काही सिनेमे अनावश्यक कारणांसाठी प्रसिद्ध पावतात. त्यांच्या कथेपेक्षा त्यातील इतर घटकांचीच चर्चा जास्त होते. सिनेमा हॉलीवूडचा असेल तर चर्चा जागतिक स्वरूप धारण करते. मायकेल डग्लस, शेरॉन स्टोन अभिनीत ‘बेसिक इन्स्टींक्ट’ हा असाच एक सिनेमा. यातील कथानकाची चर्चा न होता लैंगिकतेची जास्त चर्चा झाली. शेरॉन स्टोनने कसं दिग्दर्शक पॉल वरहोव्हनला कानफटात मारलं. पोलीस इंटरगेशन सीनच्या चित्रिकरणावरून ती कशी चिडली वगैरे बऱ्याच गोष्टी चवीने चघळल्या गेल्या. पण या सर्व चर्चांमध्ये सिनेमा मागे पडलाय असं वाटतंय. आजही त्यावर चर्चा करताना पटकथाकार जो एस्टरहासनी लिहिलेल्या स्वतंत्र पटकथेवर फारसं कुणी बोलताना दिसत नाही. तसेच आपल्या इथे हा सिनेमा चोरून बघण्यासाठीच आहे असा त्याचा अपप्रचार झाला आहे.
निव्वळ लैंगिकता एवढं एकच वैशिष्ट्य या सिनेमाचं नाही तर त्रिमिती पात्र, खून सत्र, पात्रांची मानसिकता, समलैंगिकता, मैत्री, प्रेम अशा बहुपदरी गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. लैंगिकता त्याचा अविभाज्य भाग आहे किंवा पात्रांच्या जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्यामुळे त्याला टाळून चर्चा संभवत नाही.
हॉलीवूड सिनेमात सेक्स व हिंसा यांची सुरूवात साठ व सत्तरच्या दशकातच झाली होती. ‘सायको’ (१९६०), ‘द वाईल्ड बंच’ (१९६९), ‘बोनी अँड क्लाईड’ (१९६७), ‘द गॉडफादर’ (१९७२) सारख्या सिनेमांनी कधी थेट तर कधी प्रतिकात्मकपणे पडद्यावरील सांकेतिक प्रतिमांना बदललं. त्यामुळे पारंपारिक चौकटीत अडकलेला हॉलीवूडचा सिनेमा त्यातनं बाहेर पडला. एका अर्थाने त्यात मोकळेपणा आला होता. वास्तवात होणारे बदल हे पडद्यावरील कथानकात प्रतिबिंबित व्हावे असा रास्त विचार दिग्दर्शक करत होते. उदाहरणार्थ साठ साली प्रदर्शित झालेला सायको व ब्याण्णव साली प्रदर्शित झालेल्या बेसिक इन्स्टींक्टमध्ये मुख्य नायिकेला दाखवण्यात दिग्दर्शकांच्या दृष्टीकोनात कसा बदल घडलाय हे स्पष्ट दिसतं. सायकोमध्ये सुरूवातीला नायिका जेनेट ली पलंगावर पहुडलेली आहे. तिने अंगात फक्त अंतर्वस्त्र घातलेले आहेत. हा प्रसंग त्यावेळी बराच चर्चिला गेला कारण जेनेट ली मोठी स्टार अन् तिला अशा अवतारात दाखवून हिचकॉकने मोठीच जोखीम उचलली होती. तसेच सुप्रसिद्ध शॉवर सीनमध्ये अंघोळ करतानाची जेनेट ली सुद्धा त्याने दाखवली. तर बेसिक इन्स्टींक्टमध्ये मुख्य नायिका शेरॉन स्टोन काही प्रसंगात संपूर्ण विवस्त्र असते तर सहाय्यक नायिका जीन ट्रिपलहॉर्न एका प्रसंगात अर्ध नग्न दाखवली आहे. सोबतच सुप्रसिद्ध (कुप्रसिद्ध!) पोलीस इंटरगेशन सीनमध्ये क्रॉस लेग करताना गुप्तांगाचं होणारं दर्शन शेरॉन स्टोनला रातोरात स्टार बनवणारं ठरलं. बत्तीस वर्षांच्या काळात झालेला फरक काळातला फरक पण दर्शवतो. अभिनेत्रींनी पडद्यावरील व्यक्तिरेखांना जास्तीत जास्त वास्तव रूपात दाखवण्याकडे पडलेला लंबक आजही तसाच आहे. आज निंफमेनियॅकसारख्या अनसिम्युलेटेड सेक्स दाखवणाऱ्या सिनेमांची संख्या कमी नाही.
बेसिक इन्स्टींक्टने साठच्या दशकात जोखीम म्हणून केल्या गेलेल्या बदलाला एक पाऊल पुढे नेत त्याला मुख्यधारेचा अविभाज्य भाग करून टाकलं. आज हॉलीवूड सिनेमात लैंगिकता वा नग्नता दिसून येते तिला हा सिनेमा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तसेच पॉल वरहोव्हनने नेहमीच्या क्राईम थ्रिलरला हिचकॉकिन व निओ न्वार शैलीत चित्रीत केल्यामुळे यातील लैंगिकता व हिंसा अंगावर येते. तसेच चित्रीकरणात तिला दिलेली वास्तवाची ढूब त्याला इतर सिनेमांपासून वेगळा पाडते. वर वर लैंगिकता व हिंसा दाखवणाऱ्या या सिनेमात एक खून सत्र मोठ्या हुशारीने दिग्दर्शक पेरत जातो. त्यामुळे समोर बऱ्याच गोष्टी उघडपणे दिसत असताना देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण याचा शेवट खूपच सरळसोट आहे असा सूर प्रेक्षकांनी त्यावेळी काढला होता.
जॉनी बॉझ या निवृत्त रॉकस्टारचा समागम ऐन भरात असताना एक गूढ ब्लॉन्ड स्त्री खून करते. डिटेक्टिव्ह निक करनचा (मायकल डग्लस) मुख्य संशय कॅथरीन ट्रमेल (शेरॉन स्टोन) या बेस्ट सेलर लेखिकेवर असतो. तिला भेटायला गेल्यावर ती म्हणते तिचं आणि बॉझचे संबंध वर्षभर होते. ती त्याच्यासोबत फक्त सेक्स पुरतीच संबंध ठेवून होती. पुढे तिच्या एका कादंबरीत एका रॉकस्टारचा खून त्याच पद्धतीने होतो जसा बॉझचा झालेला असतो असं निदर्शनास आल्यावर तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं जातं. तिथे ती निकशी अशा पद्धतीने संवाद साधते, की जणू ती त्याला खूप वर्षांपासून ओळखत आहे. इथनं पुढे सिनेमा निक आणि कॅथरीन भोवती फिरायला लागतो.
हा सिनेमा दोन पातळ्यांवर मार्गक्रमणा करतो. एक सकृतदर्शनी दिसणारं लैंगिकतेने भरलेले प्रसंग आणि पोलीस तपास तर दुसऱ्या पातळीवर ट्रमेल, निक, बेथ, गस यांच्यात घडणाऱ्या घटनांनुसार बदलणारं नातं. यातील मुख्य नायिका कॅथरीन ट्रमेल ही व्यामिश्र व्यक्तिरेखा आहे. ट्रमेल एकाचवेळी बेस्ट सेलर लेखिका, समलैंगिक प्रेमी, विषमलिंगी सेक्सची भुकेली, त्यासाठी स्वतःच्या शरीराचा यथोचित वापर करणारी, समोरच्याला आपल्या मादक व मोहक बोलण्याने भुरळ पडणारी, समोरच्याच्या मानसिकतेचा नेमका वेध घेणारी, आपल्या कादंबऱ्यांच्या कथानकांसाठी वाट्टेल त्या थराला जाणारी बाई आहे. त्यामुळे ती अमुक एका प्रसंगात कशी वागेल याचा अंदाज बिलकुल लावता येत नाही. तिचं निकसोबत वागणं एकाचवेळी वर्चस्व गाजवणारं व एका हाताचं सुरक्षित ठेवणारं अतिशय प्रोफेशनल असं आहे. त्याच्या आयुष्यातील घटनांवर आधारित तिला एक कादंबरी लिहायची असते म्हणून ती त्याच्या जवळ जाते. त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढते. त्याला मंत्रमुग्ध करते. तसेच पुढे काही घटनांबद्दल त्याला इशारा ही देते. पण तो दुर्लक्ष करतो कारण तो तिच्यात आकंठ बुडालेला असतो. तिचा भूतकाळ अचंबित करणारा असतो. तिचं बेथशी असणारं नातं तिच्या स्वभावाची एक वेगळीच बाजू दाखवणारं. तसेच घडणाऱ्या घटनांमध्ये तिच्या भूतकाळातले काही धागेदोरे जोडलेले. प्रेक्षकांना व निकला हे धागेदोरे समोर दिसत असूनही ओळखू येत नाहीत.
हे धागेदोरे चटकन ओळखू येत नाहीत ते पटकथाकार जो एस्टरहास व दिग्दर्शक पॉल वरहोव्हनने दाखवलेल्या चातुर्यामुळे. हे चातुर्य कुठलीही गोष्ट लपवून न ठेवण्यामध्ये आहे. कथेवरचा त्यांचा फोकस शेवटपर्यंत हलत नाही. त्यामुळे त्यांनी अधेमधे पेरलेले धागेदोरे नंतर विचार केल्यावर लक्षात यायला लागतात. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे खून होतात त्यांचा खुनी कोण? बेथ, ट्रमेल की रॉक्सी? एका खुनात तर निकवर पोलिसांचा संशय असतो इतकी पक्की योजना खुन्याने केलेली असते. त्यामुळे त्याने घेतलेली मेहनत जरी खुन्याकडे निर्देश करत असली तरी ती व्यक्तीच खुनी आहे यावर प्रेक्षकांना चटकन विश्वास बसत नाही. तसेच शेवटच्या प्रसंगात दोन खुनांमधील शस्त्र ‘आईस पिक’ कॅथरीन उचलून परत ठेवून देते तेव्हा प्रेक्षकांचा संभ्रम अजून वाढतो. एस्टरहासची पटकथा ट्रमेलचा भूतकाळ, तिची मानसिकता, तिचा सर्व घटनात स्वतःला केंद्रस्थानी ठेवून त्यातून निसटून जाण्याची हातोटी तपशिलात मांडते. तर वरहोव्हनची हिचकॉकियन व निओ-न्वार शैली प्रसंगातील ताण, पात्रांची बदलती मानसिकता, लैंगिकता, हिंसा अंगावर आणण्या इतपत प्रभावित करते. सोबतच जेरी गोल्डस्मिथचं पार्श्वसंगीत वातावरण गूढ व भयावह करते. वरहोव्हनच्या फ्लेश अँड ब्लड (१९८५) व स्टारशीप ट्रुपर्समध्ये (१९९७) सुद्धा लैंगिकता व हिंसा पाहायला मिळाली होती. हा सिनेमा दोन्हींच्या मधे प्रदर्शित झालेला त्यामुळे दोन्हीतील वैशिष्टे ठळकपणे वागवतो. तसेच वरहोव्हनची पडद्यावरील प्रतिमांना बदलण्याची मेहनत फळाला आलेली दिसते. ज्याला पुशिंग द एन्व्हलप म्हणतात ते काम वरहोव्हनने यात केले आहे ते ही नेहमीच्या क्राईम थ्रिलर फॉर्म्युल्याचा वापर करून.
कॅथरीन ट्रमेलची भूमिका त्यावेळच्या बऱ्याच नावाजजेल्या अभिनेत्रींनी नाकारली. सरतेशेवटी ती शेरॉन स्टोनकडे गेली. तोपर्यंत ती सहाय्यक किंवा छोट्या भूमिका करत होती. वरहोव्हनच्याच टोटल रिकॉलमध्ये (१९९०) ती होती. त्यातील एका प्रसंगावरून तिला ही भूमिका मिळाली. या भूमिकेने तिला स्टार बनवलं. पण निव्वळ स्टार बनणे या पलीकडे तिने भूमिका ज्या प्रकारे उभी केलीय त्याला तोड नाही. निक तिला भेटायला तिच्या घरी जातो तेव्हा ती एके ठिकाणी सिगरेट ओढत ऊन खात बसलेली असते. तो तिला बॉझबद्दल विचारतो तेव्हा ती अतिशय कॅज्युअल अॅटीट्यूडने बोलते तिथेच आपण तिच्या प्रेमात पडतो. पुढे सुप्रसिद्ध पोलीस इंटरगेशन सीनमध्ये एखाद्या ऑर्केस्ट्रा कंडक्टरसारखं ती स्वतःवर संपूर्ण फोकस राहिल असं वागते. या प्रसंगात ती तिच्या चेहऱ्यावरील हावभावात वा देहबोलीत किंचितसा सुद्धा बदल करत नाही. तिने थोडाही बदल केला असता तर आपण कॅथरीन ट्रमेलला न बघता शेरॉन स्टोनला बघतो आहोत असं प्रेक्षकांना वाटलं असतं. सिनेमात अजून बरेच प्रसंग आहेत जिथे ती अक्षरशः डग्लसशी जुगलबंदी करतेय असं वाटतं.
भारतीय पडद्यावरील सांकेतिक प्रतिमांना बदलण्याचं धाडस दिग्दर्शकांनी दाखवलं की, त्याला विरोध केलेला नेहमीच दिसून येतो. काही वेब सिरीजवर घेतला गेलेला आक्षेप व त्यावर बंदी घालण्याची केलेली मागणी समाज म्हणून आपण कुठे आहोत हे दाखवून देतं. तर हॉलीवूडमध्ये सुरूवातीला जरी विरोध केला गेला असला तरी नंतर त्याचे होणारे परिणाम कला माध्यमावर व समाजात काही एक प्रमाणात बदल घडवणारे दिसून येतात. त्यामुळे पडद्यावरील सांकेतिक प्रतिमा बदलवणारा हा सिनेमा रसिकांनी सोडू नये असा.
लेखक: विवेक कुलकर्णी
*
वाचा
विवेक कुलकर्णी यांचे साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
विवेक कुलकर्णी यांचं शिक्षण एमए इंग्लिश झालेले असून ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. त्यांच्या तीन कादंबऱ्या प्रकाशित आहेत - लातूर पॅटर्न (२०११), अनरउबिक (२०२०) व माधवराव एकंबीकर (२०१९). विवेक चित्रपट समीक्षक म्हणून दै. मराठवाडा नेता, दै. मी मराठी लाईव्ह, अक्षरनामा, वास्तव रूपवाणी, बहुविध व चित्राक्षरे या माध्यमांसाठी नियमितपणे लेखन करतात.