महाडचे दिवस ९: इतका वेळ कुठं होतास?

deepak-parkhi-marathi-kadambari-mahadche-diwas-9-itaka-vel-kutha-hotas

रात्री कुरेशीला म्हटलं,
‘‘कुरेशी, आपली जेवणाची सोय तर उद्यापासून कोकणे खानावळीत झाली. ऑफिसमध्ये नवीन एंट्री झाल्यात. आपण असं लॉजमध्ये किती दिवस…’’
‘‘जोशी, तू माझ्या मनातलं बोललास. एखादी खोली मिळतीय का बघू. खोलीचा आकार आणि भाडं पाहून तिथं किती जण राहू शकतील याचा अंदाज घेऊ, मग बाकीच्यांशी बोलून बघू.’’

प्रत्येक गोष्टीत कुरेशींनी पुढाकार घ्यायचा हे मला काही बरं वाटलं नाही. मी ठरवलं की आपण खोली बघावी. सकाळ झाली. एक शुभ वर्तमान समजलं. साळीसाहेब पेणला डिव्हिजन ऑफिसला निघालेत. जीप लांब गेलेली पाहिली आणि मी एकटाच बाहेर पडलो. ऑफिसपासून जवळ काकरतळं. आपली शोध मोहीम इथून सुरू करावी. एका बाजूला पाटी दिसली, ‘अरुणोदय वाचनालय’. आत गेलो. पुस्तकं लावण्यात मग्न असलेला तरुण दिसला. मी त्याच्यापुढं उभा राहिलो. तो म्हणाला,
‘‘मेंबरशिपचे महिना पाच रुपये आणि डिपॉझिट वीस रुपये.”
मी म्हटलं, ‘‘तुम्हाला असं का वाटलं की मी लायब्ररी जॉईन करायला आलोय?”
तो गडबडला तरीही म्हणाला,
‘‘काय आहे चेहऱ्यावरून पुस्तकांची आवड असणारे कळतात आणि दुसरं म्हणजे लायब्ररीत येणारी अनोळखी व्यक्ती दुसरी कसली चौकशी करणार म्हणून…’’

मला त्याच्या बोलण्याची गंमत वाटली आणि आपल्या चेहरेपट्टीचा अभिमान. पाटील मंडळींच्यात बसून सारखा हवा-पाण्याच्या गोष्टी तरी किती करणार होतो. त्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे. पुल, जयवंत दळवी, वि. स. खांडेकर, साने गुरुजी. माझी नजर पुस्तकांवरून फिरत असताना जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावर स्थिरावली. माझा कल पाहून खूश होत तो म्हणाला,
‘‘आमच्याकडं काकोडकर, अर्नाळकर, बाबा कदम यांच्यापासून कुरुंदकर, खानोलकर अशा सगळ्याच रेंजमधील पुस्तकं आहेत. तुम्ही एखादं विशिष्ट पुस्तक मागितलं तर चार-आठ दिवसात गिरगावातून मी आणून देऊ शकेन. पावती काय नावानी करायची?’’
त्याचा उत्साह आणि माझ्यावरचा विश्वास पाहून आपण वेगळे आहोत ही समजूत दृढ झाली. मी पैसे दिले आणि पावती घेताना म्हटलं,
‘‘तुम्ही मला आणखी एक मदत करू शकाल का?’’
‘‘बोला ना.’’
“मी इथं इरिगेशनमध्ये इंजिनियर आहे. माझ्याबरोबर आणखी काही जण आहेत. सध्या आम्ही वेगवेगळ्या लॉजमध्ये कॉट बेसिसवर राहतोय. या भागात आमची राहण्याची सोय होईल का ते पाहायचं होतं.”
त्यांनी पुस्तकावरची नजर काढून छताकडे पहात म्हटलं,
“तुम्ही जोशी ना.. समोरच एक दिवेकरांचं घर आहे. त्यांच्याकडं चौकशी करून बघा.”
मी दळवींचं ‘महानंदा’ घेतलं आणि दिवेकरांच्याकडं गेलो.

पुढच्या खोलीत झोपाळ्यावर एक वयस्कर गृहस्थ स्तोत्र म्हणत होते. नमस्कार-चमत्कार झाले. मिळालेली माहिती पडताळून पाहण्यासाठी त्यांना जागेचं विचारलं. त्यांनी आत डोकावून हाक मारली,
‘‘दिलीप, जरा मागच्या खोलीची किल्ली आण बरं.”
त्यांनी खोली उघडून दाखवली. बारा बाय दहा. वर कौलं. समोर तुळशी वृंदावन. दरवाज्यावर स्वस्तिक. मी विचारलं,
‘‘काका, संडास बाथरूम?”
“आहे ना.”
पलीकडं संडास होता आणि त्याच्या भिंतीला लागून उघडी मोरी. वर प्लास्टिक अंथरलेलं छत. मोरीतलं सांडपाणी केळीच्या झाडांकडे जाणार. चिऱ्याच्या बांधकामाची सांध बोटानी खरवडत विचारलं,
‘‘काका भाडं?”
“भाड्याचं नंतर सांगतो. पहिलं मला सांगा, तुम्ही इथं कोणकोण आणि कितीजण राहणार आहात?”
या प्रश्नांची मी काहीच तयारी केली नव्हती. तरीही म्हटलं,
“बहुतेक चौघेजण राहू. मी जोशी, दुसरे जैनांचे पाटील, तिसरे कोल्हे आणि चौथे कुरेशी.”
मी जमेल तशी यादी सांगितली.
ते ठामपणं म्हणाले,
“तुम्ही जोशी आहात म्हणून खोली दाखवली. तुम्ही सांगताय ती मंडळी असतील तर मला नाही द्यायची खोली.”

पुढाकार घ्यायचा आत्मविश्वास कमी करायचा नाही म्हणून तिथून पुढं चवदार तळ्याच्या बाजूला दोन-तीन घरं पहिली. यादी वाचून मी कुरेशीवर थांबलो की बोलणं थांबत होतं. माझी वणवण तास-दीड तास झाली. एक वेगळं वास्तव समोर आलं. खरं म्हणजे याचा धक्का माझ्यासारख्या पुण्यातील नारायण पेठेत राहणाऱ्याला बसायचं कारण नव्हतं. तरीही..
निराश होऊन ऑफिसकडं येत होतो. बाजारपेठेतून फिरताना ‘काणे उपहारगृह’ पाहिलं. त्याचं जोतं खूपच उंच. इतकं का उंच असावं, मी विचार करत राहिलो. आतून आवाज आला,
“काय हवंय?”
मी जोत्याच्या चौथ्या पायरीवर उभं राहून म्हटलं,
“काही नाही.. विचार करतोय तुमच्या या हॉटेलचं जोतं इतकं उंच का?”
ते म्हणाले, “असं होय. एकानी मोतीचुराची ऑर्डर दिलती, मला वाटलं तेच घ्यायला तुम्ही आलात. कोकणात.. महाडात नवे दिसताय.”
थोडावेळ थांबून म्हणाले, “म्हणूनच तुम्ही असा प्रश्न विचारताय.”

आता हे आपलं घोर अज्ञान दूर करणार हा माझा कयास अचूक ठरला. ते म्हणाले,
“पावसाळ्यात समुद्राचं पाणी खाडीत येतं आणि सावित्री नदीत शिरतं. असं झालं की बाजारपेठेत पाणी भरतं. त्याची झळ लागू नये म्हणून तुम्हाला खोलगट भागातल्या घरांची जोती उंच दिसतील.”

माझ्या शंकेचं निरसन झालं होतं. त्यांनी मोतीचुराचा उल्लेख केला होता. चितळ्यांची बाकरवडी खाण्यास सरावलेली माझी जीभ चाळवली गेली. लाडू खाताना मी इकडं तिकडं बघितलं. मागच्या बाजूला फळ्या आणि कॉटचे सांगाडे दिसले. मी विचारलं, “इतक्या खाटा?”
विचारलं तर खरं.. आता कॉट आणि खाट यातला फरक आपल्याला समजावून सांगणार असं वाटत असताना ते म्हणाले,
“आम्ही त्या भाड्यानं देतो. एकाच भाडं महिना तीन रुपये. डिपॉझिट तीस रुपये.”
भाडे आणि डिपॉझिटची भाषा ऐकायला मी अधीर झालो होतो राहायच्या जागेचं आणि हे सांगतायत कॉटचं. इथं जागेचा पत्ता नाही तर या कॉट घेऊन मी काय करू. माझं स्वगत पुरं व्हायच्या आत ते म्हणाले,
“दहा बाय दहाच्या खोलीत तीन बसतात.”
मी ‘बरं’ म्हटलं आणि निघालो.

ऑफिसला आलो. कुरेशी आणि बीएस छान गप्पा मारत बसले होते. कुरेशीला खोली शोधल्याची बातमी द्यावी म्हणून मी बाहेर पडलो होतो. नैराश्याचा ओघ बंद करण्यासाठी मी वही घेतली, रजिस्टर घेतलं. तुडीलच्या तलाठ्यांकडून गोळा केलेली माहिती भरायचं अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करत बसलो.

संध्याकाळी मी आणि कुरेशी लॉजवर आलो. मला त्यांनी विचारलं,
“सकाळी इतका वेळ कुठं गेला होतास?”
हा प्रश्न अपेक्षित होताच. त्याचं खरं उत्तर देणं अवघडच होतं. चटकन खिशातील पावती दाखवत म्हटलं,
“ही लायब्ररी जॉईन केलीय. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो.’’
त्यावर तो चटकन म्हणाला,
“मला वाटलं खोली वगैरे शोधत फिरत होतास की काय?”
काही न सुचल्यानं म्हणालो,
“जरा तू अंघोळीला जायच्या अगोदर जाऊन येतो.”
मी खरंच अंघोळीला गेलो. मनातले कढ थंड पाण्यात बुडवून टाकले,

“चल भटकून येऊ.”
तो म्हणाला. त्याच्यामागोमाग गोकुळच्या पायऱ्या उतरून उजवीकडे वळलो. मुस्लिम मोहल्ल्यात मी प्रथमच चाललो होतो. सगळ्या घरांच्या भोवती हिरव्या पताका पाहून आपण पाकिस्तानात आलोय असं वाटत होतं. मी एकटा असतो तर बावरून गेलो असतो; परंतु कुरेशी बरोबर असल्यानं सुरक्षित वाटत होतं.

एका मशिदीपुढं उभा होतो. एका प्रसन्न चेहऱ्याशी कुरेशी बोलत असताना मी लांब उभा होतो. आजूबाजूला हिंदी बोलणं चालू होतं. मधेच मराठी वळणही वाटत होतं. कुरेशी माझ्याजवळ आला तेव्हा त्याला म्हटलं,
“या तुमच्या लोकांची भाषा धड हिंदी नाही, धड मराठी नाही.”
त्यावर तो म्हणाला,
“या भाषेला दखनी म्हणतात. आणि हे तुमच्या लोकांचं, आमच्या लोकांचं काय चाललंय.. मी जितका तुझा आहे तितकाच तूदेखील त्यांचा आहेस. चल जरा सय्यदभाईंकडं जाऊन येऊ.”
“कशाला?” मी अभावितपणं विचारलं.
“तुला समजेल त्यांच्याशी बोलताना कशाला ते.”

मी खांदे उडवत आणि खांदे पाडून एक गल्ली पार करून एका झोपडीवजा घराशी येऊन थांबलो. कुरेशींनी आवाज दिला, “चाचा ओ चाचा, जरा बाहर आओ.”
चाचा बाहेर आले. पन्नाशीचे असले तरी पांढऱ्या शुभ्र दाढीनं मोठे वाटत होते. नाक सरळ, नजरेत स्निग्धता.
“आओ कुरेशी, दो दिन पहले राह देख रहा था. काम में फस गये क्या?”
“नहीं चाचा, काम में नहीं लेकिन मुहब्बत में फसे. हमारे ऑफिस में दोचार नये लडके आये है. जिनके साथ रहने का तो उनके साथ दो दिन मिठी बाते करता रहा. ये मेरे दोस्त.. जोशी नाम है इनका. जोशी ये सय्यद चाचा.”
मला त्यांना ‘राम राम’ म्हणायचं होतं पण कसं कोण जाणे ‘सलाम आलेकूम’ म्हटलं. तत्परतेनं त्यांनी ‘सलाम वालेकुम’ म्हटलं आणि हाक मारली.. ‘‘मुन्ना बेटी दो गिलास पानी लाना.”
‘‘जोशी, डाव्या बाजूला ही दोन माळ्याची इमारत दिसतीय ना ती यांची. त्यात डबल रुम काढल्यात त्यांनी पाच. आपल्याला घ्यायचीय त्यातली एक किरायावर. चाचा मैं ठीक बोल रहा हूं ना?”

चाचा हसताना आणखीनच मोहक वाटले. मला वाटलं की हे आता विचारणार.. कितीजण राहणार, कोणकोण राहणार. पण तसलं काहीच घडलं नाही. कुरेशींनी पाकीट काढून चाच्यांच्या हातावर पन्नास रुपये ठेवले आणि म्हटलं,
“ये ॲडव्हान्स किराया. डिपॉझिट जो भी होगा वह इन लोगोंसे बात करके बादमे दूंगा.”

चाचानी ते पैसे घेण्यासाठी पुन्हा मुन्नाला हाक मारली,
“मुन्नाबेटी, ये पैसा अम्मीको देना और चायके लिये तू बोली होगी, वह भी लेके आना.”
चौदा वर्षांची मुन्ना डोक्यावरून ओढणी घेतलेली, फिकट गोऱ्या रंगाची, गोबऱ्या गालांची आणि पायातले पैंजण वाजवत वावरणारी. ती चहा घेऊन आली. मघापासून पटकन आत जाणारी मुन्ना किंचित रेंगाळल्यासारखी वाटली.

चाचानी कुरेशीच्या औरंगाबादच्या काही लोकांची ओळख सांगितली. त्यांचं बोलणं ऐकताना वाटलं हे दोघे एकमेकांना सालोसाल ओळखत असावेत. त्यांचं बोलणं चालू असताना मी वास्तूची ओळख करून घेत होतो. चाचांचं घर आणि आम्ही राहण्यासाठी घेतलेली जागा यामध्ये पंधरा एक फुटांचं अंगण. त्यात काही फुलझाडं. त्यांच्या घराच्या दरवाज्याशी उजवीकडे मोठा पाटा आणि वरवंटा. डावीकडे मोठा तांब्याचा बंब. त्याखाली पितळी बादली. अंगणाची जमीन सारवणातली वाटत होती, पण तिचे बरेच पोपडे वर आलेले वाटत होते. समोर तीन पायऱ्या. त्या चढल्यावर दहा बाय बाराची खोली. त्यात एक फडताळ. मधल्या दारातून आत गेलं की एक आठ बाय दहाची छोटी खोली. त्यामध्ये धुणं वाळत घालायच्या काठ्या. अडीच फुटाची मोरी, त्याच्या कठड्यावर घागरी ठेवण्यासाठी केलेले दोन खळगे. मागं आणखी एक दार. ते उघडलं की तीन फूट रुंदीचा पंधरा फूट लांबीचा बोळ. त्यामागं कोंडवाड्यासारखा गोठा, ज्यात दोन शेळ्या बांधलेल्या. मोरीत नळ नाही. मी कासावीस होऊन बाहेर आलो तर पाट ठेवला होता तिथं नळ दिसला. म्हणजे पाण्याची सोय आहे. रंग फार जुना नाही. माथ्यावर तक्तपोशी. मी छान म्हणत बाहेर आलो.
कुरेशी आणि चाचा गप्पा मारत घरापासून थोडे लांब उभे. मुन्ना एका जर्मनच्या भांड्यातून पाट्यावर पाणी ओतत होती. दुसऱ्या भांड्यात वाटण करायची सामग्री. हिरव्या गार मिरच्या फक्त दिसत होत्या.

आम्ही लॉजवर परत आलो. मी म्हटलं,
“पण आपण या जागेत कुणीकुणी राहायचं?”
“कशाला त्याची फिकीर करतो, आपण दोघे तर नक्की. बघू कोल्हे, शहापूरकर आणि एनएम पाटीलला विचारून.”
माझ्या अगदी तोंडावर आलं होतं शहापूरकरला नको विचारायला. पण इतक्या अपुऱ्या ओळखीवर एकमेकांविषयी किल्मिष कशाला वाढवा. मी गप्प बसलो.

जेवणघरात जेवलो. गॅलरीत उभा राहिलो. मागून कुरेशी आला आणि म्हणाला,
“चला, जेवणाची, राहायची सोय झाली. तू तुझी पुस्तकांचीही सोय केलीस. पण मला सांग तू सकाळी इतका वेळ कुठं होतास?”

(क्रमशः)

*

वाचा
‘महाडचे दिवस’
– पहिल्यापासून
कथा

डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
कविता


+ posts

लेखन - कथा,कादंबरी,नाटक, स्फुट ललित व वैचारिक.
प्रकाशित पुस्तके: आजच्या नंतर उद्याच्या आधी | बिन सावलीचं झाड | पोरकी रात्र भागीले दोन | सी मोअर... | शिदोरी स्व विकासाची | एक नाटक तीन एकांकिका (प्रकाशन मार्गावर)

1 Comment

  1. Avatar

    Very nice story. While reading feels like we are actualy living in mahad

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :