ऑफिसात घड्याळ नव्हतं. चार दिवस मोकळेचाकळे घालवल्यानं मी आणि स्वामी अस्वस्थ झालो होतो. चव्हाण, डीजे आणि जुना पण माझी ओळख न झालेला नवा वाटणारा बी. एस. पाटील अस्वस्थ नाहीत, या विचारानं देखील मी सैरभैर झालो. चव्हाण आणि बीएस वहीत केलेली नोंद एका जाडजूड रजिस्टरमधे उतरवत होते, तर डीजे डोळे मिटून बसला होता. त्या बंद डोळ्यांच्या हातात मी मनानी जपमाळ दिली. मीच मनात ‘राम राम’ म्हणत होतो. आणि एकदम चमकलो, ‘जैन लोक जपमाळ हातात घेऊन कुणाचं नाव घेत असतील?’ असे आध्यात्मिक प्रश्न मनात यायची पुऱ्या वीस वर्षात कधी वेळ आली नव्हती. आमच्या घरात ना कुणी जपमाळ घेतली होती, ना मनापासून देवाची पूजा केली होती. म्हणजे माझं घर पापभिरू नव्हतं का? दादा लेखक असले तरी पुरोगामी का काय म्हणतात ते नव्हते. आयुष्यात त्यांनी मोठी पापं केल्याचंही आठवत नव्हतं. पापभिरू माणसं पाप करत नाहीत? माझे प्रश्न पुण्यातील घरापासून या ऑफिसपर्यंत रेंगाळत राहिले. भिंतीवर नसलेल्या घड्याळाची टिकटिक जाणवत होती. लाकडी खुर्चीवर बसलेले साळी साहेब स्वतः हालत नव्हते आणि त्यांची खुर्ची सरकवल्याचे आवाज कानावर येत नव्हते. आणि एकदम लाकडी खुर्ची सरकली. साहेब उठून उभे राहिले. आत डोकावून बीएसला म्हणाले,
‘‘पाटील निघतो मी.’’
माझ्याकडं पाहून पुटपुटले,
‘‘जोशी, तुम्ही उद्या सकाळी थेट तुडीलला जा. जाताना बीएस पाटलांना सांगून जा.’’
साहेब बाहेर पडले तेव्हा अदृश्य घड्याळात साडेपाचचा ठोका वाजला होता.
साहेब जाताच बीएसनी माझ्या हातात एक कोरी वही दिली. एका रजिस्टरवर त्याची नोंद केली. रजिस्टर माझ्यापुढं ठेवलं. मला काय करायचं ते समजलंच नाही. तेव्हा तो म्हणाला,
‘‘जोशी, वही इश्यू केल्याची नोंद केलीय. सही कर.”
इतक्या वेळात मी पहिल्यांदाच त्याचा आवाज ऐकला. ओळख करून देणं-घेणं हे आवडतं काम स्वामींनी बीएसच्या बाबतीत का करू नये? मला शाळेतल्या मॉनिटरची आठवण झाली. अकरावीला गोडबोले मॉनिटर होता. तो हुशार नव्हता, पण गोष्टीवेल्हाळ होता. त्यामुळं मॉनिटर हा खूप बोलका असतो, अशी माझी समजूत झाली होती. पण इथं ‘आयपीआय सबडिव्हिजन, महाड’चा मॉनिटर ओठांची महिरप सोडायला तयार नव्हता. शिस्त राखण्यासाठी बोलायची गरज नसावी.
ऑफिसच्या बाहेर पडलो. सगळेच बरोबर बाहेर पडलो, पण कुणीही ऑफिस सुटलंय या आनंदात नव्हतं. बहुदा ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी ते एकाच पद्धतीनं विचार करत होते. यामुळं जागा बदलली तरी त्यांचं वागणं एकच होतं. स्वामी, चव्हाण, डीजे या सगळ्यांची शब्दांशी देवाणघेवाण करून माझी ओळख झाली होती. पण हा बीएस पाटील.. शब्दाविनाच त्याची माझी जास्त ओळख झाली. अंबादास बेकरीच्या ओट्यावर गर्दी होतीच. आमची ही गॅंग त्याकडं न बघताही पुढं निघून गेली. ते पाहून वडा खायची माझी इच्छा मरून गेली. कसा मी राहणार यांच्याबरोबर?
गोकुळच्या कॉटवर मी आडवा झालो. गॅलरीत खूप कावळे कठड्यावर बसलेले. मी त्यांच्याकडं पाहत राहिलो. एक पक्षीप्रेमींनी आपल्या लेखात म्हटलं होतं की ‘कावळा हा पक्षी मला आवडतो. तो माझ्या मेलेल्या सग्यासोयऱ्यांना मुक्ती देतो म्हणून नाही, तर सर्वांत स्वच्छ पक्षी म्हणून.’
कावळ्याचं निरीक्षण करताना मला एक कोडं पडलं. महाडमधे एवढे कावळे का? शेजारच्या कॉटवर पन्नाशीला टेकलेले घाऱ्या डोळ्यांचे गृहस्थ माझ्याकडं पहात होते. जरा जास्तच निरखून पहात होते. ते म्हणाले,
‘‘कावळे आवडणारा माणूस कधी बघायला मिळत नाही.’’
त्यांचं हे स्वगत मला बोलायला माणूस देऊन गेलं. मघाशी पडलेला प्रश्न मी त्यांना विचारला. ते म्हणाले,
‘‘साधी गोष्ट आहे, कावळा काय, पारवा काय आणि माणूस काय.. जिथं खायला मिळतं, तिथं गर्दी करणार. पलीकडं मासळी बाजार आहे, कावळ्यांची ती मेजवानी आहे. थोडं लांब मुस्लीम मोहल्ल्याकडं जा, तिथंही कावळे दिसतील. कारण मोमेडियन लोक मासे खातात आणि खाण्यासाठी त्याचा धंदादेखील करतात. पण विरुद्ध बाजूच्या काकरतळ्याकडं जा, कावळा फारसा दिसणार नाही. कारण काकरतळे म्हणजे भटभिक्षुकांची वस्ती. मासळी मिळत असताना भाताचं खरकटं खाण्यात कावळ्यांना काय रस हो?’’
मला एकदम पुणं दिसायला लागलं. नव्या पुलाकडून स्वारगेटकडं जाणारा रस्ता. त्याच्या पूर्वेकडचं पुणं आणि लकडी पुलाकडचं पश्चिम पुणं.. संस्कृतीत फरक होताच. मी त्यांना विचारलं,
‘‘कुठून आलात?’’
अपेक्षेनुसार उत्तर आलं, ‘‘पुणं.’’
“पुण्यात कुठं?”
“कँपात.”
झालं. पुण्यातले तीन भाग मला दिसायला लागले. लकडीपूल ते शिवाजी रस्ता. शिवाजी रस्ता ते ईस्ट स्ट्रीट. आणि ईस्ट स्ट्रीट ते एम्प्रेस गार्डन. पुणं एकच, पण तीन वेगवेगळ्या संस्कृती!
त्या गृहस्थांशी जास्त बोलायची इच्छा होती; पण ते पंचा घेऊन बाथरूममध्ये गेले. एकदम वाटून गेलं महाडसारख्या दमट हवेच्या ठिकाणी ही संध्याकाळी दुसऱ्यांदा अंघोळ करायची सवय लावून घ्यायला हवी.
बाजारात एक चक्कर मारून संध्याकाळी साडेसातला परत गोकुळाला आलो. माझ्या पलीकडची रिकामी कॉट भरलेली होती. एक तरुण पाठमोरा बसलेला. कमरेला एक छानशी महागडी अंडरवेयर, तितकाच छान बनियन आणि त्याच्या अंगावरून येणारा सुगंध. त्यांनी मान फिरवली तेव्हा त्याचे भरगच्च कुरळे केस दिसले. गोऱ्यापान कपाळावर ते हलतायत. गुलाबी ओठात एक शीळसुद्धा आहे. मी पुरुष असूनही त्या मूर्तीच्या प्रेमात पडलो. इतका देखणा हा कोण असेल? तो त्याचे कपडे बॅगेतून काढत होता. त्याला निवांत ठेवत मी खाली काउंटरवर गेलो. विचारलं,
‘‘वर कोण आलंय?’’
त्यांनी रजिस्टर माझ्यापुढं ठेवलं. ‘मुर्तुझा कुरेशी, औरंगाबाद’ अशी नोंद होती.
सकाळ झाली. ‘तो’ झोपलेला होता. मला घाई होती कारण दासगावला जाणाऱ्या एसटीची वेळ झाली होती. जुन्या पोस्टापाशी मी आलो. एसटीमध्ये बसलो. तिकीट होतं पन्नास पैसे. म्हणजे दासगाव जवळ आहे तर! गर्दीची चढ-उतार दोन ठिकाणी झाली नाही तर दासगाव आलं. उतरल्यावर मी तुडीलला कसं जायचं विचारलं. जायला एसटी नव्हती, चार किलोमीटर पायीच जायचं होतं. तुडीलला पाऊलवाटेनं जायला मी सुरुवात केली. मधेच वाट सोडून शेताच्या बांधावरून चालत राहिलो. दोन्ही बाजूला भातशेती. बांधावर बाभूळ, बाजूला आंबा नाहीतर फणस.. आकाश ढगाळलेलं. प्रकाशाची उघडमीट. समोर चिऱ्यामधली घरं आणि चुकार झोपड्या. हमरस्त्यावरून जाताना तलाठी कुठं बसतात विचारलं. ‘चावडी’ लिहिलेल्या छोट्या खोलीत आलो. तलाठी कुठं आहेत विचारलं. एक खाकी चड्डी, खाकीच सदरा घातलेला, तोंडात पानाचा तोबरा असलेला, वय फारसं नाही पण तरीही म्हातारा वाटणारा पुढं आला. त्यांनी आदबीनं विचारलं,
‘‘कुठून आला आहात सायब?’’
मला प्रथमच कुणी ‘साहेब’ म्हणत होतं. मी सांगितलं,
‘‘इरिगेशनमधला इंजिनियर आहे मी. तलाठींना भेटायचंय.’’
तो म्हणाला,
‘‘मी कोतवाल. चला, घेऊन जातो तात्यांकडं.”
त्याच्या मागोमाग जायचा मी प्रयत्न करत होतो; पण त्याचाच माझ्या मागून चालायचा अट्टहास दिसला. समोर एक भगवी पताका फडकणारं देऊळ. त्याच्या शेजारी चिऱ्यातलं घर. त्यांनी मला थांबायला सांगितलं. आवाज दिला,
‘‘काकी.. वं काकी.. तात्यासी भेटाया इंजिनेर आलंत.”
काकींनी बसायला सतरंजी अंथरली आणि म्हटलं,
‘‘देवपूजा चाललीय त्यांची.’’
तात्या बाहेर आले. नेसूचा कद माझ्यासमोर सोडला. पट्ट्यापट्ट्याची चड्डी. त्याभोवती पंचा गुंडाळला आणि म्हणाले,
‘‘बोला, काय काम काढलंत?’’
मी साळीसाहेबांची ओळख सांगितली. त्यांनी नकारार्थी मान हलवत म्हटलं,
‘‘पण काय माहिती हवी?’’
मी वही काढली. त्यांचं नाव, गावाचं नाव, तारीख लिहिली. आणि म्हटलं,
‘‘या गावनकाशात जी घरं आणि शेती आहे, त्या मालकांची नावं, गट क्रमांक, हिस्सा क्रमांक, सातबाराच्या नोंदी आणि सारा वगैरे माहिती हवी.’’
हे शब्द उच्चारले खरे, पण मला यांचा काहीच अर्थ माहीत नव्हता.
ते आत गेले. खूप जाडजूड चोपड्या माझ्यापुढं टाकल्या.
‘‘बघा या. समदी माहिती हाय.’’
मी चोपड्या उघडल्या. मघाशी जे शब्द उच्चारले होते, ते त्यात सुवाच्च अक्षरात होते. त्या त्या रकान्यातली माहिती लिहून घेत राहिलो.
तात्यांकडं सारखी माणसांची ये-जा होती. त्यांना हवे असलेले कागद तात्या तत्परतेनं काढून देत होते. कुठं चालढकल नाही, की कसली अपेक्षा नाही. काही लोकं कागद मागायला नाही तर भावाभावांचे वाद, सासू-सून कुरबुरी, वहिवाटीचे वांदे यासाठी सल्ले मागत होती. मराठी सिनेमातील अत्याचार करणारा पाटील आणि कर्णोपकर्णी नाडणारा तलाठी या चुकीच्या धारणा आपण वागवतोय, असं मला तात्यांकडं बघून वाटायला लागलं.
पाठीला कळ लागली म्हणून वर पाहिलं तर तात्या नव्हते; पण काकींनी चहा आणून ठेवला आणि त्याशेजारी तंबाखू आणि चुना. आदरातिथ्याची ही कल्पना आवडली. काकी बघत होत्या माझ्याकडं.. फुर्रर्र आवाज न करता चहा पिणारा त्यांनी पहिल्यांदाच पाहिल्यासारखा!
दुपार झाली. सगळ्या चोपड्यातली माहिती उतरवून घेतली होती. दोनदा चहादेखील घेतला होता. काम झालं म्हणून हात झटकून मी उभा राहिलो.
‘‘काकी, माझं काम झालं. तात्या आले की त्यांना सांगा आभारी आहे म्हणून. निघू का मी?’’
‘‘आत्ता.. सायब जेवल्याबिगर जाऊ देऊ नगं, कारभारी सांगून गेलेत. माशाचं कालवण चालतं का तुम्हास्नी ठावं नव्हतं. म्हणून वरण भात लावलाय.’’
किंचित सुवास असलेला भात, वरण, लिंबाचं लोणचं आणि नंतर सुपारीचं खांड. मी काकींचा निरोप घेतला.
चावडीवरून जाताना पुन्हा आत डोकावलं. खाकी सदरा मन लावून दात कोरत होता.
बांधावरून चालायची चटक लागल्यासारखा मी रस्ता सोडून दिला. कधी मुद्दामच ढेकळावर पाय देऊन घसरत होतो. मुद्दाम पडण्यासाठी तोल सावरायला मजा येत होती. लांबून गवताचा भारा डोक्यावर घेऊन येत असलेली बाई दिसत होती. लांबून ती मी चालत असलेल्या बांधावरून येतीय की शेजारच्या? कळत नव्हतं. जवळ आली तेव्हा कळलं आपल्याच बांधावर. आता ‘पहले आप.. पहले आप’ व्हायची वेळ येणार असं वाटत होतं. त्या बाईनं भारा खाली टाकला. दगडावर ती विसावली. मी जवळ पोचलो तेव्हा जाणवलं, की तिनी जरी लुगडं नेसलं असलं तरी ती परकरी पोर होती. छोट्या डोळ्यांची, मोठ्या नाकाची, गोंदलेल्या कपाळाची. मी चाल मंद करत पोचायला वेळ घेतला. जवळ जाऊन तिला ओलांडत असताना तिनी ‘ओ अवो’ हाका मारल्या. मला थांबवत म्हणाली,
‘‘वाईच भारा द्याना डोईवर.’’
मी आयुष्यात पहिल्यांदाच गवताचा भारा उचलला. त्यात वर खोचलेल्या दोन-तीन वाळक्या फांद्या खाली पडल्या.
‘‘असू दे असू दे..’’ म्हणत तिनी हात विस्फारले. मी भारा तिच्या डोक्यावर ठेवला. हातावरचं वजन एकदम निघून गेल्यानं हात स्थिर करण्याच्या नादात तिच्या छातीला माझा स्पर्श झाला.
ती झपाझप चालत पुढं गेली. मी हाताला झालेल्या मऊशार स्पर्शानं शहारत राहिलो. शिरशिरी म्हणजे काय, हे अनुभवत होतो. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पहात राहिलो. मघा पाहिलेले मिचमिचे डोळे, थोराड नाक, घामेजलेलं कपाळ एकदमच सुंदर वाटायला लागलं. स्त्री स्पर्शात इतकी जादू? ती दिसेनाशी झाली. आता मी बांधावरून चालायचं बंद करून पाऊलवाट स्वीकारली. मातीच्या ढेकळांशी आट्यापाट्या खेळत माझे हात कुरवाळत राहिलो.
स्टँडवरून राजेवाडी फाटा चौकात आलो, तेव्हा स्वामीनी हाक मारली.
‘‘झालं काम?’’ त्यांनी विचारलं.
मी वही दाखवत मान डोलावली. हलक्या आवाजात तो म्हणाला,
‘‘उद्या ऑफिसला येऊच नको. तलाठी भेटले नाहीत म्हणून परत दुसऱ्या दिवशी जावं लागलं असं सांग साहेबाना.’’
त्याच्या दृष्टीनं खूप मोलाचा सल्ला देऊन तो गेला. खरंच क्षणभर असं मानलं की आज आपलं काम झालं नाही म्हणून उद्या आपण परत गेलो तर.. बांधावर ती असेल?
गोकुळला आलो. कॉटवर अंग टाकणार तेवढ्यात तो दिसला. कालच्या संध्याकाळी दिसला होता तसाच. देवादिकांच्या तसबिरीसारखा. खूप दमल्यानं पडून राहावंसं वाटत होतं. मिटल्या डोळ्यांपुढं तिचं स्पर्शून गेलेलं रूप आणि आता समोर अस्पर्श त्याचं रूपडं! महाड खूप रसिलं आहे.. गोकुळच्या जेवणघरात शिरताना मी म्हटलं.
(क्रमशः)
*
वाचा
‘महाडचे दिवस’ – पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)