माझं सगळं लहानपण ‘शेषशायी भुवन’, नारायण पेठ इथं गेलं. हा वाडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कै. केशवशास्त्री दामले उर्फ स्वामी सच्चितानंद या संस्कृत भाषा विद्वानांनी ‘मठ’ या संकल्पनेतून या वाड्याची निर्मिती केली. वाड्याचं प्रवेशद्वार केळकर रस्त्यावर आहे आणि सुमारे १२० फूट आत गेल्यावर शेषशायी मंदिर आहे. या मधल्या जागेच्या दोन्ही अंगाला साधकांसाठी खोल्या बांधल्या आहेत. मंदिरासमोर ३५ फूट लांबी रुंदीची मोकळी जागा आहे. शास्त्रीबुवांच्या माघारी मठ ही संकल्पना बाजूला पडली आणि आमच्यासारखे भाडेकरू या वास्तूला लाभले.
सगळे सण आणि उत्सव साजरे करणं ही गोष्ट तर नारायण पेठेतील प्रत्येक वाड्यात व्हायची. परंतु वर्षातून दोन वेळा तरी लहान मुलांची नाटकंसुद्धा सादर केली जायची. मंदिरासमोरची मोकळी जागा हे नाट्यगृह आणि यातील एक कोपरा म्हणजे रंगमंच. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला एक छोटा दरवाजा होता. हा दरवाजा म्हणजे रंगमंचावरील विंग. या विंगेतून पात्रांची ये-जा व्हायची, प्रॉपर्टीची देवाणघेवाण व्हायची. दरवाज्याच्या मागे एक ओवरी होती, ती होती आमची मेकअप रूम. नाटुकलं चांगलं झालं की पात्र ओळींनी उभी राहायची आणि प्रेक्षक टाळ्या वाजवून कौतुक करायचे. नाटक पडलं की हीच पात्र मुसमुसत ओवरीकडे पळायची… आणि त्यांचं सांत्वन करायला त्यांच्या आया, मावश्या आणि काकू. सांत्वनाची जबाबदारी कुठल्या वडिलांनी, काकांनी घेतलेली मला आठवत नाही.
मला वाटतं नेपथ्याची फार चर्चा करायला नकोय, पण तरीही लक्षात राहतोय तो पडदा. पडदा चांगला दिसावा म्हणून आग्रहाने एका माऊलींनी छान साडी दिली. नाटक संपल्यावर त्या साडीचं लक्तर झाल्याचं पाहिल्यावर पुढच्या प्रयोगांना बोहारणींनी नाकारलेल्या साड्या वाट्याला यायला लागल्या.
३१ डिसेंबर १९६० ही नाटक सादरीकरणाची तारीख ठरली. मी चौथीत. मी दिग्दर्शक आणि माझ्यापेक्षा दीड वर्षांनी मोठी प्रतिभा मेकअपमन. नाटुकल्याची संकल्पना होती की जंगलातले प्राणी एकत्र येतात. त्याचं कारणदेखील तसंच असतं. माणसांनी त्यांचं जगणं मुश्किल केलेलं असतं. त्या प्राण्यांच्या विचार विनिमयातून ठरतं की आपलं गाऱ्हाणं वनदेवीपुढे मांडायचं.
पडदा उघडतो तेव्हा वनदेवीचं दर्शन होतं. हिरवी गर्द नऊवारी, लांब वेणी, कमरपट्टा आणि मुकुट. हे दर्शन घडताच प्रेक्षकांनी मेकअपमन प्रतिभाची वाहवा सुरु केली. प्रतिभाची आई या कौतुकानं भारावून गेली. जास्त करून दामले काकूंनी प्रतिभाचं कौतुक केलं. मग एकेक प्राण्याची एंट्री व्हायला लागली. दामलेकाकू वाट बघत असलेली त्यांच्या मुलाची – बापूची एंट्री झाली. तो ससुल्या झाला होता. कमरेला एक आणि अंगाभोवती एक अश्या दोन पांढऱ्या शुभ्र पंचांमध्ये गुंडाळलेला बापू छान उड्या मारत आला. दामले काकू पुन्हा प्रतिभाचं कौतुक करणार तेव्हढ्यात बापूनं प्रेक्षकांकडं तोंड केलं आणि तो दोन चवड्यावर उडी मारण्याच्या पवित्र्यात तयार झाला. आणि सगळ्या प्रेक्षकांनी एकच गलका केला. झालं होतं असं कि दोन पंच्यांच्या सांधीतून बाहेर त्याची नुन्नी डोकावत होती. प्रेक्षक हसतायत आणि दामलेकाकू रागानं फणफणतायत. ज्या प्रतिभाचं त्या कौतुक करत होत्या, तिच्यावर संतापल्या. नाटुकलं तिथंच बंद पडलं. तिला विचारलं,
‘हे पंचे गुंडाळण्याची कल्पना कुणाची?’
सगळ्यांनी माझ्याकडं बोट दाखवलं. दामले काकूंनी माझं बखोटं धरलं तेव्हा रडत रडत मी म्हटलं,
‘पण काकू बापूची आतली चड्डी काढायला मी नव्हती सांगितली.’
बापूची आतली चड्डी काढायची ही कल्पना कुणाची, यावर खूप वाद झाले.
दामलेकाकू आणि माझी आई दोन वर्षं एकमेकींशी बोलत नव्हत्या. अखेर एका हळदीकुंकवाच्या निमित्तानं त्यांचा अबोला सुटला. परंतु त्यानंतर शेषशायी भुवन या वास्तूत पुन्हा नाटक झालं नाही.
*
वाचा
विंगेतून : दीपक पारखी
‘महाडचे दिवस’ (कादंबरी) – दीपक पारखी
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता
लेखक दीपक पारखी कथा, कादंबरी, नाटक, स्फुटलेखन व वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करतात. आजच्या नंतर उद्याच्या आधी, बिन सावलीचं झाड, पोरकी रात्र भागीले दोन, सी मोअर..., शिदोरी स्व विकासाची ही त्यांची प्रकाशित पुस्तके. महाडचे दिवस ही कादंबरी व एक नाटक तीन एकांकिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.