणे आवश्यक वाटत नव्हते. त्यामुळे देशातील सरकारांचे त्यांच्याकडे फार कमी लक्ष असायचे. पण दुसऱ्या महायुद्धात विज्ञान न भूतो न भविष्यति अशाप्रकारे युद्धोपयोगी कल्पना, शस्त्रे आणि सामग्री शोधण्याच्या कामी जुंपले गेले. प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी बाकी साऱ्या गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त युद्धोपयोगी असलेली आव्हाने आणि त्यासाठी केलेले प्रयत्न यांना त्यांनी वाहून घेतले. या काळामध्ये संशोधन आणि विकास यांच्या अतिशय मोठ्या प्रयोगशाळा आजच्या आधुनिक स्वरूपात उभ्या राहिल्या. या सगळ्या बदलांचे एक मोठे उदाहरण म्हणजे मॅनहॅटन प्रोजेक्ट. तिथे हजारो पदार्थ-वैज्ञानिक काम करत होते. त्यांचे काम हे सैन्याप्रमाणे शिस्तशीर, आखीव पद्धतीने चालायचे. अशा प्रकारे त्यांनी पहिले अणुबॉंब तयार केले. इतर प्रयोगशाळादेखील असत, उदा. ‘एमआयटी’मध्ये रेडिएशन लॅबोरेटरी (जिथे रडारवर संशोधन चालायचे). अशा कितीतरी प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक्सपासून वैद्यकीय संशोधनामध्ये आणि मानसशास्त्रीय परीक्षणांमध्ये गुंतलेल्या होत्या. युद्ध संपेपर्यंत अणुबॉम्बने सिद्ध केले होते की विज्ञान आता निरागस राहिलेले नाही. शासनाच्या हातातले पाशवी यंत्र बनले आहे. युद्ध-पूर्व काळात शास्त्रज्ञांना संशोधनासाठी शासकीय पैसा जेवढा मिळायचा त्याच्या हजारो पट युध्दकाळात दिला जात होता. शास्त्रज्ञ हे आता अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे सल्लागार बनले होते, आणि राष्ट्रीय-परराष्ट्रीय धोरणावर सल्ला देणे आता त्यांचे काम बनले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन शासनाने विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी या गोष्टींवर प्रचंड भर दिला- मग ते मोठ्या शासकीय प्रयोगशाळा उभारणीसाठी असो किंवा विद्यापीठातील संशोधनाला पैसा उपलब्ध करून देण्यासाठी असो. औद्योगिक कंपन्यांना तर उच्च तंत्रज्ञानाधारीत वस्तूंवरती खर्च करण्यासाठी मोठेच प्रोत्साहन शासनाने दिले. विज्ञान-तंत्रज्ञान, युध्दखोरी आणि खासगी नफा यांची सांगड घालून एक नवी व्यवस्था आकार घेऊ लागली होती.
(या लेखाचा उत्तरार्ध पुढील भागात प्रकाशित होईल.)
*
(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.)
जीवनमार्ग बुलेटिन: १५९
रविवार, ६ सप्टेंबर २०२०
संपादक: उदय नारकर
वाचा
दुसरे जागतिक महायुद्ध – लेखमाला
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी