महाडचे दिवस ६: आजची कमाई

खूप दिवसांनी दमणूक झाल्यानं कमालीची झोप लागली. थोडीशी उशिरानं जाग आली, ती चटचट आवाजानं. पाऊस थांबल्यानं तो आवाज थेट कानात येऊन बसला होता. गॅलरीच्या अर्धवट उघडलेल्या दाराच्या फटीतून चक्क कोवळं उन्ह डॉर्मेटरीच्या सात कॉटपैकी दोन कॉटला स्पर्श करत होतं. पावसाळ्यातल्या उन्हाची पुण्यात राहून सवय झाली होती; परंतु महाडच्या गच्च पावसात हे पडू पाहणारं उन्ह माझ्या चित्तवृत्ती कोमट करू पाहत होतं. त्यात हा लयबद्ध आवाज चटचट… चटचट…

मी कानोसा घेतला. अजूनही उठून चादर झटकावीशी वाटत नव्हतं. पोटापर्यंत थांबलेल्या चादरीच्या दशा मी डोक्यावरून मागं टाकल्या. डोळ्यांना चादरीचा झिरझिरतेपणा लख्ख जाणवला. उन्हाची ही करामत होती. तो चटचटता आवाज थोडा वेळ थांबल्यासारखा वाटला. ती लयबद्धता संपल्यानं पडून राहायची खुमारी कमी झालीय. पाय लांब करून गॅलरीचं अर्धवट उघड दार पूर्ण उघडायचा प्रयत्न फसला, तेव्हा मात्र उठून बसलो. हातानी ते दार उघडलं. पुन्हा चटचट आवाज सुरू झाला. कावळे गॅलरीच्या लोखंडी कठड्यावर चोच आपटतायत का.. माझ्या मनातले कावळे विचार चादरींची घडी घालताना काढून टाकले. सताड उघड्या दारातून गॅलरीत आलो. दहा फूट लांबीच्या गॅलरीच्या कोपऱ्यातून आवाज येत होता. मी त्या कोपऱ्याकडं पाहिलं. तीच महागडी अंडरवेयर, उघडी घामानं निथळणारी पाठ, लयबद्ध हलणारे कुरळे केस. तो दोरीवरच्या उड्या मारत होता. माझं गॅलरीत येणं त्याला आवडलं नसावं. कारण दोरी फिरायची थांबली होती. मी त्याची लय बिघडवली होती हे तर स्पष्ट होतं. मला हे अपराधीपण जाणवत असतानाच तो आत आला. त्याच्या कॉटवर ठेवलेला ब्रश आणि पेस्ट घेऊन तो बेसिनकडं गेला.

मला उठून दहा मिनिटं झाली होती. खोली साफ करायला लॉजचा पोऱ्या आला. त्याला समोरच्या कॉटवरून ऑर्डर आली.
‘‘भय्या, एक कप चाय लाओगे?’’
मी त्याचा आवाज ऐकला. आवाजात आदब होती पण कणखरपणाही होता. माझ्याकडं पाहत तो म्हणाला,
‘‘ए भय्या, दो कप चाय लाना.’’
माझा चहा त्यांनी सांगितला होता. त्याच्याशी माझा संवाद सुरू व्हावा, अशी त्याची आंतरिक इच्छा होती.

चहा पिताना मी शर्टाच्या खिशातील किंचित चुरगळलेली सिगारेट काढली. दोनतीन पफ मारताना शहापूरकरांनी जशी त्यांनी पेटवलेली सिगारेट मला दिली होती, तशी त्याला द्यावी असं वाटलं. मी तसं त्याला खुणेनी विचारलं. तेव्हा हसत तो म्हणाला,
‘‘भय्या, अभि तो आपके सामने मेरा वर्कआउट खतम हुआ है.. शायद आधा-पाऊना घंटे के बाद मै आपकी तमन्ना पुरी कर लुंगा.’’

एखादी व्यक्ती आवडली की तिची प्रत्येक गोष्ट आवडायला लागते. याला काही मानसशास्त्रात आधार आहे का? मी त्याचं आणखी निरीक्षण करत या गोष्टीचा विचार करत राहिलो. तेवढ्यात चहा आला. त्यांनी बॅगेतून बिस्किटाचा पुडा काढला. दोघांच्यामध्ये ठेवला. मी तिसरं बिस्किट खाताना म्हटलं,
‘‘आप औरंगाबादके है? और अभी औरंगाबादसे आये हो?’’
‘‘अरे आपने शायद मेरी कुंडली पढी है. आपको कैसा मालूम मै औरंगाबादका हूं?’’
त्याच्या प्रश्नाला खरं उत्तर द्यावं का… आपला अगोचरपणा दिसू नये म्हणून म्हटलं, ‘‘वो चायवाला बता रहा था’’
माझ्या उत्तरानं समाधान झाल्याचं दाखवत तो म्हणाला,
‘‘जी.. मै जरूर औरंगाबादका हूं, लेकिन अभी महाड नळदुर्गसे आय हूं… मेरी पोस्टिंग नळदूर्ग में थी, डेढ साल उधर बिताने के बाद इच्छा हुई चलो कोकण देखेंगे. चलो अभी निकलनेका है. शाम को अगर आप है तो बाते करते बैठेंगे.’’
त्यानी खुदा हाफ़ीज म्हणावं, असं खूप वाटत होतं. पण असली औपचारिकता तो घाईत असल्यानं त्यानी पाळली नसावी.

तो अंघोळ करून आला. किंचित हेअर क्रीमचा हात केसावरुन फिरवत त्यांनी आरशात पाहत केस बसवले. उघड्या अंगावर पावडरचे सपकारे मारले.
पॅन्ट चढवली, झुळझुळीत फुलाफुलाचा शर्ट घातला. रुमालाची घडी कॉलरभोवती लपेटली.
‘चलो निकलता हूं,’ म्हणत तो बाहेर पडला.

माझं आवरून झालं. संध्याकाळी स्वामी म्हणाला तसं आज ऑफिसला न जाता पुन्हा एकदा तुडीलला गेलोय, असं दाखवावं काय? मी तो विचार झटकून टाकला. ऑफिसला गेलो नाही तर कॉटवर बसून काय करणार? आपण गावात फिरणार. गाव इतकं लहान, कुणी पाहिलं तर? कुणी म्हणजे बी. एस. पाटीलांनी. तो साहेबांच्या कानाला लागणार. कशाला.. त्यापेक्षा जावंच ऑफिसला. 

मी बाहेर पडलो. बँक ऑफ बडोदा.. मंडई.. मासळीबाजार.. हॉटेल राज.. ठोंबरे क्लॉथ स्टोअर.. मी जात राहिलो. डाव्या बाजूला एक शिंप्याचं दुकान ‘झमीर टेलर्स’. तिथून पुढं जात असताना हाक आली,
‘‘भाईसाब.. रुको रुको. मै आता हूं.”
तो दुकानातून बाहेर पडला तेव्हा कात्री हातात घेऊन कापड बेतणाऱ्या शिंप्याला त्यांनी प्रेमानी मिठी मारलेली मी पाहिली. मी विचार करत राहिलो, मला महाडला येऊन आठवडा झालाय. हा कुरेशी तर काल-परवा आलेला. या शिंप्याला मिठी.. 
कुरेशींबरोबर चालताना झमीर टेलरशी तुमची जुनी ओळख आहे का? मी विचारलं. तो हसला.
‘‘वैसा कुछ नही, एक तो वो मोमेडियन है और दुसरी बात मेरा कैसा है एक बार आखसे आख मिला दी तो बस समझलो दोस्ती बन गयी.”

मी त्याच्याबरोबर चालतोय.. आता मला विरेश्वराच्या देवळाकडे वळायचं.. हा बहुदा स्टॅण्डवर जाणार असावा. असा विचार करत असताना तोही माझ्याबरोबरच उजवीकडे वळला. मनात म्हटलं की हा माझा पाठलाग करत ऑफिसमध्ये येतोय की काय? झालंदेखील तसंच. ऑफिस जवळ आलं तशी मुसंडी मारत तो माझ्याअगोदर ऑफिसमध्ये. मी आत पाऊल टाकायच्या आत हा स्वामीपुढं. स्वामी त्याच्याबरोबर हसतोय. मी पोचताच स्वामी म्हणाला,
‘‘जोशी, हा कुरेशी. नळदुर्गहून आलाय, आपल्या ऑफिसमध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून. काल जॉईन झालाय. तू काल नव्हतास त्यामुळं तुला माहीत नाही.”
मी अवाक. 
आता वेगळ्या नात्यानं त्याच्याशी बोलायचं होतं. पण तेवढ्यात लाकडी खुर्ची सरकली. महाडमधली सगळी घड्याळं साडे दहाची वेळ दाखवीत होती.

मी स्वतःहून साहेबांपुढं वही घेऊन उभा राहिलो. साहेब वही मागतील.. आपल्या वळणदार अक्षरांचं आणि गोळा केलेल्या माहितीचं कौतुक करतील.. ‘गुड जॉब’ म्हणत समोरच्या खुर्चीवर बसा म्हणतील. पण तसं काहीच घडलं नाही. मी उभाच. ते एकाच वाक्य बोलले,
‘‘वही पाटलांना दाखवा.’’

साहेबांना त्या माहितीत रस नव्हता. कदाचित त्या माहितीची फारशी उपयुक्तता त्यांच्या लेखी नसावी. केवळ मला कशात तरी गुंतवून ठेवायची त्यांची इच्छा असावी आणि त्याशिवाय बी. एस. पाटलाचं महत्त्व अधोरेखित करायची असोशी. मी काहीसा खट्टू होत वही बीएसपुढं ठेवली. तो चक्क हसला आणि म्हणाला,
‘‘अरे व्वा.. पहिल्याचवेळी खूप मनापासून काम सुरू केलेलं दिसतंय.”
मी मनाशी नोंद केली की बीएस वाटतो तसा साहेबांचा ‘हा’ माणूस नसावा. फार भला नसला तरी बुरा आहे हे डोक्यातून काढून टाकायला हवं.

बी. एस. पाटीलशी बोलायची मला संधी हवी होती, यासाठी त्याच्यासमोर बसलो. त्यांनी प्रश्नार्थक नजरेनी माझ्याकडं पाहिलं. त्याचवेळी आणखी एक प्रश्नार्थक नजर माझा पाठलाग करत आली. ती होती कुरेशींची. त्यांनी एक डोळा बारीक करत हातानी काय म्हणून विचारलं. मला तीही संधी वाटली. संधी अशासाठी की कुरेशीचं आणि माझं नातं आता एका बोटीचे प्रवासी असं झालं होतं. कालच्या संध्याकाळपासून आम्ही दोघं आप-आप एकमेकांना करत होतो. आता ए, अरे वगैरे करायला हरकत नव्हती. माझ्या कालच्या ऑफिसमधल्या गैरहजेरीत आणि कुरेशीच्या हजेरीत त्यांनी बीएसला जोखलं असावं. म्हणूनच तो मला काय असं खुणेनी विचारत असावा. मी माझी खुर्ची बदलली आणि कुरेशीच्या पुढ्यात बसलो.
‘‘कुरेशी, कसं वाटलं ऑफिस?’’ एक प्रश्न विचारला, अभावितपणे मराठीतून विचारला.
आश्चर्याची पाळी माझी होती. अगदी सगळ्यांसारखं तो मराठीत बोलायला लागला. अरे व्वा.. माझ्या मनावरचं हिंदीचं भूत उतरलं. त्यांनी काय उत्तर दिलं याकडं माझं लक्षच नव्हतं. मी या माणसाशी माझ्या भाषेत संवाद करू शकणार याचाच मला आनंद झाला.
कुरेशी आणि माझी संवाद तंद्री बीएसनी मोडली.
‘‘जोशी, काय विचारायला आला होतास?” बीएसनी विचारलं.
माझी स्वाभाविक इच्छा डावलून मी व्यावहारिक इच्छेनं कुरेशीच्या इथून उठून परत बीएसपाशी आलो. त्याला म्हटलं,
‘‘साहेब, काहीतरी टोपोशीटचा उल्लेख करत होते. खरं सांगू का मला हे टोपोशीट प्रकरण काही उमजलेलं नाही. प्लीज मला समजून सांग ना.’’
बीएस तसा उत्साही माणूस असावा. तत्परतेनं त्यांनी कपाट उघडलं. टोपोशीट लिहिलेल्या पुस्तकांच्या चळतीतून एक पुस्तक बाहेर काढलं. टेबलावर ते  अंथरलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे पाहून कुरेशींनी आपल्या समोरच्या कागदात स्वतःला गुंतवून घेतलं. मी अंथरलेल्या टोपोशीटवर लक्ष केंद्रित केलं.

बीएस सांगायला लागला,
‘‘गाव नकाशा (व्हिलेज मॅप) हा समपातळीमध्ये (प्लेन) असतो, त्यात नदी, शेतं, घर आणि डोंगर उतार सगळेच एका पातळीवर असतात. आपलं इरिगेशन खातं म्हणजे चढ-उताराचं खातं. इरिगेशनचं पाणी चढाकडून उताराकडे धावतं. आपण नदीचं पाणी अडवतो. या पाण्याचा उपयोग करून घेण्यासाठी गाव नकाशावरचा प्रत्येक भाग हा किती उंच सखल आहे, हे कळणं आवश्यक असतं. हेच नेमकं टोपोशीटवर असतं. आपण सर्व्हे करताना एखाद्या कमी जास्त उंची असलेल्या भागाचा कंटूर सर्व्हे कागदावर मांडतो. जेव्हा हे कंटूर दाट होतात तेव्हा तो तीव्र उताराचा भाग असतो. जेव्हा दोन कंटूरमधील अंतर वाढतं तेव्हा तो सपाटीचा भाग असतो. जवळजवळ आलेले कंटूर जेव्हा गाभ्याकडे चढत्या लेव्हलनी वाढत जातात, तेव्हा टेकडी असते. परंतु हेच कंटूर गाभ्याकडे उतरत्या लेव्हलनी कमी होतात तेव्हा ती नदी किंवा तळे असतं. आपण हे सगळं सर्व्हेमधे शिकलोय. मी म्हसाळ्याला दोन वर्षं हे काम करत होतो, त्यामुळं हे बोलतोय. तुम्ही अजुनी असलं काम केलेलं नाही म्हणून तुम्हाला कठीण वाटतंय एवढंच. 

‘‘सहसा आपण कंटूर प्लॅन करतो तेव्हा कंटूर एकशे पाच.. एकशे सहा.. एकशे सात या क्रमानं एक मीटर इंटरव्हलचे असतात. हे आपण कागदाच्या मोठ्या शीटवर प्लॉट करू शकतो; पण गावनकाशामध्ये आटोपशीर आकार ठेवावा लागत असल्यानी इतकी जागा नसते. तेव्हा ढोबळ मानानं उंच सखलपणा समजण्यासाठी आणि जागा कमी असल्यानं, कंटूर इंटरव्हल पंधरा मीटर असतो. ज्यामुळं गावाचा उंच सखल भाग लक्षात यावा. यालाच टोपोशीट म्हणतात. टोपोशीट आणि गाव नकाशा एकत्रित बघितला की आपण सर्व्हे कुठं आणि कसा करायचा, हे ठरवता येतं. अर्थात ते आपलं काम नाही. ते काम सब डिव्हिजनल इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांचं आहे. आपण फक्त पाणी घाल म्हटलं की ओतायचं. 

‘‘थोडक्यात मोठा कागद कंटूर इंटरव्हल कमी आणि छोटा कागद कंटूर इंटरव्हल जास्त. हे टोपोशीट सर्व्हे ऑफ इंडियानं तयार केलेलं अधिकृत डॉक्युमेंट म्हणजे दस्तऐवज असतो. याला फार महत्त्वाचं मानलं जातं. हे कुणा ऐऱ्यागैऱ्याच्या हातात पडू नये म्हणून गॅझेटेड ऑफिसरच्या ताब्यात असते. दरवर्षी हे डॉक्युमेंट सुरक्षित आहे ना, याची खातरजमा पोलीस अधिकाऱ्याकडून केली जाते.”

बीएसची सांगण्याची पद्धत फारच प्रभावी होती. कदाचित हे सगळं मला समजण्याच्या पातळीवर साळीसाहेबदेखील सांगू शकले नसते. बीएस आणि मी यांचं बोलणं झाल्यावर कुरेशींनी मला खोलीच्या मागे असलेल्या खैराच्या झाडाजवळ बोलावलं. सिगारेट विचारली आणि म्हणाला, ‘‘ही असली टोपोशीट वगैरे ना, खूप बघितलेत नळदुर्गला. तो बीएस काय सांगत होता.. मला तर काहीच समजलं नाही. तुला समजलं का का?”
मी ‘हो’ म्हणताच कुरेशी नर्व्हस झाल्यासारखा वाटला.. 

साडेपाच झाले, आम्ही बाहेर पडलो. आजची माझी कमाई काय होती? बी.एस. पाटील हा अभ्यासू आहे आणि कुरेशी चांगलं मराठी बोलतो हे कळणं. मी आणि कुरेशी गोकुळ निवासी होतो. गोकुळला पोचता पोचता कुरेशी मला म्हणाला,
‘‘ते गोकुळातलं गोड जेवण तुला चालत असेल; पण मला नको वाटतंय. तू नॉनव्हेज खात असशील तर… “
मी त्याला माहिती दिली हॉटेल राज… 

(क्रमशः)

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :